कमल हासन : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ते आपल्या विधानांमुळे चर्चेत येणारा राजकीय नेता

कमल हासन

फोटो स्रोत, Getty Images

कमल हासन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी 220 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता म्हणून त्यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 10 राज्य पुरस्कार आणि निर्माता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण सारखे नागरी सन्मानही मिळाले आहेत. दाक्षिणात्य सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी आणि बंगाली सिनेमेही केले आहेत.

कमल हासन यांनी 2018 मध्ये आपला राजकीय पक्ष सुरू केला आणि निवडणूकही लढवली. त्यांच्या पक्षाने मतं जिंकली पण त्यांना उल्लेखनीय विजय मिळवता आला नाही.

कमल हासन यांचा जन्म परमाकुड्डी येथे झाला. ते चेन्नईत लहानेचे मोठे झाले. ते आता कोईम्बतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राजकारणातील त्यांचा प्रवास छोटा असला तरी चित्रपट विश्वातील त्यांचा प्रवास खूप मोठा आहे.

रामनाथपुरम जिल्ह्यातील परमाकुड्डी येथे राहणारे श्रीनिवासन प्रसिद्ध वकील होते. श्रीनिवासन आणि त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांना चार मुलं. चारू हासन, चंद्र हासन, नैनी आणि कमल हासन. 7 नोव्हेंबर 1954 रोजी कमल हासन यांचा जन्म झाला. भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते.

कमल हासन यांचे शालेय शिक्षण परमाकुड्डी येथे सुरु झाले. पण त्यानंतर ते आपले थोरले भाऊ चारू हासन यांच्याबरोबर चेन्नईला राहायला गेले. येथे ए.व्ही. एमियाप्पा चेट्टीयार यांनी 'कलाथूर कन्मा' या चित्रपटात एव्हीएम स्टुडिओजला त्यांना एक छोटीशी भूमिका दिली.

कमल हासन

फोटो स्रोत, ANI

1960 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या चित्रपटात कमल हासन यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पार्थल पासी थीरम, पाथा कनिक्कई, कन्नूम काळूम (मल्याळम) आनंद ज्योती, वानमपाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. बालकलाकार म्हणून त्यांची कारकिर्द 1963 साली संपली.

अभिनयातून ब्रेक

कमल हासन यांनी चेन्नईत शिक्षण चालू ठेवले. ते ट्रिपलीकन येथील हिंदू उच्च माध्यमिक शाळेतून आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी पुरासाईवक्कम एमसीटी मुथिया उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला.

पौगंडावस्थेतही त्यांनी अभिनयात रस होता. नाट्य समूहात भाग घेण्यासाठी त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. त्यांनी आपल्या मित्रांबरोबर शिवालय नावाचा डान्सग्रुप तयार केला. पण काही महिन्यांतच हा ग्रुप विखुरला. त्यांना अभिनयाचही संधी मिळत नव्हती. ते थंगप्पम मास्टर यांच्या डान्स ग्रुपमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले.

कमल हासन

फोटो स्रोत, TWITTER/KAMAL HAASAN

1970 साली त्यांनी देवर फिल्म्सच्या बॅनरखाली 'मानवम' या सिनेमात एका गाण्यावर नृत्य केले आणि ते पुन्हा पडद्यावर दिसले. त्यानंतर त्यांनी अनई वेलनकन्नी, कुराथी मागन सारख्या सिनेमांमध्ये लहान भूमिका केल्या.

फिल्म इंडस्ट्रीवर ठसा उमटवला

दिग्दर्शक बालचंदर यांनी कमल हासन यांना अरंगेत्ररम आणि सोल्लाथनसारख्या सिनेमांमध्ये मोठा ब्रेक दिला. या सिनेमांनंतर त्यांना पुन्हा अभिनयाच्या संधी मिळू लागल्या.

1974 साली 'अवल ओरू थोडरकाथाई' आणि त्यानंतर 1975 साली अबुर्वा रागंगल सिनेमांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर त्यांच्या कारकिर्दीला वेग आला आणि त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

कमल हासन यांनी पस्तीसहून अधिक मल्याळी सिनेमे आणि पंधराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी सातहून अधिक चित्रपटांच्या कथाही लिहिल्या.

