मुन्शी अब्दुल करीमः महाराणी व्हिक्टोरिया यांचे भारतीय सेवकाशी प्रेमसंबंध होते?

फोटो स्रोत, Getty Images/Victoria & Abdul
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या 13 वर्षांतला मोठा काळ त्यांचे भारतीय मुन्शी अब्दुल करीम यांच्यासोबत घालवला. करीम यांना महाराणीचे सेवक म्हणून आग्राहून आणण्यात आलं होतं. मात्र, हळू-हळू करीम महाराणी व्हिक्टोरिया यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींच्या पक्तींत जाऊन बसले आणि सर्व प्रकारचा विरोध होऊनदेखील हे नातं महाराणी हयात असेपर्यंत टिकले.
या दोघांमधल्या संबंधाची व्याख्या कशी करायची? मी हाच प्रश्न 'Victoria and Abdul - The True Story of Queens Confident' या पुस्तकाच्या लेखिका श्रबनी बसू यांना विचारला.
बसूंचं उत्तर होतं, "खरंतर या संबंधाला अनेक पदर आहेत. कुठल्याही एका व्याख्येत ते सांगता येणार नाही. त्यावेळी महाराणी वयाच्या सत्तरीत होत्या. अब्दुल करीम बरेच तरुण होते. ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांचं वय जेमतेम 24 वर्ष होतं. ते दिसायला देखणे होते. दोघांमध्ये आकर्षण नक्कीच होतं.
महाराणींच्या ज्युबिली समारोहासाठी आग्र्याहून दोन टेबल वेटर पाठवण्यात आले होते. महाराणींनी त्यापैकी अब्दुल करीम यांची निवड केली. करीममुळे त्यांना भारताला जवळून ओळखण्याची संधी मिळाली."
"महाराणींना भारताविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा होती. त्या 'मलिका-ए-हिंदुस्तान' होत्या. मात्र, त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या. अब्दुल करीम त्यांच्यासाठी एकप्रकारे भारत होते. त्यामुळे हे दोन व्यक्तींमधलं नाही तर दोन देशांमधलं आकर्षण होतं.
कधी-कधी त्या आपल्याला करीम यांच्या आईच्या रुपात भेटतात. तर कधी त्यांच्या जीवलग मैत्रीण असाव्यात असं वाटतं.
एक-दोन पत्रांमध्ये महाराणी करीम यांना उद्देशून लिहितात, 'तू माझ्यासाठी काय आहेस, हे तुला माहितीच नाही.' काही पत्रांमध्ये शेवटी त्यांनी तीन X काढल्या आहेत. हे चुंबनाचं चिन्ह आहे. भारताची सम्राज्ञी एका सामान्य पुरुषाला खुलेआम पत्र लिहिते, याची मला फार उत्सुकता वाटली."
आग्रा तुरुंगात क्लार्क होते करीम
करीम यांना आग्र्याहून महाराणींच्या सेवेसाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र, 'किचन बॉय' ते महाराणींचे खास मुन्शी हा प्रवास त्यांनी अवघ्या वर्षभरात पूर्ण केला.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
श्रबनी बसू सांगतात, "करीमची कहाणी खूप रंजक आहे. ते आग्रा तुरुंगात क्लार्क होते. त्यांचं वार्षिक उत्पन्न 60 रुपये होतं. त्यांचे वडीलही त्याच तुरुंगात 'हकीम' होते. महाराणींचा ज्युबिली समारोह जवळ असताना तुरुंग अधीक्षकांच्या मनात महाराणींसाठी भेट पाठवण्याचा विचार आला.
भेट म्हणून त्यांनी दोन भारतीय सेवक पाठवले. त्यांच्यासाठी विशेष रेशमी गणवेष शिवण्यात आले. शिवाय, ते अधिक देखणे दिसावे, यासाठी पगड्याही देण्यात आल्या. मात्र, हळू-हळू महाराणी आणि अब्दुल करीम यांच्यातली जवळीक वाढली."
महाराणी ऊर्दू शिकल्या
महाराणी व्हिक्टोरिया यांच्यावर अब्दुल करीम यांचा इतका प्रभाव होता की त्यांनी करीम यांना ऊर्दू शिकवण्यास सांगितलं. करीम महाराणींच्या नोटबुकमध्ये ऊर्दूत एक ओळ लिहायचे. त्यानंतर त्या ओळीचा इंग्रजी अनुवाद लिहायचे आणि त्यानंतर ऊर्दूतलं वाक्य रोमन लिपीत लिहायचे. महाराणी तेच वाक्य अगदी तसच्या तस वहीत लिहून काढत.
