You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेळगाव सीमावाद: 'बेळगाव तर सोडाच पण मुंबई देखील आमचीच' - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री सवदी यांनी थेट मुंबईवरच दावा केला असून मुंबई कर्नाटकात समाविष्ट व्हावी, असं कर्नाटकच्या मराठी भाषिक लोकांना वाटत असल्याचं विधान लक्ष्मण सवदी यांनी केलं.
"शिवाय, या लोकांसोबतच मीसुद्धा मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करतो. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं, अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो," असंही लक्ष्मण सवदी म्हणाले.
डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या 'संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन नुकतंच करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बेळगावसह सीमाभागतील वादग्रस्त परिसर केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. यावरून देशभरात प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. ही बातमी एबीपी न्यूजने दिली आहे.
2. मुंबई लोकलच्या फेऱ्या उद्यापासून वाढवणार
कोरोना संकटामुळे ठराविक प्रमाणात सुरू असलेल्या मुंबई लोकलच्या फेऱ्या उद्यापासून (29 जानेवारी) वाढवण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत निर्णय घेतला असून उद्यापासून 204 लोकल फेऱ्या वाढवण्यात येतील.
सध्या मुंबईत 2781 लोकल फेऱ्या सुरू असून यामध्ये वाढ होऊन ही संख्या 2895 वर पोहोचेल. यामध्ये मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या 1580 वरून 1685 तर पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या 1201 वरून 1300 वर पोहोचेल.
फेऱ्या वाढवण्यात आल्या असल्या तरी सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकल सेवेचा लाभ घेता येणार नाही. सध्यातरी अत्यावश्यक सेवा तसंच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्या लोकांनाच प्रवास करता येईल.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईतील लोकल सेवा बंद आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसून आलं. त्यामुळे लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
3. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आनंद दिघेंचा पुतळा उभारा - मनसे
मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आता ठाण्यात आनंद दिघे यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत बुधवारी (27 जानेवारी) ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर केलं. ठाण्यातील मध्यवर्ती परिसर असलेल्या चिंतामणी चौकात दिघे यांचा पुतळा उभारण्यात यावा, असं यामध्ये म्हटलं आहे.
ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये आनंद दिघे यांचं योगदान बहुमूल्य आहे. हे शहर दिघे यांच्या स्मृती विसरु शकत नाही, असं मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
4. मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावे बदलणार - प्रज्ञा ठाकूर
भोपाळमध्ये अनेक ठिकाणांची नामांतरं केली जात आहे. या मोहिमेला भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पाठिंबा दिला आहे. मुस्लीम प्रशासकांच्या काळातील घटनांवरुन वेगवेगळ्या ठिकाणांना देण्यात आलेली नावं ही अपवित्र असून ती बदलण्याची गरज असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
ही नावं म्हणजे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम शासकांच्या दहशतीची प्रतीकं आहेत. त्यामुळे ही नावं बदलण्यात यावीत. रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सर्व ठिकाणांची नावं आम्ही भोपाळमधून पुसून टाकणार आहोत.
सध्याच्या नावांऐवजी या ठिकाणांना क्रांतीकारकांची नावं देण्यात यावीत अशी मागणी प्रज्ञा यांनी केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. 'दिल्ली हिंसाचार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा'
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या लोकांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या व त्यासाठी जबाबदार असणाऱ्या संघटनांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)