You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस- शरजील उस्मानीच्या 'त्या' वक्तव्याची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करावी
पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. "आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं होतं.
शरजील याच्या या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात शरजील उस्मानी यांची विधानं शब्दशः नमूद केली आहेत.
'एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी पुढं लिहिलं आहे, की हा प्रकार समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून अशा विधानांचे परिणाम काय असतात यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल.
एल्गार परिषदेच्या माध्यमातून आधी काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चूक होते हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येत असल्याचंही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
'एखाद्या आयोजनाला परवानगी दिली म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय,' असं फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)