राजा रणजीत सिंह : प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी चाबकाचे फटके खाणाऱ्या राजाची गोष्ट

तिचं वय केवळ अठरा वर्षं होतं, ती नृत्यांगना आणि गायिका होती. पहिल्याच भेटीत तिच्या जादुई सौंदर्याने आणि आवाजाने महाराज रणजीत सिंह यांना भुरळ पडली. या मुलीशी लग्न करण्यासाठी ते चाबकाचे फटके खाण्यासही तयार झाले होते.

या मुलीचं नाव होतं गुल बहार आणि ती अमृतसरची राहणारी होती. पंजाबचे सत्ताधारी महाराज रणजीत सिंह यांनी तिला पहिल्यांदा एका शाही समारंभात गाताना ऐकलं आणि पाहिलं. त्याचवेळी राजाने गुलबहरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिला स्वतःची प्रेयसी म्हणून ठेवण्याची त्यांची इच्छा होती. पण गुल बहारने असं करण्यास नकार दिला.

पंजाबच्या इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इक्बाल कैसर यांच्या म्हणण्यानुसार, रणजीत सिंह त्या मुलीवर इतके भाळले की, स्वतःकडचं सर्व काही देऊन टाकायला ते तयार झाले होते. "गुल बहारचं कुटुंब मुस्लीम होतं, त्यामुळे आपण प्रेयसी म्हणून येऊ शकत नाही, असं तिने महाराजा रणजीत सिंह यांना सांगितलं."

त्या वेळी महाराजांचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त होतं. त्या काळी इंग्रजांनी भारतीय उपखंडात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. महाराजांची इच्छा असेल तर त्यांच्याशी लग्न करण्याची आपली तयारी आहे, असा प्रस्ताव गुल बहारने त्यांच्या समोर ठेवला.

इक्बाल कैसर यांच्या म्हणण्यानुसार, "महाराजा रणजीत सिंह इतके भावूक झाले होते की त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला."

मग पंजाबच्या या महाराजांनी औपचारिकरित्या गुल बहारच्या कुटुंबियांकडे जाऊन त्यांच्या मुलीचा हात मागितला.

रणजीत सिंह यांनी आपल्याला लग्नाचं मागणी घालण्यासाठी लाहोरपासून पायी चालत अमृतसरपर्यंत यायला हवं, अशी अट गुल बहारने घातली असल्याचंही एक कथन आहे. परंतु, या कथनाला इतिहासाच्या अस्सल पुस्तकांमधून आधार मिळत नाही, असं इक्बाल कैसर सांगतात.

पंजाबच्या महाराजांसाठी शीख धर्माबाहेरच्या एका मुस्लीम मुलीशी लग्न करणं ही गोष्ट सोपी नव्हती.

अकाल तख्तने रणजीत सिंह यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली

रणजीत सिंग यांच्या निर्णयावर शीख धर्मातील काही लोकांनी नापसंती व्यक्त केली. महाराजांना अमृतसरमधील शीख तीर्थस्थान असलेल्या अकाल तख्तला बोलावण्यात आलं. शीख धर्मामध्ये अकाल तख्ताला खालसामधील सर्वोच्च स्थानी मानलं जातं.

काही ऐतिहासिक संदर्भांनुसार, अकाल तख्ताने रणजीत सिंह यांना गुल बहारशी लग्न करण्याची शिक्षा म्हणून स्वतःच्या हातांनी संपूर्ण गुरुद्वाऱ्याची फरशी पुसायला सांगितलं

परंतु, असं काही घडलं नसल्याचं आपल्या संशोधनात आढळल्याचं इक्बाल कैसर म्हणतात. "अकाल तख्ताने रणजीत सिंह यांना चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली. रणजीत सिंह यांनी या राणीसाठी ही शिक्षासुद्धा कबूल केली."

रणजीत सिंह यांना खरोखरच चाबकाचे फटके मारण्यात आले का?

त्यावेळी रणजीत सिंह यांचं वय ५० वर्षांहून अधिक होतं. पण ते महाराज होते आणि त्यांच्या राज्याची सीमा पंजाबच्या बाहेरदेखील पसरलेली होती. इतक्या प्रभावशाली व्यक्तीला कोण चाबूक मारेल? दुसऱ्या बाजूला, अकाल तख्ताने आदेश दिलेला असल्यामुळे तो नाकबूल करणंही रणजीत सिंह यांना शक्य नव्हतं.

इक्बाल कैसर यांच्या म्हणण्यानुसार, "यावर तोडगा म्हणून एक रेशमाचा चाबूक तयार करण्यात आला. या चाबकाचे फटके मारून रणजीत सिंह यांची शिक्षा पूर्ण करण्यात आली. अशा रितीने महाराजांनी "चाबकाचे फटकेही खाल्ले आणि गुल बहारला सोबतही ठेवलं."

रणजीत सिंह आणि गुल बहार यांचं हे लग्न आणि त्यावेळी झालेल्या समारंभाचं वर्णन अनेक इतिहासकारांनी विस्ताराने केलं आहे. ते लिहितात की, ज्या बुजुर्ग व्यक्तींनी लाहोर आणि अमृतसर इथं हे लग्न पाहिलं, ते नंतरही बराच काळ या समारंभाची आठवण काढत राहिले.

रणजीत सिंह यांनी मेंदीही लावली

या लग्नाचं वर्णन इतिहासकार सुजान राय यांनी 'इतिहासाचा सारांश' या पुस्तकात दिलं आहे, असं संशोधक इक्बाल कैसर म्हणतात. ते लिहितात, "महाराज रणजीत सिंह यांनी औपचारिकरित्या मेंदी लावून घेतली, सोन्याचे दागिने घातले, शाही पोशाख परिधान केला आणि हत्तीवर स्वार झाले."

