You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला, 'आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी'
आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
ते माध्यमांशी बोलत होते.
शेतकरी आंदोलनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, "शेतकरी आंदोलनाबाबत सरकारनं पुढाकार घ्यायची गरज आहे. यासाठी हायेस्ट लेव्हलने जर प्रयत्न केला तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी.
"स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. आंदोलक रस्त्यानं येऊ नये म्हणून रस्ता बंद करण्याची भूमिका सरकारनं घेतली. ही टोकाची भूमिका घेतल्यावरून सरकारचं धोरण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय, तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "इतके दिवस जर शेतकरी ते रस्त्यावर बसतायत, तर त्याचा विचार करायला पाहिजे. त्यालाच आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रतिसाद दिला गेला. सहानुभूती व्यक्त होऊ लागली. हे का घडलं, तर देशाच्या पंतप्रधानांनी एकदा अमेरिकेत असताना इथून पुढे देशात मोदी-शाह राज्य करतील, असं म्हटलं होतं. आता त्याची प्रतिक्रिया दिसून येत आहे.
"लता मंगशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील."
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याविषयी पवार म्हणाले, "ती जागा काँग्रेसची. त्यामुळे त्यात काही वेगळा विषय असायचं कारण नाही. पण ज्यावेळी असा निर्णय घेतला जातो त्यावेळेस चर्चा करणं अपेक्षित असतं."
कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राविषयी पवारांनी सांगितलं, "माझ्या पत्रात म्हणलंय की, मी कृषीमंत्री असताना सगळ्या राज्यातल्या कृषीमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर एक समिती नेमली. चर्चा झाल्यानंतर देशातल्या सगळ्या राज्यांना कळवलं. कारण कृषी हा राज्याच्या अखत्यारित येणार विषय आहे.
"त्यामुळे दिल्लीत केलेल्या कायद्याचा राज्यांनी विचार करावा, असं पत्र मी लिहिलं होतं. शेती हा राज्याच्या अखत्यारित येणार विषय असेल तर राज्यांनी त्यात पुढाकार घ्यावा, असं माझं मत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)