कोरोना लस: वृद्धांचं लसीकरण करणं सोपं का नाही?

वृद्ध व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विलियम पार्क
    • Role, बीबीसी फ्यूचर

आपल्याकडे कोरोना व्हायरसची लस आधीपासूनच उपलब्ध आहे, अशी कल्पना करा. अशा स्थितीत ही लस जगभरात इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत कशी पोहोचवावी, हा प्रमुख प्रश्न निर्माण होईल.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम संरक्षण देणं अशा वेळी महत्त्वाचं ठरतं. त्याशिवाय वृद्ध व्यक्तींनाही कोरोनाचा जास्त धोका आहे.

त्यामुळे कोरोना व्हायरसचं लसीकरण हे काम इतकं सोपंसुद्धा नाही.

कॅनडाच्या ग्लुलेफ विद्यापीठात व्हॅक्सिनोलॉजीच्या प्राध्यापक श्यान शरीफ सांगतात, "आमच्याकडे वृद्ध व्यक्तींसाठी बनवलेल्या लशींची संख्या अत्यंत कमी आहे. गेल्या 10 वर्षांत आपण बहुतांश लशी या लहान मुलांचा विचार करूनच बनवल्या आहेत. फक्त गजकर्णावरची लसच 70 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी बनवण्यात आली आहे."

कोरोना
लाईन

मेनिन्जायटिस आणि पॅपिलोमाव्हायरस यांच्यासारख्या काही आजारांवरची लस तरुणांचा विचार करून बनवण्यात आली आहे. पण मुळात लशी या लहान मुलांचाच विचार करून बनवल्या जातात.

रोगप्रतिकारशक्ती क्षीण होणं

शरीफ यांच्या मते, "लहान मुलांशी संबंधित आजारांबाबत आपल्याला पुरेशी माहिती आहे. पण तरूण किंवा वृद्ध व्यक्तींचा विचार केल्यास याबाबत आपल्याला जास्त अनुभव नाही."

वृद्धांना लस देणं अवघड का आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला वृद्धांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती समजून घ्यावी लागेल.

शरीफ याबाबत सांगतात, "वृद्ध व्यक्तींमद्ये इम्युनोसेनेसेंस म्हणजेच प्रतिकारशक्ती क्षीण होण्याचा धोका असतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या रोगप्रतिकारशक्तीमध्येही वृद्धत्वाची लक्षणं दिसू शकतात. वयानुसार आपल्या अनेक पेशी त्यांचं काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत."

वृद्ध व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

प्रतिकारशक्तीची रचना अत्यंत गुंतागुंतीची असते. यामध्ये अनेक पेशी एकमेकांसोबत मिळून काम करत असतात. या यंत्रणेतील एक जरी पेशी योग्य प्रकारे काम करत नसल्यास संपूर्ण रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो."

साधारणपणे, एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास आपल्या रोगप्रतिकारशक्तीची पहिली फळी त्या विषाणूवर हल्ला चढवते. श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये हे काम फुफ्फुस, श्वसननलिका किंवा नाकाच्या मदतीने केलं जातं.

पांढऱ्या पेशी किंवा मॅक्रोफेजेस हे विषाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. मॅक्रोफेजेस संबंधित विषाणूला नष्ट करून ही माहिती इतर प्रतिकारपेशींना देतात. त्यांना 'टी-सेल' असं संबोधलं जातं. हे पेशी प्रतिकारशक्तीच्या स्मरणशक्तीप्रमाणे काम करतात.

पुढच्या वेळी हा विषाणू शरीरात घुसल्यास त्याची माहिती या 'टी-सेल्स' प्रतिकारशक्तीला देतात. अशा स्थितीत पहिली फळी अधिक क्षमतेने काम करते.

प्रतिकारशक्ती कशी काम करते?

टी-सेल्स अनेक प्रकारच्या असतात. किलर टी-सेल सायटोटॉक्सिन आपल्या शरीरातील संसर्ग झालेल्या पेशींवर हल्ला करून विषाणूंना नष्ट करण्याचं काम करतात. तसंच या विषाणूंचा संसर्गाचा वेगही कमी करण्याचं काम ते करतात.

हेल्पर टी-सेल, बी-सेलची मदत करतात. ही थोडी वेगळ्या प्रकारची प्रतिकारशक्ती यंत्रणा आहे.

