You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन : राहुल गांधींनी म्हटलं, 'एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'शेतकऱ्यांनो, एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
"शेतकऱ्यांनो, तुम्ही एक इंचही मागे हटू नका. या आंदोलनावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. पाच-दहा लोक तुमचं भविष्य चोरी करू पाहत आहेत, त्यांना ते चोरू देऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू," असं आवाहन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
शुक्रवारी (29 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
"नव्या कृषी कायद्यांमुळे काय नुकसान होईल, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपतील, MSP नष्ट होईल. सरकार शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहे," असा आरोप गांधी यांनी केला.
"शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिले? गृहमंत्री याची जबाबादारी घेत नाहीत, याबाबत गृहमंत्रींना विचारलं पाहिजे," असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
"गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसेचं स्वरूप मिळालं. यानंतर अनेक पोलीस, माध्यमांमधील कर्मचारी जखमी झाले. पण त्यांच्याबाबत राहुल गांधी यांनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही," अशी टीका इराणी यांनी केली.
2. पहिली ते चौथी शाळा दोन महिनेच
कोरोना संकटामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या.
विद्यार्थी शाळांमध्ये येण्यास सुरुवात झाली असून येत्या 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ही बातमी सकाळने दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेलं वर्षभर शाळांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर शाळा भरवणं बंद करण्यात आलं.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या होत्या. आता पाचवी ते आठवीचे वर्गही भरवले जात आहेत.
यंदाच्या वर्षी बोर्ड परीक्षांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली आहे, तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोनच महिने भरवण्यात येईल. अंगणवाडी आणि बालवाडी यंदाच्या वर्षात सुरू करण्याचं नियोजन नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं.
3. मूर्ख लोकांचं ऐकू नका, वेळेच्या अटी न पाळता नागरिकांना प्रवास करावा - मनसे
येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे. पण सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देताना वेळेचं बंधन घालण्यात आलं आहे.
सर्वसामान्यांना सकाळी 7 पर्यंत, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतरच लोकल प्रवास करता येईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारने कोणतीही बंधनं न घालता सरसकट सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली.
'कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आता लोकांची सहनशक्ती संपलेली आहे. लोकांनी मूर्ख लोकांचं ऐकू नये, नागरिकांनी लोकलच्या वेळा न पाळता प्रवास करावा,' असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. कर्नाटकमधील भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून निषेध
कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची असून आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. एबीपी माझा नं ही बातमी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव सीमावाद प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावादाशी संबंधित एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त केलेल्या भाषणात बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. या मुद्दयावर महाराष्ट्र भाजपची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होता.
आता चंद्रकांत पाटील यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
5. लार्सन अँड टुब्रो कंपनीला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 2500 कोटींचं कंत्राट
मुंबई आणि अहमदाबाददरम्यान देशातील पहिल्या हाय स्पीड रेड कॉरिडोर प्रकल्पाचं काम सुरु करण्यात आलं आहे. या मार्गावरील 2500 कोटी रुपयांचं मोठं कंत्राट लार्सन अँड टुब्रो (L & T) कंपनीला मिळालं आहे. या कंपनीनेच शुक्रवारी (29 जानेवारी) याबाबत माहिती दिली.
बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2017 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)