ऑक्सफर्ड लस इतक्या लवकर कशी तयार झाली?

ऑक्सफर्ड लस, कोरोना, युके

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

फोटो कॅप्शन, ऑक्सफर्ड लस विक्रमी वेळेत तयार झाली आहे.
    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

संसर्गजन्य रोगावरच्या लशीच्या निर्मितीसाठी अनेकदा दहा वर्षंही लागतात. मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठाने अवघ्या दहा महिन्यांत कोरोना लशीची निर्मिती केली आहे.

इतक्या अल्पावधीत लस तयार करूनही डिझायनिंग, टेस्टिंग आणि उत्पादन या कुठल्याच आघाडीवर तडजोड केलेली नाही.

वरची दोन वाक्यं तुम्हाला विरोधाभासी वाटू शकतात. प्रचंड प्रमाणावरील चाचण्यांनंतर कोरोना लस अत्यंत परिणामकारक असल्याचं काही तासांपूर्वी जाहीर करण्यात आलं. इतक्या वेगवान काळात तयार झालेली लस खरंच सुरक्षित, परिणामकारक आणि कोरोनाचा बचाव करणारी असेल का असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे.

ऑक्सफर्ड लस इतक्या झटपट कशी तयार झाली याचीच ही गोष्ट.

शास्त्रोक्त पद्धत आणि चांगलं नशीब हे दोन्ही या लशीसंदर्भात महत्त्वाचं आहे. या लशीचं मूळ काही वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात पसरलेल्या इबोला साथीमध्ये आहे. या लशीचं मूळ चिंपाझींच्या वाहत्या नाकात आहे. खिशात काहीही पैसा नाही अशा स्थितीत असलेले शास्त्रज्ञ आता खास विमानाने फिरू लागले आहेत.

खूप वर्षांपूर्वीच काम सुरू झालं?

या लशीवर कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काम सुरू झालं हा समज चुकीचा आहे.

इबोला नावाच्या आजाराने 2014-2016 या काळात जगभरात थैमान घातलं होतं. इबोलाचा संसर्ग कसा रोखायचा हे शास्त्रज्ञांसमोर आव्हान होतं. इबोलाच्या आक्रमणात 11,000 लोकांनी जीव गमावला.

"त्यावेळी जगाने वेगाने आणि परिणाकारकतेने काम करायला हवं होतं," असं कोरोनावरच्या लशीच्या शिल्पकार सारा गिल्बर्ट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

इबोला आटोक्यात येऊ लागल्यानंतर भविष्यात अशा स्वरुपाचा व्हायरस पसरू लागला तर काय करायचं याविषयी चर्चा सुरू झाली. संभाव्य विषाणूंची यादी तयार करण्यात आली. त्यात शेवटी 'डिसीज एक्स' नावाचा विषाणू होता.

ऑक्सफर्ड लस, कोरोना, युके

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

फोटो कॅप्शन, सारा गिल्बर्ट

ऑक्सफर्ड विद्यापीठातील 'द जेनेर इन्स्टिट्यूट' इथे 1976 मध्ये पहिल्यांदा लसीकरण प्रक्रिया राबवण्यात आली होती. याठिकाणी जगभरातले अग्रगण्य संशोधक काम करतात. या इन्स्टिट्यूटने ठोस माहिती नसलेल्या या व्हायरसला रोखण्यासाठी एक योजना आखली.

"एखाद्या व्हायरसचा संसर्ग फैलावू लागल्यानंतर आपण कमीत कमी वेळा कशी लस तयार करू शकतो याची आम्ही आखणी केली," असं सारा यांनी सांगितलं.

"आमची योजना संपूर्णत: फलद्रूप झाली नाही मात्र आम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो."

तंत्रज्ञान ठरलं निर्णायक

या योजनेच्या केंद्रस्थानी होती लशीची शैली. या शैलीला नाव देण्यात आलं 'प्लग अँड प्ले'. स्वरुप माहिती नसलेल्या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी ही दोन तत्त्वं महत्त्वाची आहेत. वेगवान आणि लवचिकही आहेत.

पारंपरिक लशीमध्ये- म्हणजे लहान मुलांना जन्मानंतर तसंच बालपणात ज्या लशी वेळोवेळी दिल्या जातात त्यामध्ये मूळ व्हायरस जो मृतावस्थेत आहे त्याचे काही भाग किंवा मूळ व्हायरस कमकुवत करून त्याचं शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेत व्हायरसचा बचाव करण्याची रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यासाठी वेळ लागतो.

