लॉकडाऊनची महाराष्ट्रात चर्चा का होत आहे? या आठ ग्राफिक्समधून जाणून घ्या

    • Author, जान्हवी मुळे, शादाब नझिमी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या साथीची दुसरी लाट आली असून आजाराच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची चर्चा होत आहे.

जरा रुग्णसंख्या कमी झाली, असं वाटत असतानाच फेब्रुवारीच्या अखेरपासून ती पुन्हा वेगानं वाढू लागली.

पण खरंच राज्यातली परिस्थिती किती गंभीर आहे?

रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

कोव्हिडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णसंख्या किती झपाट्यानं वाढली आहे ते या आलेखावरून स्पष्ट होईल.

सक्रिय रुग्णसंख्या म्हणजे सध्या जे कोव्हिडनं ग्रस्त आहेत, अशा रुग्णांची संख्या. यात बरे झालेल्यांचा किंवा मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीचा समावेश नाही. सध्या आजाराचं स्वरूप नेमकं किती गंभीर आहे, हे सक्रिय रुग्णसंख्येच्या आलेखावरून लक्षात येतं.

कोव्हिडच्या साथीच्या सुरुवातीलाच देशात लॉकडाऊन झालं होतं. महाराष्ट्रात तर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अनेक गोष्टींवर निर्बंध होते. त्यामुळे पहिल्या लाटेदरम्यान विषाणूच्या प्रसाराला काही प्रमाणात आळा बसला, असं जाणकार सांगतात.

साथ सुरू झाल्यावर सहा महिन्यांनी म्हणजे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात कोव्हिडच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली.

पण फेब्रुवारीच्या मध्यावर ती पुन्हा वाढू लागली आणि महिन्याभरातच म्हणजे मार्चमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे.

महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर

कोव्हिड रुग्णांच्या एकूण संख्येचा प्रांतवार विचार केला, तर महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत केरळ नवव्या स्थानावर आहे. (31 मार्चपर्यंतची आकडेवारी)

महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक का आहे, आणि त्यावर लक्ष का ठेवायला हवं, ते हा तक्ता पाहिल्यावर लक्षात येईल.

देशात सध्या सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

देशात कोव्हिडच्या सक्रिय रुग्णसंख्येचा विचार केला, तर साठ टक्क्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या एवढी जास्त असण्यामागे विषाणूमध्ये झालेलं उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन जबाबदार नाही ना, असा प्रश्न विचारला जातो आहे. पण याविषयी संशोधन करणं आवश्यक असल्याचं जाणकार सांगतात.

सध्या एका गोष्टीविषयी मात्र बहुतेकांचं एकमत होताना दिसतंय. ते म्हणजे पहिली लाट ओसरू लागल्यावर लोकांनी काळजी घेणं कमी केलं.

ग्रामीण भागांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तर शहरांत पुन्हा गर्दी वाढली आणि सोशल डिस्टंसिंग राखणं कठीण झालं. अधिक वेगानं आजाराचा प्रसार होण्यामागे हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं.

राज्याच्या सर्वच भागांत रुग्णसंख्येत वाढ

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्याच्या सर्वच भागांत, शहरांत आणि ग्रामीण भागांतही रुग्णसंख्या वेगानं वाढते आहे.

राज्यातील या सहा प्रमुख शहरांची आकडेवारी पाहा. रुग्णसंख्येचा आलेख इथे किती वेगानं वर गेला आहे, ते दिसतं.

पण हे असं चित्र चिंताजनक असलं, तरी अपेक्षितच होतं.

महाराष्ट्रात मृत्यूदर कमी झाला आहे

जगभरातील ज्या ज्या देशांत कोव्हिडची दुसरी लाट आली आहे, तिथे कमी अधिक प्रमाणात असंच चित्र दिसलं असल्याचं सार्वजनिक आरोग्याच्या विषयातले तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

"दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना विषाणू वेगानं पसरतो आहे. पण त्याची आजारी पाडण्याची क्षमता तुलनेनं कमी झालेली दिसते आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण लोकांनी काळजी घेणं सोडलं, तर विषाणूचा प्रसार आणखी वेगानं होऊ लागतो."

महाराष्ट्रातही दुसऱ्या लाटेदरम्यान काहीसं असंच चित्र दिसत आहे. मार्चच्या अखेरीस राज्याचा मृत्यूदर 1.94 % एवढा कमी झाला आहे.

पण रुग्णसंख्या जशी वाढत जाईल, तशी वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवू शकते. अशा परिस्थितीत मृत्यूदर वाढू शकतो.

येत्या काही दिवसांत तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? राज्यातल्या प्रमुख हॉट्स्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत, आणि काय पर्यायी व्यवस्था आहेत? जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांचा हा लेख वाचा.

राज्यामध्ये तपासण्यांचं प्रमाण वाढलं

राज्यात कोव्हिडची रुग्णसंख्या वाढू लागली, तसं तपासण्यांचं प्रमाणही पुन्हा वाढलं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या 27 तारखेला राज्यात 1 लाख 88 हजार जणांची कोव्हिड चाचणी झाली. साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर तपासण्याही कमी झाल्या. आता त्यात पुन्हा वाढ होते आहे.

31 मार्च रोजी राज्यात 1 लाख 67 हजार 078 जणांनी कोव्हिड तपासणी केली आहे.

पण यातल्या कितीजणांना प्रत्यक्ष कोरोना विषाणूची लागण झाली, हे सांगणारा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे.

देशभराचा विचार केला, तर सध्या टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट साधारण पाच टक्के आहे, तर महाराष्ट्रात तो 14 ते 15 टक्के आहे. 'बीबीसी हिंदी'शी बोलताना तज्ज्ञांनी याच गोष्टीवर चिंता व्यक्त केली आहे.

टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट जितका जास्त, तितका धोका जास्त असं ढोबळ गणित आहे. जास्त तपासण्या करूनही रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण कमी झालं, तर साथ नियंत्रणात आली असं मानता येऊ शकतं.

साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासणीइतकंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं असतं. म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी किंवा विलगीकरण करणं. पण राज्यात पुरेसं काँटॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याची खंत केंद्रीय आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे.

लसीकरणाचं प्रमाण वाढलं

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात लसीकरणही सुरू झालं आहे. राज्यात आतापर्यंत लशीचे 62 लाख 9,337 डोसेस देण्यात आले आहेत.

पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आणि महाराष्ट्रात ज्या वेगानं रुग्णसंख्या वाढते आहे त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचं प्रमाण अजूनही कमी असल्याचं काहींना वाटतं.

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांनाही लस उपलब्ध होणार असून, लसीकरणाचा वेग आणि प्रमाण वाढेल अशी अपेक्षा केली जाते आहे.

(आकडेवारी : केंद्रीय आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, ICMR, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)