नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं नातं नेमकं कसं आहे?

शरद पवार आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Sharad Pawar/facebook

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आधी टीका केली. त्यानंतर राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या फेअरवेलच्या निमित्तानं मोदींनी पवारांची स्तुती केली. त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.

शरद पवार यांनीही वेळोवेळी नरेंद्र मोदींवर टीका केली. 2018 मध्ये राज ठाकरेंना दिलेली मुलाखत असो की आताचं शेतकरी आंदोलन, शरद पवार यांनी मोदींवर टीका केल्याचं दिसून येतं.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं नातं नेमकं कसं आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी एकमेकांविषयी केलेल्या वक्तव्यांवर एकदा नजर टाकूया.

टीका-स्तुती-टीका

शरद पवार शेती कायद्यांवरून यू-टर्न घेत असल्याचं मत मोदींनी राज्यसभेत (8 फेब्रुवारी) व्यक्त केलं.

त्यांनी म्हटलं, "मी शेती सुधारणांच्या बाजूनं आहे, असं वक्तव्य पवारांनी केलं. कृषी कायद्यांतील पद्धतीविषयी त्यांच्या मनात प्रश्न आहेत. त्यांनी सुधारणांना विरोध केलेला नाहीये. पण, आता मी हैराण आहे. कारण त्यांनी आता अचानक यू-टर्न घेतला आहे."

यानंतर दुसऱ्याच दिवशी (9 फेब्रुवारी) राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं मोदींनी पवारांचं कौतुक केलं.

त्यांनी म्हटलं, "शरद पवार आणि गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेते संसद आणि देशाच्या प्रश्नांना प्राथमिकता देणारे नेते आहेत."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पुढच्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना मात्र मोदींनी पवारांवर पुन्हा टीका केली.

"एपीएमसी कायदा बदलला आहे असं गर्वानं कोण सांगत होतं, 24 असे बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं, तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलटं बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता का निवडला आहे अशी शंका येते," असं मोदींनी म्हटलं.

शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. मोदींनी केलेल्या या टीकेला त्यांनी उत्तर दिलं.

त्या म्हणाल्या, "मोदींनी यु-टर्न हा शब्द वापरला त्यामुळे मला या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल सांगायचं आहे. मनमोहन सिंग सरकारने जीएसटी आणलं होतं, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केला होता. आम्ही आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयकं आणली. जेव्हा ही विधेयकं आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, त्यांचं मत मागवूनच कायदे करण्यात आले.

"मनरेगामुळे कोरोना संकटात नोकरी गेलेल्यांना रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नाही."

नरेंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.

फोटो स्रोत, narendramodi.in

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.

पण, हा झाला आताचा मुद्दा. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी यापूर्वीही एकमेकांविषयी वक्तव्यं केली आहेत. यात कधी एकमेकांची स्तुती आहे, तर कधी एकमेकांवर टीका केली आहे.

2014मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याच्या उद्देशानं नवीन सरकार बनवण्यासाठी शरद पवारांनी भाजपला विनाशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर 2016मध्ये पुण्यात शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी मोदींनी आणि पवारांनी एकमेकांवर अक्षरश: स्तुतीसुमनं उधळली.

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं," अशी प्रतिक्रिया मोदींनी यावेळी दिली.

नरेंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.

फोटो स्रोत, @NCPspeaks

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.

पवारांनीही यावेळी मोदींची स्तुती करताना म्हटलं, "पंतप्रधान मोदी काल जपानमध्ये होते. आज सकाळी ते गोव्यात होते. दुपारी ते बेळगावमध्ये होते आणि आता ते पुण्यात आहेत. मला माहित नाहीत ह्या कार्यक्रमानंतर ते कुठे जाणार आहेत. पण ह्यावरुन आपल्याला दिसतं की, ते देशासाठी पूर्णपणे समर्पित आणि आपल्या शब्दाला कटीबद्ध आहेत."

2019मधील विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं.

राज्यात सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू असतानाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली.

या भेटीविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी म्हटलं, "अतिवृष्टीच्यासंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी थांबण्यास सांगितलं आणि आपण एकत्रित काम केल्यावर आनंद होईल असं ते म्हणाले. मात्र आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत ते राहतीलही, पण आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही, असं मी त्यांना म्हटलं."

नरेंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.

फोटो स्रोत, @PIB_India

पण, 2019च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वरच्या स्तरावर चर्चा झाल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी म्हटलं , "राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपसोबत येण्यासाठी थेट शरद पवारांनीच ऑफर दिली होती. वरच्या लेव्हलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो."

