You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जागतिक महिला दिन : कोरोनाशी सक्षमपणे लढणाऱ्या महिला सरंपच
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ग्लोबल लेव्हल वर महिला नेत्यांनी कोरोनाला सक्षमपणे हाताळल्याचं चित्र आपण 2020 मध्ये पाहिलं होतं. पण गावपातळीवर, खेड्यात नेतृत्व करणाऱ्या महिला सरपंचही कुठे कमी पडल्या नाही. त्यांनीही कोरोनाशी सक्षमपणे दोन हात केले आणि गावाला संकटातून वाचवलं.
या महिला सरपंचांच्या वाटेत अनेक अडचणीही होत्या. कोरोनाच्या आधीही काहींची सुरुवातच अविश्वासाच्या ठरावाने झाले, तर काहींना लोकांच्या मनातल्या भीतीवर उत्तर शोधायचं होतं.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पाच महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कथा बीबीसी मराठीने याआधी तुमच्यापुढे आणल्या होत्या. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा तुमच्यासमोर एकत्रितरित्या मांडतो आहोत.
1. काठी घेऊन गावात गस्त घालणाऱ्या सरपंच - सुमन थोरात
माजी सरपंच, शेवळेवाडी, पुणे
सुमनताईंच्या कारकिर्दीची सुरुवातच अविश्वासाच्या ठरावाने झाले. त्यांनी गावातल्या पुढाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारभार करायला नकार दिला आणि राजकीय दबाव झुगारून लावला. काही सच्चे कार्यकर्ते सुमनताईंच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांच्यावरचा अविश्वासाचा ठराव मंजूर झाला नाही. त्या आजही हसत सांगतात की माझ्या कारकिर्दीची सुरुवात अविश्वासाच्या ठरावाने झाली तर शेवट कोरोनाच्या साथीने.
कोरोना काळात त्यांनी इतर उपाययोजना तर केल्याच, पण गावात लॉकडाऊनचा भंग होऊ नये म्हणून त्या स्वतः काठी घेऊन गावात गस्त घालायच्या.
या काळात त्यांनी गावात चालू असलेली अवैध दारूविक्री बंद पाडली. यासाठी त्यांना धमक्याही आल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. "मला म्हणायचे गावात जास्त रूबाब करायचा नाही. मी म्हटलं का करायचा नाही, माझ पदं घटनात्मक आहे आणि मला त्या पदाचे अधिकार आहेत. मी त्या अधिकारांची अंमलबजावणी करणारच," बोलता बोलता सुमनताई सांगत होत्या.
त्यांचाबद्दलचा खास व्हीडिओ पहा इथे -
2. संपूर्ण महिलांची टीम उभी करणाऱ्या - सुमन बाबासाहेब तांबे
सरपंच, गोरेगाव अहमदनगर
साडेचार हजार लोकवस्तीच्या सुमनताईंच्या गावात जवळपास दोन हजार लोक मुंबई-पुण्याहून आले. कोरोना निर्बंधांची सक्ती केल्यामुळे सुमनताईंना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. शाळेत लोकांना क्वारंटिन करण्याच्या निर्णयाचा बाहेरून येणारे लोक विरोध करत होते. जुन-जुलै महिन्यात शाळा गळायला लागल्या तेव्हा लोक टोमणे मारायला लागले की हेच का तुमचं मॉडेल व्हीलेज?
"एका क्षणी वाटलं होतं की या पदाचा राजीनामा देऊन टाकावा," त्या सांगतात.
पण तरीही त्यांनी नेटाने आपलं काम सुरू ठेवलं. सुमन ताईंनी आशा-अंगणवाडी सेविकांची टीम बांधली. त्या बरोबरीने त्यांच्या सोबत महिला तहसीलदार, सीएचओ असल्याने त्यांना फायदा झाल्याचं त्या सांगतात.
त्यांच्याबदद्लचा हा खास व्हीडिओ जरूर पाहा :
3. कोकणातले आणि मुंबईचे हा संघर्ष मिटवणाऱ्या - रितिका सावंत
सरपंच, कोळोशी, सिंधुदुर्ग
आतले आणि बाहेरचे पण दोन्ही आपलेच अशा संघर्षाला रितिकाताईंना तोंड द्यावं लागलं. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतले हजारो चाकरमानी आपल्या गावी जायला पाहात होते, पण गावांनी त्यांची एन्ट्री बंद करून टाकली होती. बाहेरवाले आणि गाववालेच्या या संघर्षात कोकणातल्या अनेक गावांचे सरपंच अडकले, रितीका ताई त्यातल्याच एक होत्या.
