You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमोल मिटकरीः बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला
(अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्याबद्दल चर्चा होत आहे. बीबीसी मराठीने फेब्रुवारी 2021 त्यांची मुलाखत घेतली होती. ती पुन्हा शेअर करत आहोत.)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणारे शाहीर आहेत, असं ते म्हणाले आहेत.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांच्यात आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दीक चकमकीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
प्रश्न - तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि तुम्हीच सरकारनं सांगितलेल्या नियमांचा भंग केल्यानं तुमच्यासह 300 जणांवर गुन्हे दाखल झालेत. कोरोना पुन्हा वाढत असताना, अकोल्यातही स्थिती फारशी चांगली नसताना नियमांचा भंग करणं कितपत योग्य आहे? तुमचेच मुख्यमंत्री सांगत आहेत पक्ष वाढवा कोरोना नाही.
अमोल मिटकरी - सर्व आयोजन समितीचे तरुण आमच्या गावातील होते, मी शिवजयंतीच्या पूर्वी व्याख्यानासाठी राज्यभर फिरत होतो. अठरापगड जाती, 12 बलुतेदारांना एकत्र करून मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून आम्ही शिवजयंती साजरी केली.
प्रश्न - तुम्ही म्हणताय की अठरापगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून शिवजयंती साजरी करायची म्हणजे गर्दी तर होणारच ना. तुम्ही नेते आहात, लोक तुमचं अनुकरण करतात, अशा वेळी लोकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी नाही का?
उत्तर - हो माझी जबाबदारी आहे. लोकांचा उत्साह होता. मला दुर्दैवानं एक गोष्ट सांगायची आहे की त्याच दिवशी सायंकाळी अकोला शहरात भाजप नगरसेवकाच्या हॉटेलचं उद्घाटन होतं जिथे हजारांचा समुदाय विनामास्क जमला होता. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली माझ्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रश्न - पण सरकार तुमचं आहे. गृहमंत्री तुमच्या पक्षाचा आहे. असं सगळं असताना तुम्ही म्हणता की भाजपच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला.
उत्तर - अकोला जिल्ह्याचे एसपी आमच्या सरकारच्याविरोधात कसे वागले याचासुद्धा शोध मला घ्यायचा आहे.
प्रश्न - मराठा आणि धनगर समाजात वाद लावण्याचा पडळकर आणि भाजपचा डाव आहे, असा आरोप तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चर्चांमध्ये केलात, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न म्हणजे दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हे नेमकं तुम्हाला का वाटतं.
उत्तर - माझ्या सर्व टीव्ही डिबेट सर्वांनी परत एकदा पाहाव्यात अशी मी विनंती करतो. मी कुठेही पडळकर अशा प्रकारचा वाद लावत आहेत असं भाष्य केलेलं नाही. मात्र पडळकरांना समोर करून आरएसएस याला जातीय रंग लावतोय का, असाच पश्न मी उपस्थित केला आहे. ते वाद लावत आहेत असं मी कुठेही म्हटलेलं नाही.
प्रश्न - तुम्ही दोघे आपआपल्या पक्षाचे तरुण नेते आहात, तुम्ही दोघं अनेक टीव्ही चर्चांमध्ये एकत्र जाता. तुम्ही ठरवून जाता का. त्यासाठी काय आग्रह असतो का तुमचा किंवा त्यांचा?
उत्तर - नाही नाही. असं अजिबात नाही. मला वाटतं त्यांचं आणि माझं संभाषण पहिल्यांदाच झालं आहे. पवार साहेबांवर जेव्हा टिका होते तेव्हा त्यावेळी त्या पक्षाचा सदस्य या नात्याने त्याला उत्तर दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे.
प्रश्न - तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात, वैरी आहात की प्रतिस्पर्धी आहात नेमकं तुमचं नातं काय आहे?