श्रबनी बसू सांगतात, "महाराणींना ऊर्दू शिकायची होती. करीम त्यांचे शिक्षक बनले आणि त्या 13 वर्ष ऊर्दू शिकल्या. महाराणी व्हिक्टोरियांना ऊर्दू लिहिता-वाचता यायचं, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराणींना याचा अभिमानही होता. त्यांनी आयुष्याच्या संध्याकाळी एक नवी भाषा शिकायचं ठरवलं आणि त्या शिकल्याही, हे आजच्या काळात जरा विचित्र वाटू शकेल. त्या प्रवासात असो किंवा सुट्टीसाठी बाहेर गेलेल्या असो, त्यांनी आपल्या ऊर्दू शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. रोज रात्री थोडा वेळ त्या ऊर्दू शिकण्यासाठी राखून ठेवत."
वर्षभरातच ऊर्दूवर प्रभुत्व
महाराणी व्हिक्टोरिया यांच्या ऊर्दू प्रेमावर लंडन विद्यापीठातील प्राध्यापक हुमायूं अन्सारी यांनीही बरंच संशोधन केलं आहे.
प्रा. अंसारी सांगतात, "महाराणी आपल्या डायरीत ऊर्दूमध्ये लिहितात, 'आजचा दिवस खूप चांगला होत. शाह पर्शिया आज आमच्या भेटीसाठी आले.'

फोटो स्रोत, Victoria & Abdul
त्यांच्या लेखनात एक प्रवाह आणि उत्साह आहे. त्यांना अशा एक गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं होतं ज्य गोष्टीशी त्यांचा दूरान्वये संबंध नाही. ऊर्दूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी लागणारं कौशल्य साधी गोष्ट नाही. ऊर्दूत त्यांनी जे प्राविण्य मिळवलं ते बघून मला फार आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे वर्षभरातच त्यांनी ही कामगिरी करून दाखवली."
महाराणींना आवडू लागली चिकन करी
या मैत्रीचा आणखी एक परिणाम म्हणजे इंग्लंडमध्ये आधीपासूनच लोकप्रिय असलेली चिकन करी अधिक लोकप्रिय झाली. करीम यांनी महाराणींसाठी चिकन करी, डाळ आणि पुलाव बनवला.
महाराणी व्हिक्टोरिया 20 ऑगस्ट 1887 रोजी आपल्या डायरीत लिहितात, "आज मी माझ्या भारतीय सेवकाच्या हातची उत्कृष्ट चिकन करी खाल्ली." मात्र, चिकन करी खाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
ब्रिटनच्या सुप्रसिद्ध खाद्य इतिहासकार एनी ग्रे आपल्या 'The Greedy Queen : Eating with Victoria' पुस्तकात लिहितात, "करीम यांच्याआधी महाराणींनी चिकन करी खाल्ली नव्हती, अशातला भाग नव्हता. 29 डिसेंबरच्या विंडसर कॅसलच्या मेन्यूमध्ये 'Curry The Poulet (करी द पोले)' असा उल्लेख आढळतो. मात्र, ती चिकन करी आणि अब्दुल करीम यांनी बनवलेली चिकन करी यात जमीन-अस्मानाचं अंतर होतं. त्या चिकन करीमध्ये फळं, हळद आणि क्रिमचा वापर व्हायचा. त्या काळी उरलेल्या चिकनपासून ही करी तयार व्हायची आणि त्यामुळे ती फार उच्च प्रतीची मानली जायची नाही. मात्र, करीम आल्यानंतर भारतीय स्वयंपाकी सर्व स्वतःच्या हाताने बनवू लागले."
वाटलेल्या मसाल्यांचा वापर
एनी ग्रे लिहितात, "ते हलाल मांस वापरायचे. स्वयंपाकघरातले मसाले न वापता भारतातून मागवलेले मसाले दगडांनी वाटून वापरायचे. 1880 च्या दशकात आठवड्यातून दोनवेळा महाराणींसाठी चिकन करी बनवली जायची. रविवारी दुपारच्या जेवणात आणि मंगळवारी रात्रीच्या जेवणात.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
करीम यांच्या सांगण्यावरूनच महाराणींनी भारतातून आंबेही मागवले होते. मात्र, येईपर्यंत ते खराब झाले होते."
