सचिन वाझे यांच्या वकिलांची 'ही' मागणी कोर्टानं केली मान्य

सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सचिन वाझे

सचिन वाझे प्रकरणात दहशतवादीविरोधी पथकाने (ATS) चार ते पाच पानांचं जबाब आज कोर्टात सादर केला. हा जबाब चार-पाच पानांचं असल्यानं तो वाचण्यासाठी कोर्टानं सचिन वाझे यांच्या वकिलांना 30 तारखेपर्यंत वेळ दिला आहे.

याबाबत सचिन वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "एटीएसने चार ते पाच पानी जबाब कोर्टात सादर केला. तो वाचायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आम्ही पुढील सुनावणीची तारीख मागितली. कोर्टाने 30 मार्च ही तारीख दिली आहे."

"माझं आणि सचिन वाझे यांचं अद्याप बोलणं झालं नाही. काही दिवसात मी त्यांच्याशी बोलून, मग 30 तारखेला उत्तर देईन," अशीही माहिती आरती कालेकर यांनी दिली.

"मी ख्वाजा युनुस प्रकरणातही त्यांची वकील होते. तेव्हा देखील त्यांना अडकवण्यात आलं होतं, आता पुन्हा त्यांना अडकवलं जात आहे," असा दावा कालेकर यांनी केला.

तसंच, सचिन वाझे यांच्या बहिणीने इंटर्वेन्शन याचिका दाखल केली आहे. माध्यमं घरी येतात, त्रास देतात, असा दावा त्यांनी या याचिकेत केलाय. त्यानंतर कोर्टानं राबोडी पोलिसांना आदेश दिलाय की, या प्रकरणी लक्ष घालावं.

सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुंबई
फोटो कॅप्शन, सचिन वाझे

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना केंद्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे.

14 मार्च रोजी कोर्टात नेमकं काय घडलं होतं?

NIA परिस्थितीजन्य पुरावे कोर्टात सादर केले. NIA म्हटलं, "वाझे यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची आहे, कारण या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. यामध्ये चेन ब्रेक करायची आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. यात इतर लोकं सामील असण्याची शक्यता आहे. त्या लोकांची चौकशी गरजेची होणं गरजेचं आहे."

तर वाझे यांच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडताना म्हटलं, "एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही, असं वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं आहे."

दरम्यान, शनिवारी (13 मार्च) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी NIAनं सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली.

अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यांच्या कोठडीची मागणी एनआयकडून करण्यात आली.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती.

मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता.

जिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळली होती.

ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता. त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशयाचे वर्तुळ आणखी गडद झाले होते. आता त्यांना अटक झाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. ट्विटरवर व्हीडिओ ट्वीट करून किरीट सोमय्या यांनी ही मागणी केलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सचिन वाझे कोण आहेत?

महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.

मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.

सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुंबई
फोटो कॅप्शन, सचिन वाझे

जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.

पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती.

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.

मनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.

"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला.

विमला पुढे म्हणतात, "26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."'हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मी चार-साडेचार तासांनी पोहोचलो होतो'- सचिन वाझे

"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो," असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.

या जबाबात विमला पुढे आरोप करतात, "माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे."

एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

नेमकं काय घडलं होतं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुंबई

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती.

हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.

मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.

स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.

सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुंबई
फोटो कॅप्शन, रेतीबंदर भागात मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)