त्यामुळे मग नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या संबंधांबाबतची ही पार्श्वभूमी बघता या दोघांचं नातं नेमकं कसं आहे, असा प्रश्न पडतो.

'इस रिश्ते को कोई नाम ना दू'

नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं नात म्हणजे 'इस रिश्ते को कोई नाम ना दू', या हिंदी चित्रपटातील गाण्यासारखं असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस व्यक्त करतात.

त्या सांगतात, "नरेंद्र मोदी शरद पवारांच्या 75व्या वाढदिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले होते. तिथं त्यांनी पवारांची खूप स्तुती केली. आता मात्र ते पवारांवर टीका करत आहेत.

"या दोघांमध्ये मैत्री आहे आणि ते एकमेकांचा आदर करतात. एकमेकांवर टीका किंवा प्रशंसा करतात, याचा अर्थ दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवर एक कनेक्ट नक्की आहे. दुसरं म्हणजे दोघेही प्रचंड व्यावहारिक नेते आहेत. त्यामुळे एकमेकांविषयी कधी काय बोलायचं हे त्यांना चांगलं समजतं."

नरेंद्र मोदी आणि शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

पण, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं नातं तोवर चांगलं होतं जोवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनलं नव्हतं, असं मत राजकीय विश्लेषक मनोरंजन भारती मांडतात.

त्यांच्या मते, "शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत, त्यांनी शेती क्षेत्रात चांगलं काम केलंय, असे प्रशंसोद्गार मोदींनी काढले आहेत. पण, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मात्र यामागे शरद पवारांचाच हात असल्याचं भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपासून सगळ्यांनाच वाटतं. यामुळे आता या दोघांमधील संबंध बिनसले आहेत."

ते पुढे सांगतात, "2024च्या लोकसभा निवडणुकीत सरकार कुणाचं येईल आणि त्याचा चेहरा कोण राहिल, याबाबत आता संदिग्धता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आरजेडी या विरोधकांना एकत्र करून शरद पवार आघाडी करू शकतात आणि या आघाडीचा चेहरा होऊ शकतात. त्यामुळेही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत."

पवारांवर नव्हे, विरोधकांवर टीका

नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर वैयक्तिक टीका केलेली नाहीये. त्या दोघांचे संबंध चांगले आहेत, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे मांडतात.

ते सांगतात, "शेती कायद्यांवर बोलताना मोदींनी काँग्रेसच्या काळातील कृषी मंत्री शरद पवारांनी यू-टर्न घेतला, असं म्हटलं आहे. मोदींनी यातून काँग्रेसवर टीका केली आहे. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

"कारण शरद पवार सध्या अॅक्टिव्ह असल्याची चर्चा सुरू आहे. ते इतर विरोधकांना एकत्र घेऊन एक मोर्चा बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी अशापद्धतीनं टीका केली आहे."

शरद पवार आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Sharad Pawar/facebook

पण, मग शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असताना ते राज्यात एकत्र सत्ता स्थापन का करत नाही, असा प्रश्न पडतो.

या प्रश्नावर आदिती फडणीस उत्तर देतात, शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही वर्चस्व राहणार नाही. मोदी-शहा जे म्हणतील ते त्यांना ऐकावं लागेल.

तर मनोरंजन भारती यांच्या मते, शरद पवार भाजपसोबत जाऊ शकत नाही. कारण त्यांचा डीएनए तसा नाही. ते जुने काँग्रेसी नेते आहेत.

मित्रपक्षांमध्ये धाकधुक?

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध जिव्हाळ्याचे असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मग महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये धाकधुक निर्माण होते का, असाही प्रश्न उपस्थित होतो.

याविषयी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी सांगतात, "शरद पवार यांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे वैयक्तिक संबंध राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. पवारांचे वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांशी संबंध आहेत, हाच धागा पकडून त्यांच्याविषयी ते अविश्वसनीय आहेत, कोणत्या क्षणी कोणता राजकीय निर्णय घेऊ शकतात, हे सांगता येत नाही, अशाप्रकारची अविश्वसनीयता निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात आलाय.

"असं असलं तरी पवारांनी नेहमीच या अविश्वसनीयतेला फाटा देणारी भूमिका घेतली. त्यांनी नेहमीच भाजपविरोधी भूमिका घेतली. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जी आघाडी झाली, तिचे शिल्पकार पवारच आहेत. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी चर्चा होत असते. पण, महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर होईल असं विधान किंवा भूमिका शरद पवारांनी गेल्या वर्षभरात घेतली नाही. किंबहुना हे सरकार शरद पवारांमुळेच टिकून आहे, अशी सर्वसामान्य जनतेमध्ये भावना आहे."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)