लहान मुलांमधला कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"कॅन्सर, म्हणजे सर्वकाही संपलं असं मानू नका. खचून अजिबात जाऊ नका."

गोव्यात रहाणाऱ्या कादंबरी नाडकर्णी यांना वयाच्या 17 व्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं. कॉलेजच्या पहिल्या वर्षात ज्यावेळी मुलं-मुली कॉलेज लाईफच्या मस्तीचा अनुभव घेत असतात. त्यावेळी कादंबरी कॅन्सरचा सामना करत होत्या.

"कॅन्सरचं निदान एका शॉकसारखं होतं," त्या सांगतात.

कादंबरी यांना बसलेला धक्का स्वाभाविक होता. कारण कॅन्सर फक्त मोठ्यांनाच होतो, लहान मुलांना नाही असा अनेकांचा समज आहे.

तज्ज्ञांच्या मते, 0 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 5 टक्के आहे. म्हणजे, 100 कॅन्सरग्रस्त व्यक्तींमागे 5 जण लहान मुलं आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी 0 ते 19 या वयोगटातील 4 लाख मुलांना कॅन्सर होतो. मुंबईच्या व्हॉकार्ट हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल नारायणकर सांगतात, "भारतात दरवर्षी 40 ते 50 हजार मुलांना कॅन्सरची लागण होते."

लहान मुलांना होणारे कॅन्सर कोणते? त्यांची लक्षणं काय? पालकांनी काय लक्ष दिलं पाहिजे? हे तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

लहान मुलांना होणारे कॅन्सर कोणते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, लहान मुलांमध्ये सामान्यत: आढळून येणारे कॅन्सर,

• रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण 'ल्युकेमिया' म्हणून ओळखतो

• 'लिम्फोमा'

• ब्रेन कॅन्सर'

• सॉलिड ट्युमर

मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक (शिक्षण) डॉ. श्रीपाद बनावली बीबीसीशी बोलताना सांगतात, "लहान मुलांमध्ये 50 टक्के कॅन्सर रक्ताचे आणि 50 टक्के सॉलिड ट्युमरचे आढळून येतात."

लहान मुलांना कॅन्सर होण्याची कारणं?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लहान मुलांना कॅन्सर का होतो याचं ठोस कारण सांगता येणार नाही.

टाटा मेमोरिअल रुग्णालयात लहान मुलांच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख राहिलेले डॉ. श्रीपाद बनावली म्हणतात, "लहान मुलं आणि प्रौढांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये खूप फरक आहे. दोन्ही वयोगटात कॅन्सर होण्याची बायोलॉजी वेगळी आहे. लहान मुलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण आनुवंशिक असतं."

लहान मुलांच्या कॅन्सरचं कारण शोधण्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन करण्यात आलं. पण, जीवनशैली आणि वातावरणाचा संबंध फार कमी मुलांना कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरलेला दिसला.

लहान मुलांच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक उपाय आहे?

तज्ज्ञ सांगतात, लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक उपाय करता येत नाहीत.

डॉ. श्रीपाद बनावली पुढे म्हणतात, "प्रौढांना होणारे कॅन्सर जीवनशैलीशी निगडीत असतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. पण, लहान मुलांच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येत नाही."

लहान मुलांचा कॅन्सर बरा होतो?

व्हॉकार्ट हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल नारायणकर सांगतात, "कॅन्सरग्रस्त लहान मुलांपैकी 70 ते 90 टक्के मुलं पूर्णत: कॅन्सरमुक्त होतात."

प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना होणारा कॅन्सर बरा होण्याची शक्यता जास्त आहे.

डॉ. श्रीपाद बनावली म्हणतात, "लहान मुलांमधील कॅन्सर बरा होतो. यासाठी तीन 'पण' प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत.'

कॅन्सर बरा होण्याचे तीन 'पण'

• कॅन्सर बरा होतो, पण...निदान लवकर झालं तर

• कॅन्सर बरा होतो, पण...निदान अचूक झालं पाहिजे

• कॅन्सर बरा होतो, पण...उपचार योग्य आणि वेळेत झाले पाहिजेत

लहान मुलांमध्ये कॅन्सरची कोणती लक्षणं आढळतात?

कॅन्सर बरा होण्याचे तीन 'पण' कोणते ते आपण पाहिले. पण, यासाठी आपल्याला लहान मुलांच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत हे समजावून घ्यावं लागेल.

ब्रेन ट्युमर

लक्षणं बाहेरून दिसून येत नाहीत. पण, मुलाचं डोकं सतत दुखत असेल. सकाळी उठल्यानंतर मूल डोकं दुखत असल्याची तक्रार करत असेल. मुलांना उलट्या होत असतील तर डॉक्टरांकडे जावं असा तज्ज्ञ सल्ला देतात.

टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे लहान मुलांचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. श्रीपाद बनावली सांगतात, "प्रत्येक मुलाचं डोकं दुखणं किंवा ताप येणं म्हणजे कॅन्सरचं लक्षण नाही. मुलांना ताप येत असतो. पण, सामान्य उपचारांनी आजार बरा झाला नाही तर डॉक्टारांचा सल्ला घ्यावा."

रक्ताचा कॅन्सर (ल्युकेमिया)

ताप येणं, हाडांमध्ये दुखणं

तज्ज्ञ सांगतात की, ताप 1-2 आठवडे झाले नियंत्रणात येत नाही. हाडांमध्ये दुखणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. तर याचं निदान करून घेणं महत्त्वाचं आहे.