ऑक्सफर्ड लस, कोरोना, युके

फोटो स्रोत, OXFORD UNIVERSITY/JOHN CAIRNS

फोटो कॅप्शन, ऑक्सफर्ड लशीचं काम खूप आधीपासूनच सुरू झालं होतं.

याऐवजी ऑक्सफर्ड संधोधकांनी ChAdOx1- अर्थात चिंपाझी अॅडनोव्हायरस ऑक्सफर्ड तयार केलं.

चिंपाझी प्राण्याला होणारा व्हायरस शास्त्रज्ञांनी घेतला. आता तयार झालेल्या लशीचा तो अविभाज्य घटक ठरला. कोणत्याही व्हायरसपासून बचावात हा घटक निर्णायक ठरेल.

कोव्हिडपूर्वी 330 लोकांना ChAdOx1 लस देण्यात आली होती. कधी कारण होतं झिका व्हायरसचं तर कधी होतं फ्ल्यूचं. चिकन गुनियावर उतारा म्हणूनही ही लस देण्यात आली होती.

चिंपाझींना होणाऱ्या व्हायरसपासून तयार झालेल्या या लशीत जनुकीयदृष्ट्या आवश्यक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ही लस दिल्यानंतर माणसांना तो संसर्ग होण्याची शक्यता नाही.

त्यामध्ये कोरोना व्हायरसची ब्ल्यू प्रिंट अल्टर करण्यात आली आहे.

जेव्हा ही ब्लू प्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते.

"शास्त्रज्ञांना पॅकेज बदलायचं होतं. ते आम्ही बदललं आणि लस तयार झाली," असं गिल्बर्ट यांनी सांगितलं.

2019 वर्ष संपताना जगभरातले लोक वर्ष सुट्टीच्या मानसिकतेत होते. त्यावेळी गिल्बर्ट यांना चीनमधल्या वुहान इथे पसरत चाललेल्या न्यूमोनिया व्हायरल विषयी समजलं. दोन आठवड्यात संशोधकांनी कारणीभूत व्हायरस शोधून काढला. या व्हायरसला रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आली.

"आम्ही डिसीज एक्सवर काम करत होतो. तो हाच असेल हे आमच्या लक्षात आलं," असं गिल्बर्ट सांगतात.

त्यावेळी ऑक्सफर्ड चमूला माहिती नव्हतं की त्यांचं काम मानवप्रजातीसाठी किती मोलाचं ठरणार आहे.

ते किती वेगवान काम करू शकतात अशी सुरुवात झाली. ChAdOx1 technology तंत्रज्ञान कसं मांडू शकतात याची ती चाचणी होती.

विश्रांती

ऐकायला विचित्र वाटू शकतं पण साथीचा आजार कोरोना व्हायरस होता हे बरं झालं. या कुळातील व्हायरसने प्राण्यांमधून माणसांच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न गेल्या 20 वर्षांत दोनदा केला होता. एकदा 2002 मध्ये सार्सच्या वेळी आणि नंतर 2012 मध्ये मर्स कोरोना व्हायरसवेळी.

शास्त्रज्ञांना व्हायरसचं प्रारुप माहिती होतं. तो कसा वागतो, त्याचे गुणधर्म काय आहेत हे सगळं ठाऊक होतं. स्पाईक प्रोटीन म्हणजेच प्रथिनांचं अस्तरही माहिती होतं.

"ही माहिती आमच्यासाठी महत्त्वाची होती," असं प्राध्यापक अँड्यू पोलार्ड यांनी सांगितलं.

स्पाईक प्रोटीनद्वारे व्हायरस आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेला भेदून शरीरात घुसतो. लशीने रोगप्रतिकारक क्षमतेला व्हायरसवर स्पाईक प्रोटीन करायला चालना दिली तर मोहीम फत्ते हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं.

मर्स d a ChAdOx1 vaccine त्यांनी विकसित केलं होतं. ते स्पाईकवर आक्रमण करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणेला सज्ज करू शकतं. त्यामुळे ऑक्सफर्ड टीमची सुरुवात शून्यापासून झाली नव्हती.

सर्वस्वी नवीन असा व्हायरस असता तर गोष्ट वेगळी होती. कोरोनाचा व्हायरस छोट्या कालावधीसाठी शरीरात आक्रमण करतो. शरीर त्याचा मुकाबला करू शकतं. त्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना देणं आवश्यक होतं.

