You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Zealandia: 375 वर्षांनंतरही कायम आहे आठव्या खंडाचं गूढ
- Author, झरिआ गॉरवेट
- Role, बीबीसी फ्युचर
जगातील आठवा खंड शोधायला वैज्ञानिकांना 375 वर्षं लागली. अस्तित्वात असूनही सहज न दिसणाऱ्या या खंडाचं गूढ अजूनही कायम आहे.
वर्ष 1642. अनुभवी डच नाविक अबेल तास्मन मोहिमेवर निघाला होता. मोठ्या मिशा नि हनुवटीवर दाढी असलेल्या तास्मनला तिथल्या तिथे न्याय देण्याची लहर येत असे- एकदा त्याने दारूच्या नशेत असताना त्याच्या जहाजावरील कर्मचाऱ्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिण गोलार्धामध्ये एक विस्तृत खंड अस्तित्वात आहे, अशी त्याची खात्री होती आणि हा खंड शोधण्याचा त्याने निश्चय केला होता.
त्या वेळी जगाचा हा भाग युरोपीयांसाठी बहुतांशाने गूढ होता, पण या भागात मोठा जमिनीचा तुकडा असणार अशी त्यांची अढळ धारणा होती- या भागाला Terra Australis असं नावही देण्यात आलं होतं. उत्तरेकडील आपल्या खंडाचा समतोल साधण्यासाठी त्यांनी हे नामकरण केलं. प्राचीन रोमन काळापासून त्यांनी हा निर्धार केलेला होता, पण त्याची चाचणी आत्ताच होणार होती.
तर, 14 ऑगस्टला तास्मन इंडोनेशियातील जकार्ता इथल्या त्याच्या तळावरून समुद्री सफरीला निघाला. त्याच्या सोबत दोन लहान जहाजं होती. आधी ते पश्चिमेला गेले, मग दक्षिणेला गेले, मग उत्तरेला गेले आणि अखेरीस न्यूझीलंडमधील साउथ आयलँडवर जाऊन पोचले.
स्थानिक माओरी लोकांशी आलेला त्यांचा पहिला संपर्क सुखद नव्हता. दुसऱ्या दिवशी अनेक जण तराफे घेऊन समुद्रात आले आणि डच जहाजांमध्ये संदेशवहन करणारी एक छोटी होडी माओरी तराफावाहकांनी मोडून टाकली. यात चार युरोपीय मृत्युमुखी पडले. नंतर आणखी 11 तराफे आले, त्यांच्यावर युरोपीय नाविकांनी तोफेचा गोळा फेकला- यात माओरी लोकांचं काय झालं ते अज्ञात आहे.
इथे तास्मनची मोहीम संपली- या दुर्दैवी ठिकाणाला त्याने Moordenaers Bay (खुनशी उपसागर) असं नाव दिलं. यातला उपरोध त्याला जाणवला नसावा. या नवीन भूमीवर पायही न ठेवता तो अनेक आठवडे प्रवास करून पुन्हा माघारी गेला. आपण दक्षिणकडचा मोठा खंड शोधला, असं तास्मनला खरोखरच वाटत होतं, पण तिथे त्याला काही व्यापारी उद्दिष्ट गाठायचं नव्हतं. त्यामुळे तो तिथे परतला नाही.
(तोवर ऑस्ट्रेलियाबद्दलची माहिती मिळाली होती, पण आपण शोधत होतो तो दंतकथेची महती प्राप्त झालेला खंड हा नव्हे, असं युरोपीयांना वाटत होतं. मग त्यांचा विचार बदलला तेव्हा त्यांनी या खंडाचं नाव Terra Australis वरून ठेवलं).
आपला अंदाज आधीपासूनच योग्य होता, याची कल्पना तास्मनला नव्हती. एक खंड खरोखरच अज्ञात राहिलेला होता.
2017 साली भूगर्भशास्त्रज्ञांच्या एका गटाने झिलँडिया (Zealandia), माओरी भाषेत 'ते रिउ-अ-माउइ', या खंडाचा शोध लागल्याचं जाहीर केलं, तेव्हा हा विषय माध्यमांमध्ये गाजला होता. हा खंड 49 लाख चौरस किलोमीटर इतका विशाल असून, त्याचं आकारमान मादागास्करच्या सुमारे सहा पट आहे.
