धर्मांतरच्या संशयावरून 2 नन्सची रेल्वे स्थानकावर चौकशी

फोटो स्रोत, Social media
- Author, समिरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये केरळमधल्या दोन नन्सना त्रास देण्यात आल्याचं प्रकरण हळूहळू तापू लागलं आहे.
या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं. त्यानंतर शहा यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून टीका केल्यानंतर राजकारण तापू लागलं आहे.
या प्रकरणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "उत्तर प्रदेशात केरळमधल्या नन्सवर झालेला हल्ला हा संघ परिवाराच्या एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात उभ्या करणाऱ्या आणि अल्पसंख्याकांना चिरडणाऱ्या विषारी प्रपोगंडाचा परिणाम आहे. ही एक राष्ट्र म्हणून आत्मपरीक्षण करण्याची आणि अशा फुटीरतावादी शक्तींचा पराभव करण्यासाठी सुधारात्मक पावलं उचलण्याची वेळ आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गेल्या आठवड्यात धर्मांतराच्या संशयावरून दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने निघालेल्या दोन नन्स आणि त्यांच्यासोबत आलेल्या दोन मुलींना काही लोकांच्या तक्रारीनंतर झाशी रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं.
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी संपूर्ण करणाची फाईल सरकारी रेल्वे पोलीस म्हणजेच GRP कडून मागवली.

फोटो स्रोत, Getty Images
आदेशानुसार संपूर्ण रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवल्याचं आणि जीआरपी प्रकरणाचा तपास करत असल्याचं जीआरपीचे पोलीस निरीक्षक नईम खान यांनी बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले, "गृह मंत्रालयाला घटनेचा अहवाल पाठवला आहे. या प्रकरणात लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, जीआरपी आपल्या पातळीवर चौकशी करत आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या आठवड्यात 19 मार्च रोजी (शुक्रवारी) उत्कल एक्सप्रेस रेल्वेने केरळच्या दोन नन्स आणि दोन इतर महिला ओडिशाच्या राउलकेलाला निघाल्या होत्या. याच ट्रेनमधल्या दुसऱ्या कोचमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्तेही झाशीला जाण्यासाठी बसले होते.

फोटो स्रोत, Twitter
या कार्यकर्त्यांना नन्स धर्मांतर करण्यासाठी जात असल्याचा संशय आला. त्यांनी रेल्वे हेल्पलाईनवर फोन करून कळवलं आणि झाशीमधल्या आपल्या संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांनाही याबद्दलची माहिती दिली.
आरपीएफकडून माहिती मिळाल्यानंतर जीआरपीने झाशी रेल्वे स्टेशनवर या चौघांनाही उतरवलं आणि चौकशी केली. मात्र, चौकशीत धर्मांतरणाची माहिती चुकीची असल्याचं कळलं. त्यामुळे त्या चारही महिलांना सोडण्यात आलं.
चौकशीनंतर चौघींनाही दुसऱ्या ट्रेनने राउलकेलाला रवाना करण्यात आल्याचं जीआरपीचे पोलीस निरीक्षक नईम खान यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "अभाविपच्या अजय शंकर तिवारी यांनी या प्रकरणात आम्हाला लिखित तक्रारही दिली होती. आम्ही घटनास्थळी गेलो आणि चौकशीही केली. चौकशीत इतर दोन महिला राउलकेलाच्या होत्या आणि दीक्षा घेत होत्या, असं कळलं. आम्ही त्यांचे जन्मदाखलेही तपासले. त्यात त्या जन्मापासूनच ख्रिश्चन असल्याचं कळलं. त्यामुळे धर्मांतर वगैरे गोष्टी चुकीच्या होत्या. कुणाला वाईट वागणूक देण्यात आली नव्हती किंवा कुणाचा अपमानही झाला नाही. आम्ही चारही महिलांना ओडिशातल्या त्यांच्या इच्छित स्थळी रवाना केलं."
कठोर कारवाईचं आश्वासन
ख्रिश्चन नन्सबरोबर घडलेल्या या घटनेनंतर केरळच्या कॅथलिक बिशप काउंसिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली.
खरंतर घटनेनंतर लगेच हे प्रकरण शांत झालं होतं. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळमध्ये घेतलेल्या एका सभेदरम्यान त्यांच्यासमोर हा विषय मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचं आश्वासन देत जीआरपीकडून तात्काळ या घटनेचा रिपोर्ट मागवला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बुधवारी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते, "नन्ससोबत झालेल्या कथित अपमानकारक घटनेत सहभागी लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. मी केरळच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की या प्रकरणातील दोषींवर शक्य तेवढ्या लवकर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
मुख्यमंत्र्यांचं पत्र
बुधवारीच केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा आणि धार्मिक सहिष्णुतेच्या प्राचीन परंपरेला धक्का बसतो, असं म्हटलं.
विजयन यांनी पत्रात लिहिलं, "अशा घटनांचा केंद्र सरकारने कठोर शब्दात निषेध करायला हवा. भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या नागरी अधिकाऱ्यांच्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचवणाऱ्या अशा सर्व लोकांवर आणि समुहांवर अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे निर्देश देण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंती करतो."
उत्तर प्रदेशात जे काही घडलं ते या देशात घडायला नको होतं, असंही विजयन म्हणाले. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि अशा घटनांसाठी ते राज्य बदनाम असल्याचंही ते म्हणाले. आपलं सरकार केरळमध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचे कुठलेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असंही विजयन यांनी म्हटलं आहे.
या घटनेचा एक व्हिडियोही समोर आलाय. त्यात पोलीस अधिकारी चौकशीसाठी नन्सना रेल्वेतून उतरवत असल्याचं दिसतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








