You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IndvsEng: भारत-इंग्लंड मालिका दोन स्वतंत्र नावांनी का खेळवण्यात येते?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारत आणि इंग्लंड संघ टेस्ट सीरिजमध्ये आमनेसामने आहेत. ठिकाण बदलतं तसं ट्रॉफीचं नाव का बदलतं?
भारत आणि इंग्लंड संघ भारतात टेस्ट सीरिजमध्ये आमनेसामने येतात तेव्हा मालिकेचं नाव अँथनी डी मेलो मालिका असं असतं. मात्र जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर टेस्ट सीरिजकरता जातो तेव्हा त्या मालिकेचं नाव पतौडी ट्रॉफी नाव असं असतं. दोन संघ सारखे पण खेळण्याचं ठिकाण बदललं की मालिकेचं नाव बदलतं- असं कसं? असं तुम्हाला वाटू शकतं. त्यामागे गोष्ट आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपले दिवंगत पती मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ भारत-इंग्लंड मालिकेला त्यांचं नाव देण्यात यावं अशी विनंती बीसीसीआयला केली. यावर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत-इंग्लंड मालिकेला 1951 पासून अँथनी डी मेलो यांचं नाव देण्यात आलं आहे. ते बदलून पतौडी ट्रॉफी करता येणार नाही असं बीसीसीआयने सांगितलं.
अँथनी डी मेलो हे बीसीसीआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ते बीसीसीआयचे पहिले सचिव होते. त्यांना आदरांजली म्हणून भारत-इंग्लंड मालिका त्यांच्या नावाने खेळवली जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा खंडित करता येणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.
इंग्लंडस्थित मेरलीबोन क्रिकेट क्लबने टायगर पतौडी यांच्या स्मरणार्थ भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज विजेत्या संघाला त्यांच्या नावाने चषक देण्याचं ठरवलं. भारत-इंग्लंड यांच्यात 1932 मध्ये झालेल्या पहिल्या मालिकेला 75 वर्ष झाली. त्यानिमित्ताने पतौडी ट्रॉफी विजेत्या संघाला देण्याचं ठरलं. मात्र बीसीसीआयने यावर मोहोर उमटवली नाही. यासंदर्भात शर्मिला यांनी तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना इमेल करून नाराजीही व्यक्त केली होती.
मन्सूर अली खान उर्फ टायगर पतौडी हे नवाब पतौडी म्हणून प्रसिद्ध होते. अवघ्या 21व्या वर्षी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी सांभाळली. प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे होता.
पतौडी यांनी 46 टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना, 34.91च्या सरासरीने 2793 रन्स केल्या. त्यांनी 40 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्वही केलं. 22 सप्टेंबर 2011 रोजी पतौडी यांचं निधन झालं.
अँथनी डी मेलो कोण होते?
डी मेलो यांचा जन्म कराची इथला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण कराचीतच झालं. पुढचं शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झालं होतं. डी मेलो क्रिकेट खेळायचे.
1926मध्ये मेरलीबोन क्रिकेट क्लब संघाने भारताचा दौरा केला. एमसीसी क्लबतर्फे एमसीसीचे अध्यक्ष रेमंड इस्टॅयुक ग्राँट कोव्हान आणि कर्णधार ऑर्थर गिलीगन यांनी पतियाळाच्या महाराजांशी चर्चा केली. भारताला तेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. परंतु देशातल्या क्रिकेटच्या नियंत्रणासाठी सर्वसमावेशक संघटना असावी असं त्या बैठकीत ठरलं. अशी संघटना तयार झाली तर भारताला टेस्ट खेळण्याचा मान मिळेल.
बीसीसीआयच्या स्थापनेत डी मेलो यांचा पुढाकार होता. बॉम्बे जिमखाना इथे झालेल्या बैठकीत डी मेलो बीसीसीआयचे पहिलेवहिले सचिव झाले. ग्राँट गोव्हन संघटनेचे पहिले अध्यक्ष झाले.
आयसीसीचं तेव्हाचं नाव इंपीरियल क्रिकेट कॉन्फरन्स असं होतं. डी मेलो यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. 1932मध्ये भारताला टेस्ट खेळण्याचा मान मिळाला.
मुंबईस्थित क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचेही ते सचिवव होते. 1934मध्ये डी मेलो यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची संकल्पना बीसीसीआयच्या बैठकीत मांडली. त्यातूनच रणजी ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात झाली. रणजीतसिंहजी यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे.
मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियमच्या उभारणीत डी मेलो यांची भूमिका महत्त्वाची होती. नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या स्थापनेतही ते अग्रणी होते.
1951मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचं शिवधनुष्य डी मेलो यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने उचललं. बर्लिन ऑलिम्पिकवेळी उपस्थित असलेल्या डी मेलो यांनी तत्कालीन भारतात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन होईल अशी स्टेडियम्स, सराव सुविधा, सुरक्षाव्यवस्था उभारली. आज आशिया खंडातील खेळाडूंसाठी मिनी ऑलिम्पिक असणाऱ्या या स्पर्धेची मुहुर्तमेढ डी मेलो यांनी रोवली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)