You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फासा आम्हीच पलटणार-फडणवीस #5मोठ्या बातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. फासा आम्हीच पलटणार-फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं विधान फडणवीस यांनी केलं आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे असं ते म्हणाले.
घटनात्मकरित्या मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख नाहीत. तर राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची नेमणूक करत असतात. त्यामुळे त्यांच्या बाबत बोलताना जपूनच बोललं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
2. श्रीमंताच्या घरातील कावळादेखील मोर दिसतो- सिद्धू
"श्रीमंताच्या घरातील कावळादेखील मोर दिसतो आणि गरिबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?" अशा आशयाचं ट्वीट काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
अमीर के घर में बैठा कौआ भी मोर नजर आता है
एक गरीब का बच्चा क्या तुम्हे चोर नजर आता है?
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धू यांनी काही वर्ष समालोचन केलं. लाफ्टर शो मध्ये जज म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
सिद्धू यांनी अनेकदा कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो.
आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेलं नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे असं सिद्धू यांनी आधीच्या एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
3. राज्यातील वसतीगृहांना मातोश्री हे नाव दिलं जाणार
"आईचं प्रेम घरामध्ये मुलांना ज्याप्रमाणं मिळतं. त्याचप्रकारचं प्रेम मुलांना वसतीगृहात मिळावं या संकल्पनेतून एका स्तुत्य निर्णयातून वसतीगृहाच्या शासकीय इमारती आणि यापुढील उच्च व तंत्रशिक्षण विभागाची सर्व वसतीगृह 'मातोश्री' या नावानं ओळखली जातील", असं उदय सामंत म्हणाले. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
4. नागपुरातील पतंजली फूड पार्क अडचणीत
नागपूर इथल्या मिहान नॉन-सेझमध्ये 230 एकरचा भूखंड घेऊन वेळेत उद्योग सुरू न केल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने या भूखंडावरील मालकी हक्क सोडा, अशी नोटीस रामदेवबाबांच्या 'पतंजली फूड अँड हर्बल पार्क' या कंपनीला बजावली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
रामदेवबाबा यांच्या पंतजली समूहाने विदर्भातील संत्री उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सांगत मिहान-नॉन सेझमध्ये सप्टेंबर 2016 ला जमीन घेतली.
सहा महिन्यांत उद्योग सुरू करण्याची घोषणा करीत या उद्योगातून विदर्भातील दहा हजार युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावाही केला. परंतु आजपर्यंत येथे गोदाम बांधणे आणि सयंत्र स्थापित करण्याचे काम पूर्ण झाले नाही.
सध्या ती कामेदेखील थांबवण्यात आली आहेत. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या तपशिलानुसार पतंजली समूहाला भूखंडावरील मालकी हक्क सोडण्यास नोटीस बजावण्यात आली आहे.
5. अर्जुन तेंडुलकर आयपीएल लिलावात
इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी लिलाव 18 ऑक्टोबरला होणार असून, त्यासाठी हजारहून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
लिलावासाठी 813 भारतीय तर 283 विदेशी खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. अर्जुनचं नाव पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात आलं आहे. लिलावात कोणता संघ अर्जुनला ताफ्यात समाविष्ट करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. अर्जुनने आपली बेस प्राईज 20 लाख रुपये ठेवली आहे. 18 फेब्रुवारीला चेन्नईत लिलाव होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत अर्जुन मुंबईसाठी खेळला होता. क्रिकेटविश्वातल्या सार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा मुलगा असलेल्या अर्जुनने लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. विविध वयोगट स्पर्धांमध्ये त्याने आपल्या खेळाची चमक दाखवली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)