You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नांदेडमध्ये शिखांच्या होळीच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर हल्ला
नांदेडच्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाले आहेत.
नांदेडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती.
मात्र, काही भाविकांनी पोलिसांनी केलेली बॅरिकेडिंग तोडली आणि पोलिसांशी झटापट केली. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता.
नांदेडमधल्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली.
जमावाने केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाल्याचं नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ANI शी बोलताना सांगितलं आहे.
"वाढत्या कोव्हिड रुग्णांच्या संख्येमुळे यंदा होला-मोहाल्ला परवानगी नाकारली होती. त्याबाबत गुरुद्वारा प्रंबंधक समितीला सूचनाही केली होती. तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम गुरुद्वारामध्येच आयोजित करू असं आश्वासन दिलं होतं. पण सायंकाळी 4 वाजल्यानंतर निशान साहिब गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणलं, तेव्हा 300 ते 400 तरूणांच्या जमावाने बॅरिकेड्स तोडले." असं प्रमोदकुमार शेवाळे यांनी ANI शी बोलताना सांगितलं.
याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी ANI ला दिलीय.
गुरुद्वाराच्या प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
यंदा होला-मोहल्ला कार्यक्रम गुरुद्वारामध्ये आयोजित करायचं ठरलं होतं, असं, श्री हजूर साहिब गुरुद्वारा प्रबंधक समितीचं म्हणणं आहे.
"सध्या नांदेडमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे आम्ही होला-मोहाल्ला कार्यक्रम गुरुद्वारामध्ये आयोजित केला होता. यात मिरवणुकीचा कोणताही प्लान नव्हता. तसं आम्ही सगळ्यांना सूचनाही दिलेल्या. तशी वरिष्ठांनी वारंवार विनंतीही केली होती. पण कार्यक्रमासाठी आलेल्या तरुण वर्गाने मात्र गुरुद्वारामधली वरिष्ठ व्यक्तींचं ऐकलं नाही. निशान साहिब जसा प्रवेशद्वारासमोर आला तसं त्यांनी बॅरिकेड्स तोडले आणि महावीर चौकाकडे धाव घेतली," असं गुरुद्वाराचे सुरक्षा अधिकारी रविंदर सिंग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
या घटनेबाबत आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
होला मोहल्ला कार्यक्रमास शीख धर्मियांमध्ये विशेष महत्त्व आहे. नांदेडमधली होला-मोहाल्ला मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लोक येत असतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)