उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांना कोपरखळी, 'मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार' #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार- उद्धव ठाकरे

"मास्क न घालणाऱ्यांना माझा नमस्कार," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. 'आपलं महानगर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राज आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मास्क घातले होते, पण राज ठाकरे हे विना मास्क दिसले होते.

मराठी भाषा दिनाच्या निमित्तानेही राज ठाकरे हे पुन्हा एकदा मास्क न घालताच कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न वापरण्याचे कारण राज ठाकरे यांना विचारले होते.

रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे मास्क वापरत नसल्याची माहिती देण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मास्क न वापरण्याच्या गोष्टीला उत्तर दिले.

"मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो," असं राज ठाकरे म्हणाले होते. मनसेच्या मराठी भाषा दिनानिमित्तच्या स्वाक्षरी मोहीमेला पोलिसांनी परवानगी न दिल्याबाबत राज यांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांनी धुडघुस घातलेला चालतो, पण शिवजयंती आणि मराठी भाषा दिनासाठी परवानगी नाकारली जाते. एवढीच काळजी वाटते तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढे ढकला, काहीही बिघडत नाहीत असंही राज म्हणाले होते.

2. देशात विरोधकांना संपवण्याचे षड्यंत्र-संजय राऊत

"गेल्या सात वर्षांत विरोधी विचाराच्या व्यक्तीला संपवण्याचे घातक राजकारण देशात आकाराला आले आहे. संस्था आणि व्यक्तीस्वातंत्र्य संपवण्याचे षड्यंत्र दिसत आहे", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

भीमशक्ती विचार मंच आणि माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने आयोजित 'जय भीम फेस्टिव्हल'मध्ये पत्रकार राजू परुळेकर यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"देशातील जनता शांत दिसत असली तरी आतून खदखद वाढली आहे. २०२४ मध्ये शांततेचा स्फोट झालेला दिसेल. सद्दाम हुसेन, हिटलर, डोनाल्ड ट्रंप असे कुणीच नेते सत्तेचा अमरपट्टा बांधून आले नव्हते. नेत्याच्या वर्तनातून दंभ दिसतो तेव्हा इतिहास बदलतो.

"देशात भाजप सरकार विरोधाचा सूर ठेवायचा नाही म्हणून विरोधकांचे प्रतिमाहनन करीत आहे. सध्या दिल्लीतील संसद मूक आणि बधीर झाली आहे. भाजपचे खासदार इतर पक्षाच्या खासदारांशी मोकळे बोलत नाहीत आणि हसत नाहीत. एवढा धाक संसदेत कधीच बघितला नव्हता. भाजप बहुमतात असूनही खासदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही," असंही राऊत म्हणाले.

3. अविश्वास आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो- अजित पवार

विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो. त्यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि आमच्यासोबत किती असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलं. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार आपल्याच आमदारांना घाबरलं आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा मुद्दाच घेण्यात आलेला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं आणि मतदान करणं शक्य नसल्याने विधानसभा अध्यक्षाचा मुद्दा रहित होण्याची चिन्हं आहेत.

यामुद्यासह वनमंत्री संजय राठोड राजीनामा, वाढीव वीजबिलं अशा मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

4. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत गैरप्रकाराचा आरोप

आरोग्य विभागातील भरतीसाठी रविवारी झालेल्या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. राज्यातील परीक्षा केंद्रांवर नियोजनाअभावी मोठा गोंधळ उडाला, तर नागपुरातील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या गोंधळामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत परीक्षार्थी आणि काही संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागात साडेआठ हजार पदांसाठी रविवारी राज्यातील जिल्हा आणि तालुका केंद्रांवर दोन सत्रांत ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. 'एमपीएससी'मार्फत परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून राज्य शासनाच्या 'महाआयटी'ने नेमलेल्या खासगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेच्या वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक केंद्रांवरून आल्या आहेत. सरळसेवा भरती असतानाही केंद्रांवर पोलीस संरक्षणही नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर एक तास ताटकळत उभे राहावे लागल्याने उशिरा परीक्षा सुरू झाली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. नागपूरमध्ये खानावळींपासून सारेच काही बंद असल्याने उमेदवारांची उपासमार झाली.

5. मार्चपासून गॅस सिलिंडर ते एटीएमसंदर्भात बदलणाऱ्या गोष्टी

सोमवारपासून गॅस सिलेंडरपासून एटीएमपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. 1 मार्चपासून फास्टॅग मोफत मिळणार नाही. यासाठी गाडी धारकांना शंभर रुपये मोजावे लागतील.

1 मार्चपासून एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. एटीएममधून दोन हजारांची नोट काढल्यानंतर ग्राहक बँकेत सुट्टे पैसे मागण्यासाठी येतात. याला आळा घालण्यासाठी एटीएमध्ये दोन हजारांच्या नोटा मिळणार नाहीत.

'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना केवायसी देणं अनिवार्य करण्यात येणार आहे. केवायसी नसलेल्या ग्राहकांचं खातं निष्क्रिय केलं जाईल.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विक्री करणाऱ्या कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. फेब्रुवारी महिन्यात तीनवेळा हे दर वाढवण्यात आले. मार्च महिन्यात चित्र बदलतंय का याकडे सामान्य माणसाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)