कोरोना लस: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लसीचा तुटवडा जाणवेल - सीरम #5मोठ्याबतम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) कोरोना: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लशीचा तुटवडा जाणवेल - सीरम

अमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

कोव्हिशिल्ड लशीला भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या लसीसाठीचं उत्पादन, कच्चा माल साहित्य हे अमेरिकेतील आयातीवर अवलंबून असल्याचं सीरमचे अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं.

2) ज्योतिरादित्य भाजपमध्ये जाऊन बॅक बेंचर बनले - राहुल गांधी

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, मात्र आता ते भाजपात जाऊन बॅक बेंचर बनले आहेत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुक केलं, मात्र काँग्रेस सोडल्याबद्दल खंतही व्यक्त केली.

"ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा आणि संघटना मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला," असं राहुल गांधी म्हणाले.

शिंदे भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परत आपल्याकडेच यावे लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले.

3) अयोध्येत आता श्रीराम विद्यापीठ सुरू करणार

उत्तर प्रदेशातील योगी आदित्य सरकारकडून अयोध्येत श्रीराम विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे.

योगी सरकारद्वारे उभारण्यात येत अलेल्या श्रीराम विद्यापीठात रामाशी संबंधित सर्व संस्कृती, ग्रंथ आणि हिंदू धर्माबाबत अभ्यासक्रम शिकवला जाईल, तशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली आहे.

श्रीराम विद्यापीठ ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जगप्रसिद्ध शहरात शैक्षणिक व्यवस्था असणं गरजेचं आहे, असंराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास म्हणाले.

4) ममता बॅनर्जींना धक्का, 5 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाच आमदारांनी तृणमूलला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

गेल्या महिन्या-दोन महिन्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये अनेक नेते गेले. दोन दिवसांपूर्वी तृणमूलचे राज्यसभेतील खासदार राहिलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्यांमुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढत आहे. भाजप हा तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानला जातोय.

5) विदर्भात पावसाचा इशारा, तर उर्वरित भागात तापमान वाढ

महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात मोठी वाढ झालीय, तर विदर्भात मात्र पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान विभगानं दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

विदर्भातील काही भागात 10 मार्चपासून दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

मात्र, त्याचवेळी विदर्भातीलच काही भागात तापमान 40 अंशाच्या पुढेही गेला आहे. असं एकूण अजब हवामान सध्या महाराष्ट्रात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)