नाना पटोले - 'अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही'

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

भंडारा इथं बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा इथं काँग्रेसच्या वतीनं काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भंडारा इथं आंदोलन, पदयात्रा करत आहोत."

"मनमोहम सिंग यांचं सरकार असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार टिवटिव करायचे, ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करायचे. आज ते चूप का आहेत? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट तसंच शूटिग चालू देणार नाही.

जसे ते मनमोहन सिंग सरकारच्या काळात टिवटिव करत होते. तसंच त्यांनी आता मोदी सरकारच्या काळातील अन्याय अत्याचाराविरोधात आपली भूमिका मांडावी आणि नाही मांडली तर त्यांचे सिनेमा महाराष्ट्रात बंद पाडू."

डिझेल-गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)