हा व्हायरस, एचआयव्हीप्रमाणे प्रदीर्घकाळ शरीरात राहून त्रास देणारा असता तर लस परिणामकारक ठरली नसती.

11 जानेवारी रोजी चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा जेनेटिक कोड जगासमोर मांडला.

त्यामुळे ऑक्सफर्ड टीमचं काम सुकर झालं.

पैसा, पैसा आणि पैसा

लस तयार करणं हे काम खूप खर्चिक आहे. "सुरुवातीचा कालावधी खूपच वेदनादायी होता. त्यावेळी खात्यात काहीच पैसे नव्हते," असं पोलार्ड यांनी सांगितलं.

"आम्हाला विद्यापीठाकडून काही प्रमाणात निधी मिळत होता. जगभरात बाकी ठिकाणीही लशीचं काम सुरू आहे मात्र ऑक्सफर्डच्या टीमला एक फायदा आहे."

ऑक्सफर्ड मधील चर्चिल हॉस्पिटल इथे लशीचं उत्पादन केलं जातं.

"बाकी सगळ्या गोष्टी थांबवून या लशीचं उत्पादन सुरू करा असं आम्ही सांगू शकतो," असं पोलार्ड यांनी सांगितलं.

"काम सुरू करण्यासाठी तेवढं पुरेसं होतं मात्र मोठ्या प्रमाणावर चाचण्या आयोजित करण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं. एप्रिलपर्यंत या प्रकल्पासाठी पैसे कुठून उभे करायचे हा माझ्या पुढचा यक्षप्रश्न होता. लवकरात लवकर प्रकल्पासाठी निधी द्या यासाठी मी अनेकांना विनंती केली," पोलार्ड सांगतात.

मात्र तोवर कोरोनाने जगभर पाय पसरले होते. असंख्य देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. हजारो लोकांनी व्हायसमुळे जीव गमावला होता. या सगळ्यानंतर पोलार्ड यांच्या चमूसाठी निधीचा ओघ वाहू लागला. लशीचं उत्पादन केंद्र इटलीत हलवण्यात आलं. युरोपात लॉकडाऊनमुळे कठोर निर्बंध होते, परंतु पैशामुळे लॉजिस्टिक अडचणी सुटू शकल्या.

"एकाक्षणी आमच्याकडे चार्टर प्लेन, (विशेष विमान) उपलब्ध होतं. लस इटलीत होती आणि दुसऱ्या दिवशी चाचण्या सुरू होणार होत्या," असं गिल्बर्ट यांनी सांगितलं.

अनाकर्षक पण महत्त्वाचा टप्पा

प्रकल्पात दर्जाची पातळी सातत्याने कायम ठेवणं हा अनाकर्षक मात्र महत्त्वाचा टप्पा असतो. प्रायोगिक तत्त्वावर जे तयार झालं आहे ते शास्त्रज्ञ लस म्हणून सर्वसामान्यांना देऊ शकत नाहीत. सर्व शास्त्रोक्त प्रक्रिया पार केल्यानंतर, मंजुरी मिळाल्यानंतरच लशीची चाचणी होऊ शकते.

लशीच्या प्रत्येक उत्पादनाच्या वेळेस, लस कोणत्याही पद्धतीने दूषित झालेली नाही हे पाहणं अनिवार्य होतं. याआधी ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ होती.

हा वेळ कसा कमी करायचा हे यावर आम्ही काम केलं नसतं तर लस कदाचित मार्चमध्ये तयार झाली असती पण चाचण्या सुरू करायला जून महिना उजाडला असता.

याऐवजी प्राण्यांवर लशीची चाचणी करण्यात आली. त्यातून लस सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. 23 एप्रिलपासून मानवी चाचण्या सुरू झाल्या.

वारंवार चाचण्या

तेव्हापासून ऑक्सफर्ड लशीच्या वारंवार चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांची एक पद्धत आहे.

फेझ 1- लस सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी ठाराविक लोकांनाच लशीचा डोस देण्यात येतो.

फेझ 2- आणखी लोकांना लशीचा डोस देण्यात येतो. त्यांच्या शरीरात काय बदल होत आहेत, काही दुष्परिणाम तर नाही ना याकडे लक्ष दिलं जातं.

