कोरोना: रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान पाचपेक्षा जास्त लोक एकत्र आढळल्यास हजार रुपये दंड

राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आणखी काही नियम लागू केले आहेत.

27 मार्च (रात्री 12वाजल्यापासून), रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास, 1 हजार रुपये दंड बजावण्यात येणार आहे.

सर्व सार्वजनिक ठिकाणं 27मार्चपासून रात्री आठ ते सकाळी सात बंद असतील.

मास्कविना आढळणाऱ्या व्यक्तीला 500रुपये दंड ठोठावण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला 1,000रुपये दंड करण्यात येणार आहे.

गार्डन आणि चौपाट्या या पब्लिक जागा रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहतील. सिनेमा गृह, मॉल आणि हॉटेलं रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहणार मात्र होम डिलिव्हरी मात्र सुरू राहतील.

कोणत्याही स्वरुपाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. ऑडिटोरियम, नाटयगृहं यांचा वापर उपरोक्त कार्यक्रमांकरता करता येणार नाही.

लग्न समारंभाला 50पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंत्यविधीला 20पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही.

विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक प्रशासनाला ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. क्वारंटीन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर तसं फलकाद्वारे सूचित करणं आवश्यक करण्यात आलं आहे. घरात क्वारंटीन व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात येणार आहे.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील सदस्यांनी बाहेर जाणंयेणं मर्यादित ठेवावं. मास्कविना वावरू नये.

क्वारंटीन नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला जवळच्या कोव्हिड केंद्रात नेण्यात येईल असं सरकारने म्हटलं आहे.

15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)