You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'नरेंद्र मोदी यांचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही'- प्रकाश आंबेडकर #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. मोदींचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही- प्रकाश आंबेडकर
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आल्या दिवसाला हिंदूनिष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास आहे असे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली. हे काय वर्तन आहे?" अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पी. निवेदा आणि रोसामा अनिल यांनी करोनाची लस टोचली.
सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये लस घेतली. लस घेतल्यानंतर मोदी यांनी डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. या टप्प्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना जरूर लस टोचून घ्यावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
2. ज्यांच्या मनात करुणा, त्यांना कोरोना होणार नाही- कोश्यारी
"ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही", असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. या नाऱ्याचा उल्लेख राज्यपालांनी भाषणादरम्यान केला. मी कोरोनाला कधीही घाबरलो नाही.
"राजभवनमध्ये सतत लोक मला भेटत राहिले. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवन मध्ये भेटता, तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही," असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
"कोरोनाला घाबरू नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा," असे आवाहन भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
3. कोरोना काळात शुल्क भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई नको- उच्च न्यायालय
नियमबाह्य़, वाढीव शुल्क भरले नाही म्हणून मुलांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, त्यांना ऑनलाइन वा प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करता येणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
कोरोना काळात शालेय शुल्कवाढ करण्यास राज्य सरकारने 8 मे 2020 रोजीच्या शासननिर्णयात मनाई केली होती. त्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी न्यायालयाने सोमवारी पूर्ण करत त्यातील शासननिर्णयाशी संबंधित याचिका सोमवारीच निकाली काढल्या. तसेच सविस्तर निकालपत्र नंतर देण्याचे स्पष्ट केले. न्यायालयाचा निकाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.
कोरोनामुळे यंदा शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. असे असतानाही बऱ्याच शाळांकडून विविध उपक्रमांचे शुल्क आकारण्यात येत असल्याची बाब पालकांच्या वतीने उपस्थित करण्यात आली. त्या वेळी या मुद्याबाबत निकालपत्रात योग्य तो आदेश देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
4. पृथ्वीराज चव्हाणांकडे आसामची जबाबदारी
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आसामची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत नवी जबाबदारी सोपवली आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.
आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांवर निवडणूक होत आहे. 2016 मध्ये 86 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. काँग्रेसला 26 जागा आणि AIUDF ला 13 जागा मिळाल्या होत्या. इतरांकडे 1 जागा होती.
5. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती
राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे प्रमुख सल्लागार असणार आहेत. किशोर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
अमरिंदर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंजाबच्या जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं अमरिंदर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर प्रतिमहिना केवळ एक रुपया मानधन घेणार आहेत. त्यांना बंगला, कार्यालय, संपर्कमाध्यमे अशा सुविधा दिल्या जातील.
त्यांना एक खाजगी सचिव, डेटा एंट्री ऑपरेटर, क्लार्क आणि दोन शिपाई असा कर्मचारी वृंद दिला जाईल. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी काम पाहिलं होतं. किशोर यांनी जनता दल युनायटेड पक्षासाठीही काम केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)