राज ठाकरे-उद्धव ठाकरे हे नेते मुंबई मनपासाठी अमराठी मतदारांना जवळ करत आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"उत्तर भारतीय लोंढे महाराष्ट्रात येण्यापासून रोखणं गरजेचं आहे," अशी टीका करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बुधवारी (10 फेब्रुवारी) मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेही गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी 'मुंबई मा जिलेबी ने फाफडा उद्धव ठाकरे आपडा' ही मोहीम सुरू केली.
मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 'मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे' राजकीय पक्ष म्हणून केली. मराठी माणसासाठी म्हणून उदयास आलेले हे राजकीय पक्ष आता मात्र उत्तर भारतीय, गुजराती मतदारांना आकर्षित करताना दिसतात.
आपल्या पक्षात शेकडो उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचे प्रवेश करून मनसे आपली उत्तर भारतीय विरोधी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करतेय का? आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे 'मुंबई फक्त मराठी माणसाची' या आपल्या मूळ भूमिकेला बगल देत आहेत का? मुंबईत मराठी मतदारांचा घसरलेला टक्का याला कारणीभूत आहे का? या प्रश्नांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
'आम्ही कोणाच्या प्रवेशासाठी जिलेबी-फाफड्याचे मेळावे नाही लावले'
साधारण दोन वर्षांपूर्वी मुंबईत उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवरच निशाणा साधला होता.
महाराष्ट्रात दररोज 48 रेल्वे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून भरून येतात आणि रिकाम्या परत जातात असं ते म्हणाले होते. "इकडे गुन्हे करायचे आणि तिकडे पळून जायचे." असंही ते म्हणाले. पण याच भाषणात शेकडो उत्तर भारतीयांच्या उपस्थितीत त्यांनी उत्तर भारतीयांना सुधारा नाहीतर आम्ही आहोतच अशा इशाराही दिला.

फोटो स्रोत, MNS/twitter
"मला संघर्ष करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या लोकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांनी तुमचे ऐकले नाही तर आम्ही आहोतच," असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (10 फेब्रुवारी) जवळपास 500 उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात टोकाचा विरोध करणारी मनसे उत्तर भारतीयांना साद घालण्याचा प्रयत्न का करत आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आमच्या पक्षात कार्यकर्ते स्वत:हून प्रवेश करत आहेत. आम्ही काय त्यांच्यासाठी जिलेबी-फाफड्याचे मेळावे नाही लावले."

फोटो स्रोत, SocialMedia
"भाजपमध्ये मुस्लीम कार्यकर्ते प्रवेश करतात तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा धरला असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान करणारे सगळेच आमच्यासाठी मराठी आहेत," असंही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपसोबत युती करण्यासाठी राज ठाकरेंचा प्रयत्न?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपला अयोध्या दौरा जाहीर केला. 1 ते 9 मार्चदरम्यान ते अयोध्येत जाणार आहेत.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं, "राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यानची एखादी तारीख निश्चित करणार आहेत आणि अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहेत."
अयोध्या दौरा आणि उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मनसेत होणारा प्रवेश म्हणजे उत्तर भारतीयांच्या मनात आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो असं जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं भाजपनं स्वागत केलं. अयोध्येला सगळ्यांनीच गेलं पाहिजे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले होते.
राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे एकत्र लढवणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
2012 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी गुजरात दौरा केला होता.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "भाजपसोबत जाण्यासाठी मनसेला आपली उत्तर भारतीय विरोधी प्रतिमा बदलावी लागेल. यासाठी उत्तर भारतीयांना जवळ करणं गरजेचे आहे. अयोध्येचा दौरा असो वा उत्तर भारतीयांचा मनसेतला प्रवेश. भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युती करण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे यात शंका नाही."
केवळ मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्येच शिवसेना आणि मनसेला मराठी अस्मितेच्या मुद्यावर राजकारण करण्याची संधी आहे. त्यातही मराठी मतदारांचे विभाजन निश्चित आहे. अशा परिस्थितीत मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांना मराठी मतदारांना सोबत घेऊन अमराठी मतदार आपल्याकडे कसे वळतील यासाठी काम करावे लागणार आहे.