कमल हासन

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/GETTY IMAGES

दोन चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले तर तीन चित्रपटांच्या कथा आणि पटकथाही लिहिल्या आहेत. त्यांनी दहा सिनेमांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांनी आठ चित्रपटांमध्ये डान्स मास्टर म्हणून काम केले. तसंच त्यांनी चार चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 70 हून अधिक चित्रपटांमध्ये गीते गायली आहेत. त्यांनी काही गाणीही लिहिली.

चित्रपटसृष्टीच्या अनेक आघाड्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

राजकीय करिअर

रजनीकांत आणि कमल हासन आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर असताना प्रसिद्ध अभिनेते एमजीआर यांनी राजकारणात प्रवेश केला. ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी कमल हासन आणि रजनीकांत यांच्या राजकीय प्रवृत्तीची खूप चर्चा झाली.

चित्रपट विश्वाची पुढची पिढी एमजीआर यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करेल का? यावर चर्चा सुरू होऊ लागली. रजनीकांत तर नव्वदच्या दशकापासून राजकारणात येण्याचे संकेत देत होते. कमल हासन मात्र तेव्हा राजकारणापासून दूर राहिले.

रजनीकांत आणि कमल हासन

फोटो स्रोत, PTI

जयललिता यांचे निधन आणि विरोधी पक्षनेते एम. करुणानिधी मागे पडल्यानंतर कदाचित त्यांच्या मनात राजकारणात येण्यात इच्छा जागृत झाली असावी.

रजनीकांत यांनी अलीकडेच थेट राजकारणात येण्याविषयी चर्चा केली पण त्यांचे सिनेमे गेल्या काही काळापासून राजकारणात येण्याचे संकेत देत होते. दुसरीकडे कमल हासन यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाबद्दल कधीच काहीही वक्तव्य केली नाहीत. दहा वर्षांपूर्वी आनंद विकेटनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आपण राजकारणासाठी योग्य नाही.

तमिळ वृत्तपत्राच्या एका पत्रकाराने जेव्हा कमल हासन यांना विचारलं की तुमचे मित्र रजनीकांत यांनी तुम्हाला राजकारणात येण्यासाठी विचारणा केली तर तुम्ही याल का? ते म्हणाले, मी आधीच स्पष्ट केलं आहे की मी राजकारणात येणार नाही. पण त्यांच्या नशिबात राजकारणात येणं लिहिलं होतं.

विश्वरुपम सिनेमाचा मुद्दा आणि त्यांचा अवतार

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विश्वरूपम' या चित्रपटाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. यावेळी कमल हासन यांनी राजकारणाबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली.

करुणानिधि आणि जयललिता

फोटो स्रोत, Getty Images

हा चित्रपट 25 जानेवारी 2013 रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याला मुस्लीम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडू सरकारने सिनेमाच्या प्रदर्शनावर पंधरा दिवसांची बंदी घातली. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना कमल हासन म्हणाले, "हे निर्बंध म्हणजे केवळ माझाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. धोका कायम राहिला तर मी देश सोडून जाण्याचाही विचार करेन."

राजकीय पक्षाची घोषणा

मुस्लीम संघटनांशी चर्चा केल्यानंतर चित्रपटातील काही दृश्ये काढून टाकण्यात आली आणि चित्रपट प्रदर्शित झाला. कमल हासन यांनी पुन्हा सिनेमांवर लक्ष केंद्रित केलं. 2017 मध्ये ते बिग बॉसचे होस्ट बनले. या कार्यक्रमात त्यांनी देशातील परिस्थिती, राजकारण आणि भ्रष्टाचार या विषयांवरही चर्चा केली. यावरून वादही झाला.

तामिळनाडूच्या मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले पाहिजेत. ते सरकारच्या विरोधात बोलत राहिले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला.