डोळ्यांचा कॅन्सर

डॉ. नारायणकर म्हणतात, "मुलांच्या डोळ्यात दिसणारा पांढरा डाग किंवा अचानक सुरू झालेलं तिरळेपण," डोळ्यांच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

पोटाचा कॅन्सर

तज्ज्ञ सांगतात, लहान मुलांना आंघोळ घातलाना पोटात गाठ असल्याचं जाणवतं. बरेच पालक याला महत्त्व देत नाही. पण, याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

डॉ. अतुल नारायणकर पुढे सांगतात,

• अत्यंत जास्त थकवा

• हिरड्यातून येणारं रक्त

• त्वचेतून रक्त येणं (इकायमोसिस)

• विविध अवयवात गाठी तयार होणं

• अचानक वजन कमी होणं, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं

ही देखील लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरची लक्षणं आहेत.

कॅन्सरचं निदान करण्यासाठी टेस्ट कोणत्या?

कॅन्सरचं निदान करण्यासाठी टेस्टबाबत माहिती देताना व्हॉकार्ट रुग्णालयाचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल नारायणकर सांगतात,

• रक्ताचा कॅन्सर ओळखण्यासाठी सोपी टेस्ट म्हणजेCBC. पूर्ण रक्त तपासणी.

• त्याचसोबत अवयवांची तपासणी

• सीटी स्कॅन, एमआरआय

• टिश्यू बायोप्सी

पूर्ण रक्त तपासणीत शरीरातील लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींबद्दल माहिती मिळते. तर, टिश्यू बायोप्सीत गाठीतील एक छोटा टिश्यू (उतींचा छोटा भाग) काढून त्याची तपासणी केली जाते.

कॅन्सरचं निदान किती महत्त्वाचं?

आजार लवकर बरा होण्यासाठी योग्य आणि अचूक निदान महत्त्वाचं आहे.

कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बनावली सांगतात, "आजारावर मात करण्यासाठी अचूक निदान महत्त्वाचं आहे. आजार पसरला तर उपचार लांबतात. मुलांना साइड इफेक्ट होण्याचा त्रास वाढतो."

ते पुढे सांगतात, "खेडेगावात लोक अंधश्रद्धेपोटी मांत्रिकाकडे जातात. कॅन्सरचं निदान झालं तर घाबरतात. उपचार न करता स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतात. ज्यामुळे आजार बरा होण्याची शक्यता कमी होते."

कॅन्सरबद्दलचे गैरसमज कोणते?

कॅन्सरबद्दल लोकांमध्ये समाजात असलेल्या गैरसमजाबद्दल डॉ. बनावली सांगतात,

• पालकांमध्ये हा गैरसमज आहे की कॅन्सर स्पर्शाने पसरणारा आजार आहे

• कुटुंबीय इतर मुलांना कॅन्सरग्रस्त मुलाजवळ जाऊ देत नाहीत. इतर मुलांना हा आजार होण्याची त्यांना भीती वाटते

• कॅन्सरग्रस्त रुग्ण मास्क लावतात, तो त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून. त्यांच्यापासून कोणालाही संसर्ग होत नाही

• शाळेत कॅन्सरग्रस्त मुलांना वाईट वागणूक दिली जाते

• शाळेत कॅन्सरग्रस्त मुलांना वाईट वागणूक दिली जाते

डॉ. श्रीपाद बनावली पुढे सांगतात, "अनेक पालक कॅन्सरग्रस्त मुलींवर उपचार न घेता त्यांना घरी घेऊन जातात. कॅन्सर बरा होईल पण पुढे लग्न होताना त्रास होईल. मुलगी पुढे ओझं बनेल, हा चुकीचा समज पालकांनी काढून टाकला पाहिजे. मुलींना मुलांप्रमाणेच उपचार घेण्याची संधी मिळाली पाहिजे."

कॅन्सरवर उपचार आहेत?

कॅन्सरवर उपचारांबद्दल कॅन्सरतज्ज्ञ डॉ अतुल नारायणकर माहिती देताना सांगतात की, केमोथेरपी- शरीरातील कॅन्सर सेल्सना मारण्यासाठी केमोथेरपी ट्रीटमेंट दिली जाते

रेडिएशन- क्ष किरणांचा (X-Ray) होय डोस देऊन कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या पेशी मारल्या जातात

शस्त्रक्रिया- शरीरात ट्युमर किंवा गाठ असेल तर शस्त्रक्रियेच्या मदतीने काढून टाकण्यात येते

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट- रक्ताच्या कॅन्सरने ग्रस्त रुग्णांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यात रुग्णाच्या शरीरात चांगलं रक्त तयार करण्यासाठी आवश्यक स्टेमसेल्स सोडल्या जातात.

बीबीसी मराठीशी बोलताना कादंबरी नाडकर्णी सांगतात, "मुंबईत कॉलेजमध्ये असताना कॅन्सरचं निदान झालं. पण, योग्य आणि वेळेत उपचारही मिळाले. कॅन्सर पूर्णत बरा होऊन आता 17 वर्ष झाली आहेत. मी सामान्य व्यक्तीसारखं आयुष्य जगते आहे. काहीच त्रास होत नाहीये. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर काही वर्ष मी नियमित तपासणी करून घेतली."

"कॅन्सरवर मात केल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं. माझं लग्न झालं. लहान वयात कॅन्सर पूर्ण बरा झाला, तर पुढील आयुष्यात काहीच त्रास होत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)