फेझ 3- मोठ्या प्रमाणावर चाचण्या आयोजित केल्या जातात. हजारोजणांना लशीचे डोस दिले जातात. लस किती परिणामकारक आहे हे या टप्प्यात पाहिलं जातं.

ऑक्सफर्ड लस, कोरोना, युके
फोटो कॅप्शन, एलिसा ग्रॅनटो या स्वयंसेवकांपैकी एक आहेत.

ऑक्सफर्ड लशीने हे सगळे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत. फेझ 3 चाचण्यांवेळी 30,000 स्वयंसेवकांना लशीचे डोस देण्यात आले. त्या सगळ्यांचा तपशील ऑक्सफर्डकडे आहे.

एका फेझमधून दुसऱ्या फेझमध्ये जाण्यासाठी अनेक वर्षांचं रेंगाळणं होत असे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, रेंगाळणारी वर्षं वजा करण्यात आली.

"लस तयार व्हायला दहा वर्षांचा कालावधी लागतो हा समज चुकीचा आहे," असं डॉ. मार्क तोशनर यांनी सांगितलं. केंब्रिज इथे होणाऱ्या चाचण्यांचा ते भाग आहेत.

बऱ्याचदा मधल्या वर्षांमध्ये काहीच होत नाही. या काळात अनुदानासाठी विनंती अर्ज करावे लागतात, ते काम केलं जातं. ते नाकारण्यात आले तर नव्याने अर्ज करावे लागतात. चाचण्यांसाठी परवानगी घ्यावी लागते. उत्पादकांबरोबर वाटाघाटी कराव्या लागतात. लशीचे डोस देण्यासाठी स्वयंसेवकांची फौज तयार करावी लागते. एका फेझमधून दुसऱ्या फेझमध्ये जाण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो.

"प्रक्रिया मोठी आहे. पण तशी असणं आवश्यक नाही. सध्या भवतालात जे घडतं आहे ते लक्षात घेऊन हा कालावधी कमी झाला," असं डॉ. तोशनर सांगतात.

कोणत्याही टप्प्यावर सुरक्षितेतबाबत तडजोड करण्यात आलेली नाही. चाचण्या शास्त्रोक्त पद्धतीने पार पडाव्यात यासाठी प्रचंड कसोशीने काम करण्यात आलं. असंख्य नागरिकांनी स्वच्छेने स्वयंसेवक होण्याची तयारी दर्शवली, अनेक देणगीदारांनी निधीची चणचण भासू दिली नाही. त्यामुळे एरव्ही जो वेळ लागतो तो कमी होत गेला.

याचा अर्थ भविष्यात असे प्रश्न, समस्या येणारच नाहीत असा अर्थ होत नाही. वैद्यकीय संशोधन याची हमी घेऊ शकत नाही. लशीचे दुष्परिणाम लस दिल्यानंतर लगेचच किंवा काही महिन्यांनंतर दिसू लागतात. लक्षावधी लोकांना लशीचे डोस दिल्यानंतर काही दुर्मीळ गोष्टी समोर येऊ शकतात. मात्र हे काही फक्त ऑक्सफर्ड लशीबाबत नाही तर कोणत्याही लशीबाबत घडू शकतं.

पुढच्या टप्प्याचं कामही वेगवान असेल

लशीला सरकारकडून मंजुरी आणि घाऊक उत्पादनासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

युके सरकारने ऑक्सफर्ड लशीचे 4 दशलक्ष डोस वितरणासाठी घेतले आहेत. ऑक्सफर्डने फार्मासिटिकल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅस्ट्राझेनकाबरोबर करार केला आहे. लशीच्या उत्पादक कंपनीने काम खूप आधीच सुरू केलं आहे.

त्यावेळी तसं करणं अक्षरक्षः जुगार होता पण त्याचे चांगले परिणाम आता दिसतील. कारण लस तयार असल्याने मंजुरी नंतर नागरिकांना लस द्यायला सुरुवात होईल.

चाचण्या संपेपर्यंत नियामकांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जात नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनाही या प्रक्रियेत आधीपासूनच सहभागी करून घेण्यात आलं होतं.

युकेतल्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स नियामक संस्थेने लशीची सुरक्षितता, उत्पादन मानकं, परिणामकारकता यासंदर्भात पाहणी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना लस देण्यासंदर्भातला निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.

ऑक्सफर्डप्रमाणे फायझर आणि मॉडर्ना लशी विक्रमी वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)