कोरोना लस तयार करताना डुकराचं मांस वापरतात का? रिअॅलिटी चेक

लस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रृती मेनन
    • Role, बीबीसी रिअॅलिटी चेक

भारतात 16 जानेवारीपासून कोव्हिड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आणि त्याआधी आणि त्यानंतरसुद्धा या लसीबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले आहेत.

सरकारनेही 'अफवा आणि चुकीच्या माहितीकडे' लक्ष न देता सर्वांनी लसीकरण करावं, असं आवाहन केलं आहे.

मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या काही दाव्यांची सत्यता आपण पडतळणार आहोत.

दावा : लशीमुळे तुम्ही नपुंसक व्हाल - चूक

उत्तर प्रदेशातल्या एका राजकीय नेत्याने नुकताच हा दावा केला आहे. मात्र, यासाठी कुठलाही पुरावा दिलेला नाही.

समाजवादी पक्षाचे नेते आशितोष सिन्हा म्हणाले, "मला वाटतं लशीमध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही नपुंसक होऊ शकता. काहीही घडू शकतं."

यापूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही कोरोना लसीला 'भाजप लस' म्हणत टीका केली होती.

मात्र, लसीमुळे नपुंसकता येते, याचे कुठलेही पुरावे नाही. भारताच्या सर्वोच्च औषध नियमन संस्थेनेही अशाप्रकारचे दावे 'अत्यंत चुकीचे' असल्याचं म्हटलं होतं.

लशीमुळे थोडा ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी जाणवू शकते. मात्र, लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं या संस्थेने स्पष्ट केलं आहे.

लस

फोटो स्रोत, Science Photo Library

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीदेखील हा दावा फेटाळून लावला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लस घेतल्याने माणूस नपुंसक होतो, हा दावा भारतात नवा नाही. अनेक दशकांपूर्वी भारतात जेव्हा मोठ्या प्रमाणावर पोलीओ निर्मूलन मोहिमेची सुरुवात झाली त्यावेळीदेखील काहींनी अशाच प्रकारचे चुकीेचे दावे करत लस टोचून घ्यायला नकार दिला होता.

या दाव्यात जराही सत्यता नाही आणि तसे कुठलेच पुरावेही उपलब्ध नाही.

दावा - अमेरिका आणि इंग्लंडमधल्या लसी महाग

असाच एक चुकीचा दावा भारत आणि इंग्लंड-अमेरिकेच्या लशीबाबत करण्यात येतोय. सोशल मीडियावर या दाव्याचीही बरीच चर्चा झाली. भारतात ही लस मोफत देण्यात येणार आहे. मात्र, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यासाठी पैसे मोजावे लागतात, असा हा दावा आहे.

अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण कार्यक्रम अधिक चांगला आहे, हे दाखवण्यासाठी अमेरिकेत कोरोना लसीसाठी 5000 रुपये तर इंग्लंडमध्ये लसीसाठी 3000 रुपये मोजावे लागतील. मात्र, भारतात ही लस मोफत असल्याचं एका ट्‌विटर यूजरने लिहिलं आहे.

लस

फोटो स्रोत, Reuters

एबीपी न्यूज या हिंदी न्यूज चॅनलने ही बातमीही दाखवली. नंतर ती काढून घेण्यात आली. मात्र, यात सांगितलेली आकडेवारी अजिबात खरी नाही.

खरंतर अमेरिकेत ही लस मोफत देणार असल्याचं तिथल्या सरकारने स्पष्ट केलं आहे. लस टोचण्यासाठी काही शुल्क आकारला जाऊ शकतो.

मात्र, हे शुल्कही आरोग्य विम्यात समाविष्ट करण्यात आलं आहे आणि ज्यांचा आरोग्य विमा नाही त्यांचं शुल्क स्पेशल कोव्हिड रिलीफ फंड अंतर्गत देण्यात येणार आहे. याचाच अर्थ अमेरिकेत लस पूर्णपणे मोफत आहे.