जगातील विश्वकोश, नकाशे व सर्च-इंजिनं हट्टी असल्यामुळे अजूनही जगातील सात खंडांचीच माहिती तिथे नोंदवलेली आहे, पण या संशोधकांनी आत्मविश्वासाने जगाला सांगितलं की, ही माहिती चुकीची आहे. एकूण आठ खंड आहेत- आणि नवीन खंड आधीचे सर्व विक्रम मोडणारा आहे. हा भूभाग जगातील सर्वांत लहान, सर्वांत निमुळता व सर्वांत तरुण खंड आहे. पण यातील पेच असा आहे की, या खंडाचा जवळपास 94 टक्के भाग पाण्याखाली आहे आणि न्यूझीलंडसारखी केवळ काही मोजकी बेटंच वरती आहेत. इतका काळ हा भाग दृष्टीस पडलेला नव्हता.
"काही गोष्टी उघड असूनही त्यांचा शोध लागायला वेळ जातो, तसं हे एक उदाहरण आहे," असं 'न्यूझीलंड क्राउन रिसर्च इन्स्टिट्यूट जीएनएस सायन्स'मधील भूगर्भशास्त्रज्ञ अँडी ट्यूलॉच सांगतात झिलँडियाचा शोध लावणाऱ्या चमूमध्ये त्यांचा सहभाग होता.
पण ही केवळ सुरुवात आहे. वरील शोधाला चार वर्षं लोटली असली, तरी या खंडाभोवतीचं गूढतेचं वलय कायम आहे. या खंडाशी निगडित अनेक रहस्यं पाण्याखालच्या 6560 फूट (2 किलोमीटर) भूभागामध्ये लपली आहेत. या खंडाची निर्मिती कशी झाली? तिथे कोण राहत होतं? किती काळ हा खंड पाण्याखाली आहे?
कष्टप्रद शोध
झिलँडियाचा अभ्यास करणं कायमच अवघड राहिलेलं आहे.
तास्मन यांनी 1641 साली न्यूझिलंडचा शोध लावल्यानंतर एक शतकानंतर ब्रिटिश नकाशाकार जेम्स कुक यांना दक्षिण गोलार्धाच्या वैज्ञानिक सफरीवर पाठवण्यात आलं. पृथ्वी व सूर्य यांच्या मधून शुक्र कसा जातो याचं निरीक्षण करून सूर्य किती दूर आहे ते मोजावं, अशी अधिकृत सूचना त्यांना मिळालेली होती.
पण त्यांच्याकडे एक बंद लिफाफा देण्यात आला होता. पहिली कामगिरी पूर्ण केल्यानंतरच हा लिफाफा उघडण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती. दक्षिणेकडील खंड शोधायच्या गोपनीय मोहिमेशी संबंधित तो लिफाफा होता. न्यूझीलंडकडे जाताना कूक त्याच खंडावरून जहाज घेऊन गेले असावेत.
स्कॉटिश निसर्गवादी सर जेम्स हेक्टर यांनी झिलँडियाच्या अस्तित्वासंबंधीच्या पहिल्या खऱ्याखुऱ्या खुणा गोळा केल्या. 1895 साली न्यूझीलंडच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या बेटांचं सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या सफरीमध्ये त्यांचा सहभाग होता. या बेटांचा भूगर्भीय अभ्यास केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, न्यूझीलंड म्हणजे 'एका पर्वतरांगेचा अवशेष आहे. ही खंडप्राय पर्वतरांग दक्षिणेपासून पूर्वेकडे पसरली असून, त्याचं हे शिखर आहे. आता ही रांग पाण्याखाली गेलेली आहे...'