महाराणींच्या मनात भारताची प्रतिमा
याशिवाय करीम यांनी महाराणींच्या मनात भारताची एक खास प्रतिमा तयार करायचा प्रयत्न केला. महाराणी व्हिक्टोरिया भारताच्याही सम्राज्ञी होत्या. मात्र, सागरी प्रवास करू शकत नसल्याने त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या.
श्रबनी बसू सांगतात, "भारत महाराणींच्या मुकुटातला रत्न होता. मात्र, त्यांचा भारतभेटीचा योग कधी आलाच नाही. भारताविषयी जाणून घेण्याची त्यांना प्रचंड उत्सुकता होती. भारतातल्या रस्त्यावर काय घडतंय, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. करीम यांनी महाराणींची ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी भारताचा आत्मा महाराणींपर्यंत पोहोचवला.
भारतातली उष्ण हवा, धूळ, सण-उत्सव इतकंच नाही तर भारतातल्या राजकारणाविषयीही सांगितलं. त्यांनी महाराणींना हिंदू-मुस्लीम दंगली आणि अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांच्या समस्याही सांगितल्या. या माहितीच्या आधारावरच महाराणींनी भारतातल्या व्हाईसरॉयना पत्र लिहून आपल्या प्रश्नांची उत्तरं मागवली होती."
करीमच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जायच्या
करीम यांच्यासोबतची महाराणींची जवळीक इतकी वाढली होती की करीम सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. एकदा ते आजारी पडले. त्यावेळी महाराणींनी सर्व प्रोटोकॉल बाजूला करत करीम यांच्या घरी जाऊन त्यांना भेटल्या.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
महाराणींचे डॉक्टर सर जेम्स रीड आपल्या डायरीत लिहितात, "आजारपणामुळे करीम यांना पलंगावरून उठणंही मुश्कील झालं तेव्हा महाराणी दिवसातून दोन वेळा त्यांना भेटायला त्यांच्या घरी जायच्या. ऊर्दू शिकण्यात खंड पडू नये, यासाठी त्या स्वतःची वहीसुद्धा सोबत घेऊन जायच्या.
कधी-कधी तर मी महाराणींना त्यांची उशी नीट करतानाही बघितलं. सुप्रसिद्ध चित्रकार वॉन अँजेली यांनी करीम यांचं चित्र साकारावं, अशी महाराणींची इच्छा होती. अंजेली यांनी याआधी कधीच कुण्या भारतीयाचं चित्र बनवलेलं नाही. त्यामुळे त्यांना करीम यांचं चित्र साकारायचं आहे, असं स्वतः महाराणींनी त्यांची मुलगी विकीला सांगितलं होतं."
आग्र्यात 300 एकर जमीन
महाराणींवर अब्दुल करीम यांचा इतका प्रभाव होता की त्यांनी करीम यांना आग्र्यात 300 एकर जमीन दिली आणि आपल्या तिन्ही महालांमध्ये त्यांना घरं दिली. त्यांना मेडल लावण्याची आणि सोबत तलवार ठेवण्याचीही मुभा दिली. महाराणींनी आग्रा तुरुंगात हकीम म्हणून नोकरी केलेल्या करीम यांच्या वडिलांसाठी पेन्शनचीही सोय केली.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
महाराणींचे डॉक्टर सर जेम्स रीड आपल्या डायरीत लिहितात, "त्यावर्षी जून महिन्यात मुन्शीचे वडील ब्रिटनला आले होते. ते येण्याच्या महिनाभर आधीच महाराणींनी अॅलेक्स प्रोफिटला त्यांची खोली नीट 'फर्निश' करण्याचे आणि खोलीतला सेंट्रल हिंटिग काम करतोय की नाही, हे तपासून बघण्याचे आदेश दिले होते.
पंतप्रधान लॉर्ड सॅलिसबरी ज्या खोलीत थांबायचे ती खोली करीम यांच्या वडिलांसाठी देण्यात आली होती. महाराणींनी नातू जॉर्ज यांना त्यांचे हस्ताक्षर असलेले दोन फोटो मुंन्शींना द्यायला सांगितलं होतं. जेणेकरून एक फोटो मुन्शींच्या वडिलांना देता येईल."