काळात गावकऱ्यांना समजवून सांगताना रितीकाताईंची खूप कसोटी लागली. मे महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाचा पहिला पेशंट गावात सापडल्यानंतर लोकांची भीती कमी झाली.
कोरोनाच्या काळ महिला सरपंचांसाठीही अवघड होता पण या काळातही त्यांनी उत्तम काम करून दाखवलं असं रितिका ताईंना वाटतं.
त्यांच्याबद्द्लचा खास व्हीडिओ पहा इथे :
4. कोरोनाग्रस्तांना गावातच बरं करणाऱ्या - नीता पोटफोडे
सरपंच, आजणगाव-इसापूर, नागपूर
"एकदा एका कैद्याला शिक्षा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली असते. तुला विषारी सापाचा दंश करून तुला मृत्यूदंड देण्यात येईल असं त्याला सांगितलेलं असतं. तोवर त्याला अंधारकोठडीत ठेवतात. त्याच्या शिक्षेची पूर्ण तयारी होते, आणि शिक्षा द्यायच्या क्षणी त्याला दंश होतो आणि तो माणूस लगेच गतप्रण होतो. पण खरंच काय झालेलं असतं? त्या कैद्याला विषारी सापाचा दंश करण्याऐवजी फक्त एक काटा टोचलेला असतो. पण त्या कैद्याला वाटतं आपल्याला साप चावला आणि त्या भीतीनेच तो जीव सोडतो. कोरोनाचंही असंच आहे."
नीताताईंशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलेली ही कथा. कोरोनाच्या साथीपेक्षा कोरोनाची अकारण भीती जास्त धोकादायक आहे असं त्यांचं मत होतं.
त्यामुळे त्यांनी काही वेगळे निर्णयही घेतले. त्यातला महत्त्वाचा निर्णय होता कोरोनाग्रस्तांना, गावातच औषध देऊन बरं करण्याचा निर्णय.
"गावातली एक मायलेकाची जोडी पॉझिटीव्ह आली. त्यांना बघणारं कुणीच नव्हतं. ती महिला कोव्हीड सेंटरमध्ये जायला घाबरत होती, त्यामुळे मी माझ्या जबाबदारीवर त्यांना गावात ठेवलं. औषधोपचार दिल्यानंतर ते बरे झाले," नीताताई सांगतात.
त्यांचा व्हीडिओ नक्की पाहा इथे :
5. लॉकडाऊनमध्ये 200 लोकांना जेऊ घालणाऱ्या सरपंच - छाया खंदारे
माजी सरपंच, गणोरी, अमरावती
छाया खंदारे यांनी लॉकडाऊनच्या काळात 200 लोकांना जवळपास महिनाभर स्वतः स्वयंपाक करून जेवायला घातलं. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले होते आणि कित्येकांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडली होती.
अशात छायाताईंनी स्वयंसेवी संस्थांनी संपर्क करून निधी तर उभा केला पण या लोकांसाठी रोज ताजं अन्न शिजवणार कोण असा प्रश्न होता. मग त्यांनी स्वतःच आपल्या घरी काही बायकांची मदत घेऊन स्वयंपाक करण्याचं ठरवलं. गाडीचा, गॅसचा आणि स्वयंपाक करणाऱ्या बायकांचा खर्च त्या स्वतःच्या खिशातून करत होत्या तरीही त्यांच्याविरोधात काही गावकऱ्यांनी तक्रार केली.
पण सुदैवाने छायाताईंना तहसीलदारांनी लगेच अर्ज करायला सांगितला आणि परवानगी दिली. पण दलित असल्यामुळे आपल्या हातून शिजवलेलं अन्न घ्यायला काही लोक कचरतात हे त्यांच्या लक्षात आलं.
पण तरीही हिंमत न हरता छायाताई काम करत राहिल्या. यंदाच्या निवडणुकीत मात्र गावकऱ्यांनी त्यांना सदस्य म्हणून निवडून दिलं नाही.
त्यांनी केलेल्या कामाचा सविस्तर व्हीडिओ पहा इथे :
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)