You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : सचिन तेंडुलकर रुग्णालयातून घरी, 27 मार्चला झालेली कोरोनाची लागण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयातून घरी परतला आहे. काही दिवसांपूर्वी तो उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता.27 मार्च रोजी सचिननं ट्वीट करून, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.
रुग्णालयातून परतल्याची माहिती सचिनने ट्वीटद्वारे सांगितली असून आपली काळजी घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार असं त्यानं लिहिलं आहे. पुढील काही दिवस अलगीकरणात राहावं लागणार असल्याचं त्यांनं लिहिलं आहे.
रुग्णालयात दाखल होतानाही सचिने ट्वीटद्वारे माहिती दिली होती. सचिननं ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही दिवसांतच घरी परतेन अशी आशा आहे. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा."
तसंच, सचिननं यावेळी विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या होत्या. "सर्व भारतीय तसंच माझ्या टीममेट्सना आपल्या विश्वचषक विजयाच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा," असं सचिननं ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
27 मार्च रोजी सचिन तेंडुलकरनं आपली कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं ट्वीट करत सांगितलं होतं.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागत असतानाच आपल्या अनेक परिचितांना तसंच सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
या यादीत आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश झाला आहे.
आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली, अशी माहिती सचिन तेंडुलकरने आजच (शनिवार, 27 मार्च) ट्वीट करून दिली. कोरोना संसर्गानंतर सचिन घरीच क्वारंटाईन झाला असून तिथंच त्याचे उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्याने दिली.
"कोव्हिडला दूर ठेवण्यासाठी मी सर्व प्रतिबंधक उपाय पाळतो. तसंच वेळोवेळी स्वतःची कोरोना चाचणी करून असतो.
"दरम्यान, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण कुटुंबातील इतर कोणत्याच सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही.
"त्यामुळे मी माझ्याच घरात क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सर्व उपचार घेत आहे.
अशा परिस्थितीत माझं आणि देशभरातील सगळ्या नागरिकांचं मनोबल वाढवणाऱ्या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. सर्वांनी काळजी घ्यावी," अशा आशयाचं प्रसिद्धीपत्रक सचिन तेंडुलकरने ट्विट केलं आहे.
अभिनेते परेश रावल कोव्हिड पॉझिटिव्ह
गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
आपल्यालाही कोव्हिड 19 झाल्याचं ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी शुक्रवारी (26 मार्च) रोजी ट्वीट केलं होतं.
नुकतीच अभिनेता आमीर खानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तत्पूर्वी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाने ग्रासलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)