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

बी-सेल स्वतः विषाणूंशी लढू शकतात. पण योग्य प्रकारे काम करण्यासाठी त्यांना टी-सेलची गरज भासते. बी-सेल अँटीबॉडी तयार करतात. पण सर्वात कार्यक्षम अँटीबॉडी बनवण्यासाठी त्यांना टी-सेलसोबत एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावं लागतं.

एखाद्या विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या प्रतिकारशक्तीला प्रभावी अँटीबॉडीचं उत्पादन करण्यास प्रेरित करणं हाच लसीकरणाचा मूळ उद्देश आहे.

वृद्धांचं वय जास्त असल्या कारणाने या सर्व पेशींमध्ये असलेलं नाजूक संतुलन बाधित होत असल्याने विषाणूतज्ज्ञांना लसीकरणाबाबत समस्या निर्माण होत आहेत.

वृद्धांची प्रतिकारशक्ती कशी असते?

इन्सब्रुक विद्यापीठातील बिरट्ज वेनबर्गर सांगतात, "ते सायटोकाईन्सच्या (पेशींमधील संवादासाठी मदत करणारी प्रथिनं) एका वेगळ्या प्रकारच्या सेटचं उत्पादन करतात. पेशींपैकी कोणीही स्वतंत्रपणे काम करत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं."

मॅक्रोफेजेस योग्य प्रकारे काम करत नसतील, तर टी-सेल नीट सक्रीय होणार नाही. बी-सेलच्या पेशींना कमी मदत मिळेल. त्यामुळे अँटीबॉडी बनवण्याचा प्रक्रियेत बाधा निर्माण होतील.

वेनबर्गर यांच्या मते, "आपल्याला प्रतिकारशक्ती यंत्रणेतील वेगेवेगळ्या भागांना एकत्ररित्या काम करण्यासाठी तयार करायचं आहे."

शरीफ सांगतात, "आपल्याकडे अनुकूल प्रतिकारशक्ती प्रणातील बी-सेल आणि टी-सेलची मर्यादित संख्या आहे. काळानुसार, त्यातील काही भाग कमी कमी होत जातो. उतारवयात या गोष्टींमुळे आपल्याला समस्या येतात. त्यामुळेच नव्या विषाणूंचा सामना झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया मर्यादित स्वरूपात असते."

वृद्ध व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

जाणकारांच्या मते, इम्यूनोसेनेसेंसचा प्रभाव सर्व लोकांमध्ये एकसारखा दिसत नाही. काही लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढत्या वयासोबत वाढीस लागते.

शरीफ सांगतात, "आपण आपल्या जीवनात असंख्य विषाणूं किंवा बॅक्टेरियांचा सामना करतो. त्यांची आपल्याकडे स्मरणशक्ती असते. म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारशक्तीला त्याची माहिती असते. या विषाणूंशी लढणं आपल्याला वय झालं तरी अवघड जात नाही."

पण कोरोना व्हायरस हा नवीन विषाणू आहे. त्याची माहिती आपल्या शरीराला अद्याप नव्हती.

यामुळेच सध्या कोव्हिड-19 वरील उपचार आणि लस यासंदर्भात अनेक संशोधन केले जात आहेत.

सध्या तरी सर्वात जास्त अपेक्षा डेक्सामेथासोन औषधाकडून आहे. ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या लोकांचा मृत्यूदर यामुळे कमी होईल.

याचा वापर करण्यास ब्रिटन आणि जपानमध्ये परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनासुद्धा हे औषध देण्यात आलं होतं.

सध्या, अमेरिकेत आणीबाणीच्या उपयोगासाठी पाच औषधांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याच औषधाला वैद्यकीय चाचणीनंतर FDA ची मंजुरी मिळाली नव्हती. यांचा वापर फक्त गंभीर रुग्णांमध्ये अपवादात्मक स्थितीत करण्याची सूचना आहे.

कोव्हिड-19 झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या वृद्ध व्यक्तींना या संशोधनाचा लाभ होऊ शकतो.

पण कोरोनाची लस येण्यास आणखी बराच कालावधी लागू शकतो. तरीसुद्धा वरील औषधांमुळे एक आशेचा किरण दिसत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)