ही माहिती खूप आधीच प्रकाशात आली असूनही संभाव्य झिलँडिया प्रदेशाबद्दलची इतर माहिती धूसरच राहिली आणि 1960 च्या दशकापर्यंत त्यात फारशी भर पडली नाही. "या क्षेत्रात गोष्टी खूपच संथ गतीने घडतात," असं 'जीएनएस सायन्स'मधील भूगर्भशास्त्रज्ञ निक मॉर्टिमर म्हणतात. 2017 सालच्या अभ्यासचमूचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.
अखेरीस 1960 च्या दशकात भूगर्भशास्त्रज्ञांनी खंड म्हणजे काय याची एक व्याख्या निश्चित केली. उंचवटा असलेला, विविध प्रकारचे खडक असलेला व जाड कठीण कवच असलेला भूभाग, म्हणजे खंड- या व्याख्येवर सहमती प्रस्थापित झाली. शिवाय, हा भूभाग मोठाही असणं गरजेचं होतं. "अगदी बारकासा तुकडा असून उपयोगी नाही," असं मॉर्टिमनर सांगतात. यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांना अभ्यासासाठी काहीएक आधार मिळाला- पुरावा गोळा करता आला, तर आठवा खंडही वास्तवात अस्तित्वात असल्याचं त्यांना सिद्ध करता येणार होतं.
तरीही, यासंबंधीची मोहीम ठप्प होती. खंड शोधणं अनघड व महागडं असतं आणि यात कोणतीही निकड नव्हती, हेही मॉर्टिमर नमूद करतात. नंतर, 1995 साली अमेरिकी भूभौतिकशास्त्रज्ञ ब्रुस लुयेन्डिक यांनी पुन्हा एकदा या प्रदेशाचं वर्णन खंड असं केलं आणि त्याला झिलँडिया असं म्हणण्याचं सुचवलं. यानंतर खंडाचा शोध लागण्याची प्रक्रिया घातांक वक्रासारखी झाल्याचं ट्यूलॉच म्हणतात.
दरम्यान, 'समुद्री कायद्यासंबंधीची संयुक्त राष्ट्रांची नियमचौकट' लागू झाली आणि नवीन खंडाच्या शोधाला ठोस प्रोत्साहन मिळालं. देशांना त्यांचा कायदेशीर प्रदेश 'अपवर्जक आर्थिक क्षेत्रा'पलीकडे विस्तारता येईल, त्यांच्या किनाऱ्यापासून 370 किलोमीटर दूरपर्यंतच्या समुद्री प्रदेशावर त्यांना 'विस्तारित खंडीय मंच' म्हणून दावा करता येईल आणि या प्रदेशातील खनिजांचे साठे व तेलही त्यांच्या हक्काचं राहील, असं संयुक्त राष्ट्रांच्या या दस्तावेजात म्हटलं आहे.
न्यझीलंडने स्वतःचं एका मोठ्या खंडाचा भाग असणं सिद्ध केलं, तर या देशाचा प्रदेश सहा पटींनी वाढेल. या पार्श्वभूमीवर संबंधित भागाच्या सर्वेक्षणासाठी प्रवासांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि हळूहळू या संदर्भातील पुरावा गोळा होत केला. यासाठी संकलित करण्यात आलेल्या प्रत्येक खडकाच्या नमुन्यासोबत झिलँडियाची बाजू बळकट होत गेली.
अखेरीस उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीने मोठीच पुष्टी मिळाली. जमिनीच्या तळाचं सर्वेक्षण करताना कवचाच्या विविध भागांमध्ये गुरुत्वाकर्षणात बारीकसारीक बदल असतील, तरी त्यांचा मागोवा घेण्यासाठी उपग्रहीय माहितीचा वापर करता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे झिलँडिया हा जवळपास ऑस्ट्रेलियाइतकाच मोठा ओबडधोबड भूभाग स्पष्टपणे दिसतो.
हा खंड अखेरीस जगासमोर अवतरला, तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या समुद्री प्रदेशांपैकी एका प्रदेशाची दारंही खुली झाली. "विचार केला तर, हे खूप गंमतीशीर वाटतं. पृथ्वीवरील प्रत्येक खंडामध्ये वेगवेगळे देश आहेत, पण झिलँडियावर केवळ तीन प्रदेश आहेत."
