You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत सरकारची भूमिका काय?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज कोरोना संदर्भातील निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्बंधांची नियमावलीही जाहीर करण्यात आली.
त्यानुसार आता राज्यात उद्या रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत.
सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, शाळा आणि कॉलेजेस बंद राहणार आहेत. तर 10, 12वीच्या परीक्षेसाठी या नियमांमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परीक्षेशी संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांना एक तर कोरोनाची लस घ्यावी लागणार आहे किंवा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं RT-PCR चाचणीचं प्रमाणपत्र बाळगावं लागणार आहे.
राज्य सरकारनं यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा सध्यातरी पुनर्विचार करणार नसल्याचं महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना बोलताना स्पष्ट केलं होतं.
बोर्डाच्या परीक्षा घेतल्या नाहीत तर भविष्याच्या दृष्टीने मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय. यावर्षी विद्यार्थ्यांना पेपर लिहायला जास्त वेळ देण्यात येणार आहे.
राज्यामधली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती आणि निर्बंध येण्याची शक्यता पाहता बोर्डाच्या परीक्षेचा पुनर्विचार केला जाऊ शकतो का, असं विचारल्यानंतर बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा सध्यातरी पुनर्विचार करणार नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.
या परीक्षांविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, "यावर्षी परिस्थिती वेगळी आहे, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून जास्तीत जास्त टेन्शन फ्री वातावरणात परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे.
या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल झाल्यानंतर तिसरी पुरवणी परीक्षाही घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. यामध्ये विद्यार्थ्यांना नापास झालेल्या विषयांचे पेपर देता येतील आणि श्रेणीवर्धन करायची संधी मिळेल.
जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असतील, त्यांच्या घरचे कोरोना पॉझिटिव्ह असतील किंवा ते कंन्टेमेंट झोनमध्ये राहत असतील किंवा त्यांच्या भागात लॉकडाऊन लागू असेल तर त्यांना जूनमध्ये परीक्षा देण्याची संधी मिळेल.
पण विद्यार्थांना कोरोना झाला तर त्याला जबाबदार कोण? असं विचारल्यानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, "याचं उत्तर मी देऊ शकत नाही. पण आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. सरकार म्हणून मुलांची सुरक्षित परीक्षा घेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे."
बोर्डाची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. याविषयी वर्षा गायकवाड म्हणाल्या, "बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेपेक्षा सर्व मुलांचा आम्ही विचार केला. गावातल्या मुलांचं परीक्षा देताना इंटरनेट कनेक्शन गेलं तर काय करणार? CBSE, ICSE ही बोर्डही त्याच काळात परीक्षा घेत आहेत. आम्ही परीक्षा घेत असलो तरी आमची प्राथमिकता विद्यार्थ्यांचं आरोग्य आहे."
दहावी - बारावीची परीक्षा कधी होणार ?
- दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होईल.
- बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल.
- लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.
- 22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.
- दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देण्यात येईल. त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येतील.
शिवाय या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.
तर या परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचं हॉलतिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
पेपर लिहायला जास्त वेळ
गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नाही. हे लक्षात घेत पेपर लिहीण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.
यानुसार :
- 40 ते 50 मार्कांच्या पेपरसाठी 15 मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल. पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल.
- दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी 1 तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)