कमल हासन

फोटो स्रोत, ANI

त्याला उत्तर देताना कमल हासन यांनी लिहिले, "संबंधित मंत्रालयांना भ्रष्टाचाराची माहिती देणारे ईमेल लिहा." या आवाहनानंतर सरकारी वेबसाईट्सवरून ईमेल आयडी हटवण्यात आले.

कमल हासन यांची राजकीय वक्तव्ये आणि डी. जयाकुमार यांच्या प्रतिक्रियांची चर्चा होऊ लागली. याचवेळी कमल हासन यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली.

21 फेब्रुवारी 2018 रोजी मदुराई येथे एका मोठ्या सभेला संबोधित करताना कमल हासन यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी मक्कई नीती किरम नावाचा पक्ष स्थापन केला. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

रजनीकांत आणि कमल हासन यांनी जवळपास एकाच वेळी राजकारणात पाऊल टाकलं. रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी राजकारणात येण्याची घोषणा केली पण त्यानंतर लगेचच त्यांनी काहीही मोठं केलं नाही.

अरविंद केजरीवाल आणि कमल हासन

फोटो स्रोत, PTI

कमल हासन यांनीही 2017 पासून राजकारणात येण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली होती. पण त्यांनी केवळ नवीन पक्षाची घोषणा केली नाही तर 2019 लोकसभा निवडणूकही लढवली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. अनेक जागांवर पक्षाला तिसरे किंवा चौथे स्थान मिळाले. पक्षाला एकूण 15,75,000 मतं मिळाली. त्यांच्या पक्षाला दक्षिण आणि मध्य चेन्नईतून 10 टक्के मतं मिळाली.

कमल हासन यांनी राजकीय पक्ष सुरू केल्यापासून त्यांच्या विचारसरणीबद्दल कायम प्रश्न उपस्थित केले जातात. पक्ष स्थापनेवेळी ते म्हणाले, "वैचारिकदृष्ट्या मी उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचा नाही. आपल्याला मध्यात रहायचे आहे."

अनेक लोक त्यांच्या वक्तव्याचा अर्थ समजू शकले नाहीत.

जेव्हा ते बिग बॉसचे अँकर होते तेव्हा ते म्हणाले होते की, विंध्य पर्वतांच्या दुस-या बाजूचा जो भारत आहे तो स्वाभिमानी भारत आहे. द्रविडांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांनी पाठिंबा दिला. भगव्यात काळा रंगही असतो असे वक्तव्य करून त्यांनी नवीन वादाला सुरुवात केली.

कमल हासन आणि ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, ikamalhaasan

मदुराईमध्ये पक्षाची घोषणा करताना त्यांनी एक विधान केले होते, भ्रष्टाचार हे भारतातील सर्व समस्यांचे मूळ कारण आहे. भ्रष्टाचार संपवणे हाच आपला मूळ मुद्दा असेल अशीही घोषणा त्यांनी केली. "सर्वांना चांगलं शिक्षण देण्यासाठी काम करेन. तसंच जात आणि धर्मही नष्ट होईल. कोणालाही मोफत दिले जाणार नाही." असंही ते म्हणाले.

पक्ष सुरू केल्यापासून ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि हाच त्यांचा प्रमुख मुद्दा आहे. त्यांच्या पत्रकार परिषदा आणि ट्वीटर फीडमध्ये सुद्धा याच मुद्द्यांचा उल्लेख आहे. पण अद्यापही त्यांचे मत स्पष्टपणे समजून घेणं सोपं नाही.

वैयक्तिक आयुष्य

कमल हासन यांनी दोन वेळा लग्न केले. 1978 साली त्यांनी वाणी गणपती यांच्याशी लग्न केले. दोघांची भेट 'नातू मारुमगल'च्या शूटिंगदरम्यान झाली. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर कमल हासन यांनी बॉलिवूड अभिनेत्री सारिकाशी लग्न केले. सारिका आणि कमल हासन यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत. काही वर्षांनंतर ते सारिका यांच्यापासून विभक्त झाले आणि अभिनेत्री गौतमीसोबत राहू लागले. आता हे दोघेही वेगळे झाले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)