राजमहालात बंड
परिणामी राजमहालातले सगळेच अब्दुल करीम यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी करीम यांच्याविरोधात महाराणींचे कान भरायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Victoria & Abdul
श्रबनी बसू सांगतात, "परिस्थिती इतकी वाईट झाली की संपूर्ण राजमहालाने करीम यांच्याविरोधात बंद पुकारण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर महाराणींनी युरोप दौऱ्यासाठी करीम यांना सोबत घेतलं तर आम्ही सगळे राजीनामे देऊ, असंही सांगितलं. मात्र, महाराणींनी कुणाचंही ऐकलं नाही. हे कळताच महाराणींनी त्यांच्या टेबलावरच्या सगळ्या वस्तू फेकल्या.
त्या करीम यांना आपल्यासोबत युरोपला घेऊन गेल्या. मात्र, कुणीही राजीनामा दिला नाही. करीम यांना जे प्राधान्य मिळायचं त्याबद्दल कोर्टातल्या लोकांना असूया वाटू लागली होती. एका सामान्य व्यक्तीला इतकं महत्त्व का दिलं जातंय, असा त्यांचा सवाल होता."
करीम आणि महाराणी यांच्यात प्रेमसंबंध होते का?
श्रबनी बसू सांगतात, "नाही. असं कुठेही लिहिलेलं नाही. मात्र, पाठीमागे अशी बरीच चर्चा व्हायची. एकद महाराणी हायलँडच्या कॉटेजमध्ये अब्दुलबरोबर एकट्या गेल्याही होत्या. मात्र, त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध होते, असं आपण म्हणू शकत नाही. हे तर केवळ त्या दोघांनाच ठाऊक. मात्र, दोघांमध्ये बरीच आत्मीयता होती, हे नाकारता येत नाही. याची चुणूक महाराणींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये दिसते.

फोटो स्रोत, Getty Images
त्या करीम यांना दिवसातून सहा पत्रं लिहायच्या. तू ये आणि मला गुड नाईट म्हण… वगैरे, वगैरे. ते कायम महाराणींसोबत असायचे. त्यामुळे दरबारात बऱ्याच उलट-सुलट चर्चा व्हायच्या. त्यांनी जॉन ब्राऊन यांची जागा घेतल्याचंही बोललं जायचं. करीम यांच्याआधी जॉन ब्राऊन महाराणींचे सहाय्यक होते. त्यांच्यासोबतही महाराणींचे घनिष्ठ संबंध होते."
महाराणींच्या मृत्यूनंतर करीमवर कोसळलं संकट
23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरियांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्याचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी एडवर्ड सातवे आणि त्यांच्या पत्नी राणी अॅलेक्झांड्रा, त्यांची मुलं, नातवंडं आणि महाराणींच्या जवळच्या अनेकांना बोलवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर राजा एडवर्ड सातवे यांनी अब्दुल करीम यांना महाराणींच्या खोलीत जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची परवानगी दिली. त्यांचं पार्थिव एकांतात बघणारे करीम शेवटची व्यक्ती होते. मात्र, महाराणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसातच अब्दुल करीम यांच्यावर संकटं ओढावली. त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. महाराणींनी लिहिलेली सगळी पत्र राजाच्या हवाली करण्याचे आदेश देण्यात आले. मग करीम यांच्यासमोरच सर्व पत्रं जाळण्यात आली.
श्रबनी बसू सांगतात, "महाराणींचं निधन होताच सगळेच करीम यांच्या विरोधात उभे ठाकले. त्यांच्या घरावर छापा टाकून महाराणींची सर्व पत्र ताब्यात घेऊन घरासमोर ती जाळण्यात आली. करीम यांच्या पत्नी आणि पुतणेही तिथे होते. सर्वांसमोर त्यांचा पाणउतारा करण्यात आला. त्यांना भारतात परत जाण्यास सांगण्यात आलं. महाराणींनी त्यांना भारतात बरीच जमीन दिली होती. इंग्लंडहून परतल्यानंतर ते आग्र्यातच स्थायिक झाले. पुढे 8 वर्षांनी 1909 साली त्यांचं निधन झालं."

फोटो स्रोत, VICTORIA AND ABDUL
त्यानंतर ऑसबर्न हाउस आणि विंडसर कॅसल कुठेच भारतीय पगड्याही दिसल्या नाही आणि शाही स्वयंपाकघरात भारतीय पदार्थांचा सुवासही दरवळला नाही. नवीन महाराज एडवर्ड सातवे यांच्या काळातही चिकन करी बनायची. पण ते बनवणारे भारतीय स्वयंपाकी नव्हते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








