रामदास आठवले : राज्यातील सरकार घालवण्याचे प्रयत्न सुरू - #5मोठ्याबातम्या

आजची विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा थोडक्यात पाहूयात,

1. राज्यातील सरकार घालवण्याचा आमचा प्रयत्न - रामदास आठवले

महाविकास आघाडीचं सरकार घालवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही रामदास आठवले म्हणाले. तसंच राजकारणात काहीही होऊ शकत, असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली.

यावेळी रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासंदर्भातही भाष्य केलं. राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये ही आमची इच्छा आहे पण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागणार असल्याचंही आठवले म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सरकारकडे तीन महिने उरले आहेत, असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे सरकार कोसळेल अशी वक्तव्य पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

2. शरद पवारांच्या भाकितावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आसाम वगळता इतर राज्यांत भाजपचा पराभव होईल असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवला. याला प्रत्युत्तर देत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला केवळ 180 जागा मिळतील असे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवलं, पण भाजपला त्याहून अधिक जागा मिळाल्या. या निवडणुकांमध्येही भाजप हा सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरेल."

"आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, हा ट्रेंड असून पाच राज्यांचा हा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल," असं वक्तव्य खासदार शरद पवार यांनी रविवारी (14 मार्च) बारामती येथे केलं होतं.

ते पुढे म्हणाले, "आसाममध्ये भाजपचं राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल."

3. 'कोणाला घाबरायचे कारण नाही'- नाना पटोले

राजभवन हे भाजपभवन झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. "राज्याचे ते प्रमुख आहेत अशावेळी पक्षपात करणं चुकीचं आहे," असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्र देशा यांनी हे वृत्त दिलं आहे.

गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सरकारमध्ये सतत संघर्ष दिसून आला आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी राजभवनावर टीका केली.

यावेळी ते विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही बोलले. "171 आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या काही दिवसात विशेष अधिवेशन घेऊन पार पडेल. कोणाला घाबरायचे कारण नाही," अशी प्रतिक्रिया देत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

4. 'ताजमहालचं नामकरण राममहाल केलं जाईल, भाजप नेत्याचा दावा

"ताजमहालचं नामकरण राममहाल केले जाईल," असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. उत्तर प्रदेशातील बेलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी असं वक्तव्य केलं आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

ते पुढे म्हणाले, "ताजमहाल एक शिवकालीन मंदिर होतं. त्यामुळे योगी सरकार लवकरच ताजमहालचं नामकरण राममहाल करणार आहे."

एवढेच नव्हे तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केलं. "समर्थ रामदासस्वीमींनी ज्याप्रमाणे देशाला शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशसाठी दिलं आहे," असंही भाजप आमदार सुरेंद्रसिंह म्हणाले.

5. नागपुरात आजपासून लॉकडॉऊन

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर नागपुरात आजपासून (15 मार्च) ते 21 मार्चपर्यंत लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदी लागू असून विनाकारण कोणालाही बाहेर फिरण्याची परवानगी नाही. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

तसंच लातूर जिल्ह्यातही आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद राहणार आहेत. तसंच रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

उस्मानाबाद, जामनेर, नाशिक, धुळे या शहरांमध्येही विविध स्वरुपात निर्बंध लागू केले आहेत. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडॉऊन लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले होते. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)