उत्तर - प्रतिस्पर्धी म्हणून पाहाण्याचा प्रश्न येत नाही. त्यांची आणि माझी प्रतिस्पर्धा होऊ शकत नाही. ते त्यांच्या मतदारसंघात असतील, मी माझ्या मतदारसंघात आहे. त्यांचा जिल्हा वेगळा. माझ्या जिल्हा वेगळा. त्यांचं वलय वेगळं. माझं वलय वेगळं. त्यांचा संघाशी संबंध आलेला आहे. मी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतला आहे. त्यांची विचारधारा वेगळी. माझी विचारधारा वेगळी आहे. त्यांच्याकडे मी संघाच्या मुशीत तयार झालेलं संघाचं एक उभरतं नेतृत्व म्हणून पाहातो.
प्रश्न - तुमच्या भाषणांमध्ये तुम्ही कायम बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करता, पण ज्यांच्याबरोबर तुम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली ते अमोल कोल्हे मात्र त्यांचे प्रशंसक आहेत, ते त्यांच्या भेटी घेत असतात. मग पुरंदरेंवर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय आहे?
उत्तर - 2014 ला जेव्हा तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला तेव्हा मी त्याचा कडाडून विरोध केला आहे.
बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाचं मी कधीही समर्थन करत नाही. आजही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यांच्या राजा शिवछत्रपती या नाटकामध्ये राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे. मात्र शिवगंध पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एक शिवप्रेमी म्हणून खासदार कोल्हे त्यांना भेटायला गेले असतील. तो खासदार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मला विचाराल तर मी बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करणार नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला आहे.
प्रश्न - राष्ट्रवाची अधिकृत भूमिका काय आहे?
उत्तर - राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका मला सांगता येणार नाही. त्याकाळात जितेंद्र आव्हाडसुद्धा होतो ना आज ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. आव्हाडांनीसुद्धा पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध केला आहे. एका कार्यक्रमामध्ये पवार साहेबांनीसुद्धा शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुळवाडीभूषण म्हणून मांडलेल्या विचारधारेला धरूनच शिवाजी महाराजांची प्रतिमा आमच्या पक्षात आहे.
प्रश्न - शिवसेना आणि राष्ट्रवादी आता जरा जास्त जवळ आले आहेत. काँग्रेस आता मागे पडत आहे हे आता नवं समीकरण पुढे येत आहे का?
उत्तर - तिन्ही पक्ष जवळ आहोत. काही शक्ती अदृष्य पद्धतीने जवळ असतात. काही शक्ती एकदम जवळजवळ असता. आम्ही तिघेही एकत्र आहोत. येणाऱ्या महापालिका, भविष्यातला विधानसभेच्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढवतील. भाजपला यावर बोलायला जागा नसली की ते असा आभास निर्माण करतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहेत म्हणून. काँग्रेसलासुद्धा फार मोठं वलय या महाराष्ट्रात आहे. नाना पटोलेंसारखा बडा ओबीसी नेता काँग्रेसचा राज्यातील प्रमुख झाल्यामुळे आणखी चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रश्न - मग शिवसेनेच्या सावरकरांना भारतरत्न द्या या भूमिकेवर आता तुमची भूमिका काय असेल?
उत्तर - माझी वैयक्तिक भूमिका सांगतो. मी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारा आहे. त्याभूमिकेचं वैयक्तिक पातळीवर मात्र मी समर्थन करू शकत नाही.
खालील व्यक्तीबद्दल एका वाक्यात उत्तरं द्या.
नाव - अजित पवार
उत्तर - वडिलांसारखा आधार
नाव - बाबासाहेब पुरंदरे
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणारे शाहीर
नाव - अमोल कोल्हे
उत्तर- राजकारणातील माझे आदर्श
नाव - सुप्रिया सुळे
उत्तर - वेळोवेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या मोठ्याताई
नाव - देवेंद्र फडणवीस
उत्तर - मुत्सद्दी राजकारणी, मात्र विचारधारेशी विरोधाभास असल्याने समर्थन नाही
नाव - शरद पवार
उत्तर - देशाचे सर्वोच्च नेते आणि आमचं सर्वस्व, आमचं दैवत
नाव - नरेंद्र मोदी
उत्तर- देशाचे नेते, भविष्यात खरं बोलतील अशी अपेक्षा करतो. असंवेदनशील नेते
नाव - अमोल मिटकरी
उत्तर - बदनाम वक्ता
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)