सचिन वाझे - ' हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मी चार-साडेचार तासांनी पोहोचलो होतो'

फोटो स्रोत, ANI
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर 25 फेब्रुवारी 2021 जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल (5 मार्च 2021) ठाण्यात सापडला.
ठाण्यातील रेती बंदरच्या काठावर मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे पोलिसांना सापडला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण अत्यंत गूढ बनलं आहे.
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाशी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.
याबद्दल माध्यमांशी शनिवारी (6 मार्च) बोलताना म्हटलं की, मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणार आहे. हिरेन यांच्या मृतदेहावर कोणत्यापी प्रकारच्या जखमा नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. पण नेमकं काय ते पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. मीसुद्धा मृतदेह मिळाल्यानंतर चार-साडेचार तासांनीच गेलो होतो. याशिवाय इतर कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. इतर कुणी काय बोललं याबद्दलही मला माहिती नाही.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मिळाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तिथे गेला होता. यात तुमची भूमिका काय, असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर वाझे यांनी याप्रकरणी काहीही बोलायला नकार दिला.
राजकीय विषयावर मी काय बोलणार, असं सचिन वाझेंनी म्हटलं.
मृतदेह खाडीतून असा काढला बाहेर
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.

"मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत," अशीही माहिती पोलिसांनी दिली.
फॉरेन्सिक रिपोर्ट अजून मिळालेला नाही. मृतदेह पाण्यासोबत वाहून आल्याचा पोलिसांना संशय आहे.
डॉक्टरांनी काय माहिती दिली?
ठाण्यातील शिवाजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या माहितीनुसार, "मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा कलिना फॅारेंन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. केमिकल अॅनालेसिस केल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल."
"मृतदेह शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता रुग्णालयात आणला होता. संध्याकाळी पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टम करण्यासाठी चार जणांची टीम बनवण्यात आली होती. ही टीम पोलिसांना प्राथमिक रिपोर्ट सूपूर्द करेल," अशीही माहिती त्यांनी दिली.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याचं काल (5 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली. त्यानंतर विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्न विचारून उत्तरं मागितली.
'...तर या प्रकरणाचा तपास व्हायला हवा' - संजय राऊत
विरोधी पक्षाने जर काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबत लोकांच्या मनात संशय असेल तर दूर व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या गोष्टीचा भांडवल करू नये. कारण ती निरपराध व्यक्ती आहे. अधिवेशन सुरू असताना महत्त्वाच्या गुन्ह्यातील साक्षीदाराचा अशाप्रकारे संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी म्हटलं की, दहशतवादविरोधी पथकाकडे हा तपास सध्या दिलेला आहे. अशा प्रकारचा तपास उत्तम प्रकारे तपासणारे अधिकारी यात आहेत.
तपास ATS कडे देण्यात आलाय - अनिल देशमुख
तसंच, हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे देण्याची मागणीही विरोधी पक्षानं केली. मात्र, ही मागणी अनिल देशमुख यांनी फेटाळली.
देशमुख म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर मिळालेल्या स्फोटकांचा व ठाणे येथील घटनेचा संपूर्ण तपास विरोधी पक्षाने केंद्रीय संस्था NIA कडे देण्याची मागणी केली होती. परंतु महाराष्ट्र पोलीस हे सक्षम असल्याने हा तपास महाराष्ट्राच्या ATS कडे देण्यात आला आहे."

फोटो स्रोत, Twitter
आता महाराष्ट्र दहशतविरोधी पथक अर्थात ATS हा तपास करत आहे. या तपासासाठी आज (6 मार्च) सकाळी ठाण्यातील स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस घेत आहेत.
माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत : विमला हिरेन
या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
"माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे," असं विमला हिरेन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

विमला हिरेन यांनी सांगितलं, "पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीला जात होते. दिवसभर त्यांना तिथं बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही (4 मार्च) त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. रात्री दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला."
कांदिवलीहून क्राईम ब्रॅंचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी घोडबंदरला भेटायला बोलावलं होतं, असाही दावा विमला यांनी केलाय.
मनसुख हिरेन हे कोणत्याही दबावात नव्हते, असंही त्या म्हणाल्या.
यात सचिन वाझेंचं नाव कसं आलं?
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणाशी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
काल (5 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ते म्हणाले, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."
"सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून याप्रकरणी नेमलं. पण तीन दिवसांपूर्वी त्यांना काढलं आणि दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ओलामध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वाझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वाझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वाझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मी घटनास्थळी सर्वांत आधी गेलो नव्हतो - सचिन वाझे
"मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो," असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.
सचिन वाझे कोण आहेत?
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहितीनुसार, "उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या सापडल्या आहेत."
"या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल," असंही अनिल देशमुख म्हणाले.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








