प्रियंका गांधी: 'काँग्रेसचं सरकार आलं तर कृषी विधेयकं मागे घेऊ'

काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द करू, अशी घोषणा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातल्या सहारणपूरमध्ये किसान महापंचायतला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत हे नवीन कायदे अब्जाधिशांच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

तसंच कायदे रद्द होत नाहीत, तोवर शेतकऱ्यांनी मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या, "हे आंदोलन तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आता मागे हटू नका. कायदे रद्द होत नाही, तोवर आम्ही तुमच्या सोबत आहोत. काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा हे तिन्ही कायदे रद्द करण्यात येतील आणि तुम्हाला संपूर्ण हमी भाव मिळेल."

त्या पुढे म्हणाल्या, "1955 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी साठेबाजीविरोधातला कायदा केला. मात्र, भाजप सरकारने हा कायदा रद्द केला. नवीन कायद्यामुळे अब्जाधिशांचाच फायदा होणार आहे. शेतकऱ्याच्या पिकाला किती माल द्यायचा, हे तेच ठरवतील."

इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत प्रियंका गांधी म्हणाल्या, "पंतप्रधानांचं हृदय केवळ भांडवलदारांसाठीच धडधडतं. शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलं जातं. मोदीजी चीन आणि पाकिस्तानला जातात पण दिल्लीच्या सीमेवर भेट देत नाहीत."

26 नोव्हेंबर 2020 पासूनच शेतकरी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. काँग्रेसने तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

त्यात उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने पश्चिम उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचे मेळावे घ्यायची योजना आखली आहे. यातला पहिला मेळावा, सहारणपूरमध्ये घेण्यात आला.

दरम्यान, हा मेळावा म्हणजे काँग्रेसचं नाटक असल्याची टीका उत्तर प्रदेश भाजपने केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)