इंग्लंडबाबतही हा दावा खोटा आहे. युकेच्या नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये इंग्लंडचाही समावेश आहे आणि नॅशनल हेल्थ सर्विस अंतर्गत देण्यात येणाऱ्या लसीसाठी कुठलंही शुल्क आकरण्यात येणार नाही.

नागरिकांनी भरलेल्या करातूनच नॅशनल हेल्थ सर्विस पुरवली जाते आणि तिथल्या नागरिकांसाठी आरोग्य सेवा मोफत आहे.

भारतामध्ये लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आणि त्यांच्यासाठी ही लस मोफत होती. मात्र, पुढच्या टप्प्यात लस मोफत असेल का किंवा त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, याबाबत अजूनतरी सरकारने काहीही सांगितलेलं नाही.

दावा - कोरोना लशीमध्ये डुकराचं मांस

कोरोना लशीमध्ये डुकराचं मांस असू शकतं आणि म्हणून मुस्लिमांनी ही लस घेऊ नये, असं आवाहन भारतातल्या काही मुस्लीम धर्मोपदेशकांनी केलं आहे.

अनेक प्रकारच्या रोगांवरच्या लशींमध्ये स्टॅबिलायझर म्हणून काहीवेळा डुकराच्या मांसापाासून तयार जिलेटिनचा वापर करतात आणि मुस्लीम धर्मात डुकराचं मांस खाणं निषिद्ध आहे.

लस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना लसीला इस्लामिक कायद्यानुसार 'हलाल' (घेण्यास योग्य) ठरवण्यात आलेलं नाही, अशी पोस्ट सोशल मीडियावर बरीच फिरली होती. मात्र, कोरोनाच्या नेमक्या कुठल्या लशीमध्ये डुकराचं मांस आहे, हे या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

भारतामध्ये कोरोनासाठीच्या दोन लसींना परवानगी देण्यात आलेली आहे. ऑक्सफोर्डने अॅस्ट्रॅझेनकासोबत मिळून यूकेमध्ये तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आणि दुसरी भारतात भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस.

या दोन्हीपैकी कुठल्याही लशीमध्ये डुकराच्या मांसापासून तयार करण्यात आलेल्या जिलेटिनचा वापर करण्यात आलेला नाही.

फायझर आणि मॉडेर्ना या आणखी दोन कोरोना लशी आहेत आणि त्यातही डुकराचं मांस नाही.

सोशल मीडियावर डुकराच्या मांसासंबंधीच्या ज्या पोस्ट फिरत आहेत त्यापैकी काहींमध्ये चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीत डुकराचं मांस वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, भारतात चीनी लसीला परवानगी देण्यात आलेली नाही.

इतर काही देशांमध्ये चीनी लशीवरून वाद निर्माण झाले आहेत. उदाहणार्थ मुस्लीम-बहुल इंडोनेशियामध्ये. चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनोव्हॅक लसीला तिथल्या स्थानिक मुस्लीम प्रशासनाने वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथे वाद निर्माण झाला आहे.

दावा - लशीमध्ये मायक्रोचीप आहे

कोरोना लशीबाबत जगभरात अनेक ठिकाणी कॉन्स्पिरसी थेअरी फिरत आहेत. त्यातलीच एक थेअरी अशी की लशीमध्ये मायक्रोचीप आहे. भारतातही सोशल मीडियावर हा दावा करण्यात आलेला आहे.

लस फॅक्टचेक

फोटो स्रोत, Social media

सोशल मीडियावर एका मुस्लीम धर्मगुरूचा एक छोटा व्हिडियो फिरतोय. लशीमध्ये मायक्रोचीप आहे आणि ही लस घेतल्यावर मायक्रोचीप तुमचा मेंदू नियंत्रित करते, असा दावा हे धर्मगुरू करत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला हा व्हीडिओ ट्वीटर आणि फेसबुकवर व्हायरलही झाला होता.

मात्र, जगाभरातल्या 'षडयंत्र-विचारांच्या' लोकांनी वारंवार हा दावा केला असला तरी कुठल्याही लशीमध्ये मायक्रोचीप वापरली जात नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)