फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांच्या अहवालावरून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात तसंच फोन टॅपिंग प्रकरणी भाजप नेत्यांनी आज (24 मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्ययारी यांची भेट घेतली.

या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री अजूनही मौन का आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं आणि त्यांच्याकडून अहवाल मागवावा."

अशी मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीची मागणी केल्याचा आरोप पत्राद्वारे केला आहे. हे पत्र परमबीर सिंह यांनी राज्यपाल यांनाही पाठवलेलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर राज्य सरकार बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही त्यांची मागणी आहे.

22 मार्च रोजी लोकसभेत भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

'उद्धव ठाकरे मौन का?'

राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले.

भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

फोटो स्रोत, Governor office

फोटो कॅप्शन, भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

ते म्हणाले, "शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या पण त्यांनी गृहमंत्र्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. राज्यपालांनी त्यांच्याकडून अहवाल मागवावा. हफ्ता वसुली आणि बदल्यांचं रॅकेट यासंदर्भात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल मागवावा."

"काँग्रेसची तर याप्रकरणात काही भूमिका दिसत नाही. ते दिल्लीत एक बोलतात आणि महाराष्ट्रात दुसरं बोलतात. काँग्रेसने सांगितलं पाहिजे की त्यांना किती हिस्सा आणि वाटा मिळतोय? हे आम्हाला समजलं पाहिजे," असंही ते म्हणाले.

'अहवाल म्हणजे भीजलेला लवंगी फटाका'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या भेटीवर टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सरकार चालवतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ते म्हणाले, "विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांची भेट का घेत नाहीत. सरकार मुख्यमंत्री चालवतात. राज्यपाल हे कालपर्यंत संघाचे प्रचारक होते. राजभवन राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपालांनी संविधानानुसार काम करावं. भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात काम करतात तर काही राजभवनात." असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

"देवेंद्र फडणवीस ज्या अहवालाचा वारंवार उल्लेख करत आहे त्या अहवालात काडचाही दम नाही. तो अहवाल म्हणजे भीजलेला लवंगी फटका आहे," असंही संजय राऊत म्हणाले.

यावर प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, "अहवाल छोटा फटका आहे की अॅटम बॉम्ब आहे. हे लवकरच कळेल."

राज्यपालांनी अद्याप बारा आमदारांच्या नावांच्या यादीला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे तोपर्यंत आम्ही बोलत राहणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फोन टॅपिंगची कार्यवाही ही पोलीस महासंचालक आणि मुख्य अतिरिक्त सचिवांच्या परवानगीनंतर झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. तसंच आपल्याकडे फोन टॅपिंगचा 6.3 जीबीचा डेटा असल्याचंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडी

यात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केला आहे की नाही याचा उल्लेख मात्र देवेंद्र फडणवीसांनी टाळला.

राष्ट्रवादी काँग्रेसने दावा फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे. परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक

फोटो स्रोत, Nawab Malik/FACEBOOK

"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसंच रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सत्यपरिस्थिती बाहेर आल्यानंतर सरकारने त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.

बहुमत असेपर्यंत आम्हाला कोणीही सत्तेपासून दूर करू शकत नाही, फडणवीस दिल्लीत जाऊन कट-कारस्थान करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही मलिक म्हणालेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)