न्यूझीलंडसह या खंडावर न्यू कॅलेडोनिया (चकाकत्या सरोवरांसाठी प्रसिद्ध असलेली एक फ्रेंच वसाहत) आणि लॉर्ड होव्ह आयलंड व बॉल्स पिरॅमिड हे ऑस्ट्रेलियाचे लहानखुरे प्रदेश आहेत. यातील बॉल्स पिरॅमिड 'एका नावेहून मोठा नाही' असं वर्णन अठराव्या शतकातील एका शोधप्रवाशाने केलं आहे.
गूढ विस्तार
झिलँडिया मुळात प्राचीन गोंडवाना या महाखंडाचा भाग होता. सुमारे 55कोटी वर्षांपूर्वी हा महाखंड तयार झाला होता आणि दक्षिण गोलार्धातील जवळपास सर्व जमीन त्यात सामावली होती. पूर्वेकडील कोपऱ्यात हा महाखंड होता, आणि त्याला लागून इतर बरेच प्रदेश होते- त्यात पश्चिम अंटार्क्टिकाचा अर्धा भाग होता आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण पूर्वेकडील भाग होता.
मग सुमारे 10 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी "आपल्याला अजून पूर्णतः न आकळलेल्या एका प्रक्रियेमुळे झिलँडिया दूर खेचला गेला," असं ट्यूलॉच सांगतात.
खंडीय कवच सुमारे 40 किलोमीटर खोल आहे- महासागरी कवचापेक्षा हे बऱ्यापैकी जाड आहे. महासागरी कवच सुमारे 10 किलोमीटर असतं. झिलँडिया ताणलेल्या स्थितीत असल्यामुळे अखेरीस तो केवळ 20 किलोमीटरच्या विस्तारापुरता राहिला. नंतर हा बारकासा खंड बुडाला- सर्वसाधारण महासागरी कवचाच्या पातळीवर नसतानाही तो पाण्याखाली लुप्त झाला.
बारीक व बुडालेल्या स्थितीत असूनही झिलँडियावरील दगडांच्या प्रकारांमुळे हा खंड असल्याचं भूगर्भशास्त्रज्ञांना कळलं. खंडीय कवच सर्वसाधारणतः अग्निजन्य, रूपांतरित व गाळजन्य दगडांनी बनलेलं असतं- ग्रॅनाइट, शिस्ट व चुनखडी असे दगडांचे प्रकार यामध्ये येतात. महासागराचा तळ मात्र बेसाल्टसारख्या अग्निजन्य दगडांनीच बनलेला असतो.
पण याबद्दलच्या अनेक गोष्टी अजून अज्ञात आहे. या आठव्या खंडाच्या असाधारण उगमामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनासाठी तो विशेष गूढ राहिला आहे आणि काहीसा बुचकळ्यात टाकणाराही ठरला आहे. उदाहरणार्थ, झिलँडिया इतका बारीक असूनही छोट्या-छोट्या सूक्ष्म खंडांमध्ये विभाजित न होता एकत्र कसा राहिला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
शिवाय, झिलँडिया नक्की कधी पाण्याखाली गेला, हेदेखील एक रहस्य अजून उकललेलं नाही. हा खंड कधी कोरडा प्रदेश म्हणून अस्तित्वात होता का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. सध्या समुद्रीपातळीच्या वर असलेले या खंडाचे भाग कड्यासारखे दिसतात. काही मोजकी लहान बेटं सोडली तर हा खंड कायमच पाण्याखाली बुडालेला होता की कधीकाळी तो पूर्णतः कोरडा प्रदेश होता, याबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत, असं ट्यूलॉच सांगतात.
मग इथे कोण राहात होतं, असाही प्रश्न यातून उद्भवतो.
सौम्य हवामान आणि 10 कोटी 10 लाख चौरस किलोमीटर इतकी व्याप्ती असलेल्या गोंडवानामध्ये मोठ्या प्रमाणात वनराई व जीवसृष्टी होती- पहिले चार अवयवांचे भूचर प्राणी इथे होते आणि नंतरच्या काळात सर्वांत मोठ्या प्रमाण्यांपैकी टायटॅनोसरस होते. मग झिलँडियातील दगडांमध्ये या सृष्टीचे अवशेष जतन झालेले असतील का?