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "मराठी लोकसंख्या तुलनेने मुंबईत कमी होत आहे. त्यामुळे मनसेला केवळ मराठी अस्मितेच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे. शिवाय, भाजपच्या जवळ जायचे असल्यास उत्तर भारतीयांबाबत आक्रमक भूमिका घेता येणार नाहीत."
"मनसेत उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी प्रवेश केला याचा अर्थ राज ठाकरे आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मनसे भविष्यात उत्तर भारतीय विरोधी मुद्दे टाळताना दिसेल. राज ठाकरे दोन वर्षांपूर्वीही उत्तर भारतीय संमेलनात गेले होते. यापुढेही ते अशा कार्यक्रमांना हजेरी लावतील. यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो."
आगामी काळात मुंबई आणि ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील. शिवसेना आणि मनसेला या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मोठा जनाधार आवश्यक आहे.
राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आगामी निवडणुका केवळ मराठीच्या मुद्दयावर लढवता येणार नाही, याची राज ठाकरे यांना कल्पना आहे. आता पुढील काळात ज्या निवडणुका होत आहेत त्या मुंबई-ठाणे या भागात आहेत आणि या भागात केवळ मराठीच्या मुद्द्यावर उभं राहता येणार नाहीये."

फोटो स्रोत, NURPHOTO
"त्यामुळे एकीकडे मराठीचा मुद्दा, तर दुसरीकडे अयोध्येला जाण्याची घोषणा, असं धोरण मनसे आखताना दिसत आहे. यातून राज ठाकरे यांचा उत्तर भारतीयांच्या मनात आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. याचा त्यांना किती फायदा होईल, हे नंतर समजेल."
'अमराठी मुद्यावरून राज ठाकरे आणि आमची भूमिका वेगळी'
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मनसे-भाजप एकत्र येण्याची चर्चा फेटाळून लावली आहे.
ते म्हणाले, "मनसेने जरी हिंदुत्व घेतलं असलं तरी मराठी माणसाला न्याय देताना अमराठी माणसांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आमच्या विचारांमध्ये फरक आहे. एकत्र येण्याची कोणतीही चर्चा नाही."
अमराठी मतदारांशी सुसंगत भूमिका न घेणं हा मनसे आणि भाजपच्या युतीतील सर्वात मोठा अडथळा आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.
मुंबईत मराठी टक्का किती?
मुंबई महानगर असले तरी मराठी ही मुंबईची ओळख आहे. पण देशाची आर्थिक राजधानी आणि कामाची संधी यामुळे देशभरातून लोक रोजगारासाठी मुंबईत दाखल होतात. यामुळे हिंदी भाषिकांची संख्या वाढत आहे.

लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका बातमीनुसार, मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे असं 2011 चा जनगणना अहवाल सांगतो. 2001 मध्ये मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 25.88 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 35.98 लाख झाले.
त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत 2.64 टक्के घट झाली. 2001 साली 45.23 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले.
यानुसार मुंबईत मराठी टक्का घसरला असून अमराठी टक्का प्रचंड मोठ्या संख्येने वाढला आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
शिवसेनेने 2003 मध्येच 'मी मुंबईकर' या मोहिमेला सुरुवात केली होती. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसासह इतर भाषा आणि धर्माच्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता.
तर सलग 13-14 वर्षे केवळ मराठी भाषा आणि मराठी माणासाच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या मनसेने गेल्या वर्षभरापासून हिंदुत्ववादाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडला आहे.
त्यामुळे शिवसेना - मनसेत मराठी मतदारांसाठी होणारी रस्सीखेच आता हिंदी भाषिकांसाठीही दिसण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