"अमृतसरमधील राम बाग या भागात एक बंगला होता, तिथे हा शाही समारंभ होणार होता. हा बंगला अनेक दिवस आधी बंद करण्यात आला आणि अनेक दिवस त्याच्या सजावटीचं काम सुरू होतं. बंगला रिकामा करण्यात आल्यानंतर त्यात पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती गुल बहार होती.

लग्नसमारंभाच्या एक रात्र आधी संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मुजरे झाले आणि चरागां करण्यात आलं. या कार्यक्रमात गायलेल्यांना सात हजार रुपये पुरस्कारार्थ देण्यात आले. त्याकाळी ही मोठी रक्कम होती."

'गुल बहारच्या वाटेतील रावी नदीच्या एका ओढ्यावर पूल तयार करण्यात आला'

लग्नसमारंभ उत्साहात पार पडला. त्यानंतर शाही जोडपं अमृतसरहून लाहोरला रवाना झालं. परंतु, लाहोरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रावी नदीचा एक ओढा त्यांच्या वाटेत अडसर म्हणून पसरला होता.

दुसरं कोणी असतं तर या ओढ्यातून चालत पलीकडे गेलं असतं, पण गुल बहार आता लाहोरची राणी होती. स्वतः राणीच पालखीतून उतरून चालत ओढा पार करतेय, हे कसं शक्य होतं? गुल बहारने असं चालत जायला नकार दिला.

इक्बाल कैसर म्हणतात त्यानुसार, "या ओढ्यावर एक पूल तयार करण्यात आला, त्यावरून चालत राणीने ओढा पार केला, असं काही लोक म्हणतात."

कालांतराने हा पूल 'पूल कंजरी' या नावाने विख्यात झाला. या पुलाचा काही भाग अजूनही अस्तित्वात असून १९७१ साली पाकिस्तान आणि भारत यांच्यात झालेल्या युद्धावेळीदेखील हा पूल चर्चेचा विषय ठरला होता.

रणजीत सिंह अमृतसरला जाताना वाटेत या पुलापाशी थांबत असत, या संदर्भात उभारण्यात आलेल्या इमारती आजही तिथे अस्तित्वात आहेत, असंही काही कथनांमध्ये नमूद केलेलं आहे.

या कथनानुसार 'पूल कंजरी' हे नाव रणजीत सिंह यांची प्रेयसी मोरा सरकार हिच्याशी जोडलं जातं. मोरा हिने पायी ओढा पार करायला नापसंती दर्शवली होती.

गुल बेगमने स्वतःच्या थडग्याची निर्मिती स्वतःच केली होती का?

गुल बेगमशी लग्न केल्यानंतर आठ वर्षांनी रणजीत सिंह यांचं निधन झालं. त्यानंतर काहीच काळाने इंग्रजांनी पंजाबवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं.

रणजीत सिंह यांची शेवटची पत्नी जिन्दा हिला हद्दपार करण्यात आलं, कारण तिचा मुलगा दिलीप सिंह यालाच रणजीत यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. बहार बेगमला स्वतःचं मूल नव्हतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारला तिच्यापासून काही धोका नव्हता.

महाराजांची पत्नी असल्यामुळे गुल बेगमला मासिक भत्ता ठरवून देण्यात आला. तिला सुमारे बाराशे रुपये महिन्याला मिळत होते.

गुल बेगमने सरदार खान नावाच्या एका मुस्लीम मुलाला दत्तक घेतलं. गुल बेगमने १८५१ साली लाहोरच्या प्राचीन मियानी साहेब कबरस्तानाशेजारी एक बाग तयार केली होती. या बागेत तिने स्वतःचं थडगंही तयार करवून घेतलं होतं, असं इक्बाल कैसर सांगतात.

तिथल्या भिंतींवरील कोरीव काम तर लुप्त झालं आहे, पण मकबऱ्याच्या आतील छतावर आणि भिंतींवर काढलेली सुंदर नक्षी आजही अस्तित्वात आहे, जणू काही ही नक्षी कालच काढली असावी.

ही बाग तयार केल्यानंतर जवळपास दहा वर्षांनी गुल बेगमचा मृत्यू झाला आणि तिला तिथेच दफन करण्यात आलं.

इक्बाल कैसर सांगतात, "या मकबऱ्याच्या आतील भित्तिचित्रं खूप मूल्यवान आहेत. त्यावर पहिल्यापासूनच मुघल काळाचा प्रभाव होता. त्यानंतर यात शिखांचा सहभाग झाला आणि हे सर्व जण या मकबऱ्यामध्ये आपल्या यशाच्या रूपात अस्तित्वात आहेत.

गुल बेगम बाग आजही त्याच जागी अस्तित्वात आहे, पण तिची परिस्थिती अतिशय खालावलीय. इक्बाल कैसर यांच्या म्हणण्यानुसार, "एकेकाळी लाहोरची राणी राहिलेल्या स्त्रीची ही कबर आहे."

इक्बाल कैसर म्हणतात की, गुल बेगमकडे इतकी प्रचंड संपत्ती आणि जहागीरदारी होती की ते सगळं सांभाळण्यासाठी तिने स्वतःचा एक कोष तयार केला होता आणि ती स्वतःच या निधीची व्यवस्था पाहत असे. तिच्या मृत्यूनंतर ही संपत्ती तिचा दत्तक पुत्र सरदार खान यांना देण्यात आली.

सरदार खान यांचं कुटुंब आजही बागेजवळच्या परिसरात राहतं. गुल बेगम बागही त्यांचीच मालमत्ता आहे आणि या जागेला मोहल्ला गुल बेगम असं म्हटलं जातं. या बागेत मधोमध सरदार खान यांचीही कबर अस्तित्वात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)