डायनासॉरसांबद्दलचा वाद
दक्षिण गोलार्धामध्ये जीवाश्म झालेले भूचर प्राणी दुर्मिळ आत, पण 1990 च्या दशकात न्यूझीलंडमध्ये अनेक प्राण्यांचे अवशेष सापडले होते. लांब शेपटी, लांब मान असणमाऱ्या महाकाय आकाराच्या डायनॉसोरच्या (सॉरोपॉड) बरगडीचं हाड, चोच असलेला शाकाहारी डायनॉसोर (हायप्सिलॉफोडन्ट) व चिलखती डायनॉसोर (अँकीलॉसोर) आदींचा यात समावेश होता.
त्यानंतर 2006 साली, साउथ आयलँडच्या पूर्वेला 800 किलोमीटरांवरील शॅथम आयलँडवर एका मोठ्या मांसाहारी प्राण्याच्या पायाचं हाड सापडलं- हा प्राणी बहुधा ऑलॉसोरच्या प्रकारातील असावा. झिलँडिया हा खंड गोंडवानापासून वेगळा झाला त्यानंतरच्या काळातीलच हे सर्व जीवाश्म आहेत, ही महत्त्वाची बाब आहे.
परंतु, झिलँडियाच्या बहुतांश भागावर डायनॉसोर फिरत होते, असाच याचा थेट अर्थ काढता येणार नाही. कदाचित बाकीची बेटं बुडाल्यामुळे ही बेटं अभयारण्यांसारखी झाली असती. "याबद्दल बराच वाद आहे. सलग जमीन नसतानाही भूचर प्राणी असू शकतात का- आणि अशी सलग जमीन तर ते नष्ट होतात का, यावर सतत चर्चा सुरू असते," असं सदरलँड म्हणतात.
न उडणारा, ठेंगणा, कल्ले व केसांसारखी पिसं असणारा किवी हा न्यूझीलंडमधील सर्वांत विचित्र व सर्वांत प्रिय रहिवासी म्हणावा लागेल, तर या रहिवाशामुळे झिलँडियाच्या कहाणीमध्येही अधिक गुंता निर्माण होतो. किवी हा पक्षी रेटाइट समूहातील आहे, पण याच समूहामधील मोआ हा पक्षी किवीचा सर्वांत जवळचा नातलग मानला गेला नाही. मोआ 500 वर्षांपूर्वी नष्ट झाला. याउलट मादागास्करमध्ये वनांवर नजर ठेवून असणारा व 800 वर्षांपूर्वी नष्ट झालेला महाकाय हत्ती पक्षी मात्र किवीचा नातलग मानला जातो.
हे दोन्ही पक्षी गोंडवानातील एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. गोंडवानाचं पूर्ण विभाजन व्हायला 13 कोटी वर्षं लागली, पण हे विभाजन झाल्यानंतर जगभरात काही तुकडे विखुरले गेले, त्यातून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, अरबी द्विपकल्प, भारतीय उपखंड व झिलँडिया यांची निर्मिती झाली.
यातून असं सूचित होतं की, आता पाण्याखाली बुडालेल्या झिलँडियातील किमान काही भाग पूर्ण वेळ समुद्रपातळीच्या वर होता. सुमारे दोन कोटी 50 लाख वर्षांपूर्वी हा संपूर्ण खंडच कदाचित संपूर्ण न्यूझीलंडदेखील- अचानक पाण्याखाली असावा, असाही एक अंदाज आहे. ""सर्व वनस्पती व प्राणी त्यानंतर इथे वस्ती करू लागले, असं मानलं जातं," सदरलँड म्हणतात.
मग नक्की काय झालं?
