मनसुख हिरेन प्रकरण : CDR म्हणजे काय? तो कोणाला मिळू शकतो?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबई पोलिस
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने या हत्येमागे पोलीस सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला. विरोधीपक्षाने वाझेंच्या अटकेची मागणी केली. तर सरकारने वाझेंची क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केली.

हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं CDR प्रकरणं विधीमंडळात चांगलंच गाजलं.

विरोधीपक्ष नेत्यांना CDR कसा मिळाला? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. तर, "मी CDR मिळवला. माझी चौकशी करा," असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

पण CDR म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी होतो? याची उत्तरं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

CDR म्हणजे काय?

'कॉल डिटेल रेकॉर्ड' ला CDR म्हणतात. प्रत्येक मोबाईल फोन नंबरचा रेकॉर्ड असतो. मोबाईल सर्व्हिस कंपनीकडे या नंबरचा पूर्ण डेटा असतो.

मनुसख हिरेन, सचिन वाझे, मुंबई पोलीस

फोटो स्रोत, SOPA Images

फोटो कॅप्शन, फोन कॉलचा रेकॉर्ड मिळू शकतो.

बीबीसीला माहिती देताना पोलीस अधिकारी सांगतात,

  • ग्राहकाने कोणाला फोन केला.
  • इनकमिंग कॉल कोणते
  • आउटगोइंग कॉल कोणते
  • एसएमएसवर कोणाशी संपर्क करण्यात आला
  • कुठल्या कंपनीचा मोबाईल वापरला
  • ग्राहकाचं लोकेशन काय आहे

या सर्व गोष्टींचा रोकॉर्ड CDR मधून मिळतो.

बीबीसीशी बोलताना सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी सांगतात, "पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून टेलिफोनचा CDR मागवू शकतात."

ते पुढे सांगतात, "सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीमध्ये एक नोडल अधिकारी असतो. हा तपासयंत्रणांशी संपर्कात असतो."

CDR कोणाला मिळू शकतो?

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपासयंत्रणांना CDR ची मदत होते.

पोलीस अधिकारी सांगतात, "टेलिकम्युनिकेशन विभागाच्या नियमांनुसार तपासयंत्रणा आणि कोर्टाने CDR मागवल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीला CDR द्यावाच लागतो."

पोलीस अधिकारी सांगतात, 12 महिन्यांपर्यंतचा CDR मोबाईल कंपनीकडे मिळू शकतो.

कोणीही CDR मागू शकतो?

सायबरतज्ज्ञ सांगतात, कॉल डेटा रेकॉर्ड हा प्रत्येकाचा खासगी असतो. त्यामुळे कोणीही व्यक्ती सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून CDR मागू शकत नाही.

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र जयस्वाल माहिती देतात, "सामान्य व्यक्तीला CDR मागवता येत नाही. पोलीस आणि तपासयंत्रणांनाच CDR मिळतो. गुन्ह्याचा तपास किंवा इंटलिजन्स गोळा करण्यासाठी CDR मागवता येतो. कोणत्या कारणासाठी CDR ची गरज आहे याबाबत माहिती द्यावी लागते."

मनुसख हिरेन, सचिन वाझे, मुंबई पोलीस

फोटो स्रोत, Michael Crabtree

फोटो कॅप्शन, कॉल रेकॉर्ड मिळू शकतो.

सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, "कोणाचाही डेटा त्याच्या संमतीशिवाय मिळवणं म्हणजे डेटा चोरी आहे. त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे. डेटा अनधिकृतरित्या मिळवणं हा गुन्हा आहे."

"डेटा अनधिकृतरित्या मिळवण्यात आला असेल. तर डेटा देणाऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते" असं प्रशांत माळी पुढे सांगतात.

'मी CDR मिळवला. माझी चौकशी करा'

सचिन वाझे यांच्या सीडीआरचं प्रकरण विधीमंडळात गाजलं.

"सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या दोन वेळा संभाषण झालं," असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केला.

"माझ्याकडे याचा CDR आहे," असं फडणवीस म्हणाले होते.

मनुसख हिरेन, सचिन वाझे, मुंबई पोलीस

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले म्हणाले, "हा CDR विरोधीपक्ष नेत्याकडे कसा आला. याची चौकशी सरकारने करावी."

सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला खुलं आव्हान दिलं.

"होय, मी मिळवला CDR, करा माझी चौकशी. गृहमंत्री माझी चौकशी करा. हो, मी मिळवला CDR," असं फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे यांच्या सीडीआरच्या मुद्यावर विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली होती.

सचिन वाझेंच्या CDR च्या मुद्यावर पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "CDR कोणालाही उपलब्ध होऊ शकतो का? आम्ही त्यांना सांगितलं तुमच्याकडे असलेला CDR तपासयंत्रणेला द्या. तुम्ही सांगताय ते कॉल्स तपासू द्या."

"CDR मध्ये संभाषण आहे का? खरंच कॉल्स झाले का? हा तपासाचा भाग आहे," असं मुख्यमंत्री पुढे म्हणाले होते.

सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, "पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात CDR मिळवला असेल तर त्यावर कारवाई करता येत नाही."

CDR पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो?

बीबीसीला माहिती देताना पोलीस अधिकारी सांगतात, "भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65 ब नुसार सर्टिफिकेट असल्याशिवाय कोर्टात CDR ग्राह्य ठरत नाही."

त्याचप्रमाणे, अनधिकृतरित्या काढलेला CDR कोर्टात सादर करता येत नाही.

अवैध CDR रॅकेटवर कारवाई

ठाणे पोलिसांच्या क्राइमब्रांचने 2018 मध्ये अवैधरित्या CDR देणाऱ्या रॅकेटवर कारवाई केली होती.

ठाणे पोलिसांनी जानेवारी 2018 मध्ये चार खासगी डिकेक्टिव्हना कतिथ रित्या CDR विकल्याप्रकरणी अटक केली. हे आरोपी 25 ते 50 हजार रूपये घेऊन CDR विकत होते, अशी पोलिसांनी माहिती दिली होती.

मनुसख हिरेन, सचिन वाझे, मुंबई पोलीस

फोटो स्रोत, ViewApart

फोटो कॅप्शन, कॉलरेकॉर्ड

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, अवैध सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचा वकील रिझवान सिद्धीकीला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. याच्या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

अवैध सीडीआर प्रकरणी पोलिसांच्या संशयाची सूई जॅकी श्रॉफची पत्नी आएशा आणि कंगना रनौतकडे होती, असा दावा पोलिसांनी केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.

ठाणे पोलिसांनी या प्रकरणी पहिला महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडीत यांना 2018 साली अटक केली होती. मार्च 2018 मध्ये कोर्टाने पंडीत यांना जामीन मंजूर केला.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राइमब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)