झिलँडियाच्या तळातून जीवाश्म संकलित करणं शक्य नसलं, तरी वैज्ञानिक जमीन खोदून या भागाच्या खोलात जायचा प्रयत्न करत आहेत. "समुद्रामध्ये अतिशय उथळ पाणी असेल, अशा ठिकाणी सर्वांत उपयोगी व वैशिष्ट्यपूर्ण जीवाश्म तयार होतात, कारण तिथे त्यांची खूण निर्माण होत असते- कित्येक अब्जावधी लहान, लहान जीवाश्म अतिशय वैशिष्ट्यपूर्ण खुणा राखून आहेत," असं सदरलँड सांगतात.
2017 साली वैज्ञानिकांच्या एका गटाने या प्रदेशाचं आत्तापर्यंतचं सर्वांत सखोल सर्वेक्षण केलं आणि सहा वेगवेगळ्या ठिकाणी 4,101 फुटांहून अधिक खोल खणलं. जमिनीवरील वनस्पतींमधील परागकण आणि उथळ समुद्री पाण्यात, उबदार जागी राहणाऱ्या जीवांची कवचं व बीजाणू, इत्यादी गोष्टी त्यांनी गोळा केल्या.
"सुमारे दहाएक मीटर खोल पाणी असेल, तर त्याच्या आसपास जमीन असण्याची शक्यता असते," असं सदरलँड सांगतात. परागकण व बीजाणू सापडले याचा अर्थ झिलँडिया खंड रूढ धारणेइतका खोलवर बुडालेला नसण्याची शक्यता आहे, असं ते म्हणतात.
शब्दशः वळण
झिलँडियाच्या आकारातही हा गूढपणा आहे.
"न्यूझीलंडचा भूगर्भीय नकाशा पाहिला, तर त्यात दोन गोष्टी ठळकपणे दिसतात," असं सदरलँड सांगतात. साउथ आयलँडला लागून असलेला सीमावर्ती निमुळता भाग म्हणजे अल्पाइन फॉल्टचा यात समावेश होतो. हा भाग अंतराळातूनही दिसतो इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे.
दुसरी ठळक गोष्ट न्यूझीलंडच्या भूगर्भीय रचनेशी निगडित आहे- या प्रदेशाची रचना विचित्र वळणाची आहे. एका आडव्या रेषेने हे दोन भाग विभाजित झालेले आहेत, तिथेच पॅसिफिक व ऑस्ट्रेलियन भूकवचं एकमेकांना मिळतात. याच बिंदूवर कोणीतही खालचा अर्धा भाग वळवून घेतल्यासारखं दिसतं. या वळणामुळे आधीची सलग दगडांची रांग मोडली जाते आणि त्यात जवळपास काटकोन होतो.
भूकवचं हलली, त्यामुळे इथे बेढब आकार निर्माण झाला, असं याचं एक साधं स्पष्टीकरण देता येईल. पण हे कसं अथवा कधी झालं, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
"याची वेगवेगळी अर्थनिर्णयन केली गेली आहेत, पण अजून हा भलामोठा प्रश्न सुटलेला नाही," असं ट्यूलॉच सांगतात.
या खंडाची सर्व रहस्यं नजीकच्या काळात उकलण्याची शक्यता नाही, असं सदरलँड सांगतात. "सगळंच दोन किलोमीटर पाण्याखाली असल्यामुळे शोध घेणं खूप अवघड आहे. नमुना संकलित करायला लागणारे स्तर समुद्रतळाच्या 500 मीटर खाली आहेत. तिथे जाऊन अशा खंडाचा शोध घेणं खरोखरच आव्हानात्मक आहे. त्यात बराच वेळ, पैसा व प्रयत्न गुंतवावे लागतात, शिवाय अनेक जहाजं घेऊन या प्रदेशाचं सर्वेक्षण करावं लागतं, " असं ते म्हणतात.
बाकी काही नाही झालं तरी, तास्मन यांच्या शोधमोहिमेनंतर जवळपास 400 वर्षांनी जगातील हा आठवा खंड बऱ्याच अज्ञात गोष्टींच्या खुणांचे संकेत देतोय, एवढं तरी नक्की.
(झोरिया गॉरवेट बीबीसी फ्यूचरमध्ये वरिष्ठ पत्रकार आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)