BBC ISWOTY: सामान्य परिस्थितीतून समोर येऊन बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैशाली

जेमतेम 14 वर्षांच्या वयात मुंबईतल्या नॅशनल विमेन चॅलेंजर्स स्पर्धेचं विजेतेपद. बुद्धिबळपटू वैशाली रमेशबाबूनं तो पहिला मैलाचा दगड पार केला आणि मग मागे वळून पाहिलंच नाही.

हळूहळू जग तिची दखल घेऊ लागलं. 2017 साली वैशालीनं आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ चेस विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं अभिनंदन केलं. 2018 साली ती भारतीय महिला ग्रँडमास्टर बनली, तेव्हा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदनं ट्विटरवरून तिचं अभिनंदन केलं.

पण वैशालीनं त्याआधी ज्युनियर गटातही अनेक स्पर्धा जिंकत दबदबा निर्माण केला होता. वैशालीचा पंधरा वर्षांचा भाऊ, आर. प्रज्ञानंद जगातल्या सर्वांत तरुण ग्रँड मास्टर्सपैकी एक आहे.

19 वर्षांची वैशाली सध्या महिला ग्रँड मास्टर आहे.

दोघं बहीणभाऊ मुळचे चेन्नईचे आहेत, ज्या शहराची 'भारतीय बुद्धिबळाची राजधानी' अशी ओळख बनली आहे. अगदी लहान वयातच दोघांनी बुद्धिबळ खेळायला सुरूवात केली होती.

वैशालीनं 2012 साली 11 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील वयोगटात बुद्धिबळाचं राष्ट्रीय विजेतेपद मिळवत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सुरुवातीलाच दाखवलं. त्याच वर्षी तिनं कोलंबोमध्ये एशियन अंडर-12 आणि स्लोव्हेनियात अंडर-12 यूथ चेस चॅम्पियनशिप या स्पर्धाही जिंकल्या.

मजबूत पायाभरणी

चेन्नईमध्ये बुद्धिबळाची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत. पण वैशालीला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कारण सराव आणि प्रवासासाठी लागणाऱ्या पैशामुळे बुद्धिबळ हा खार्चिक खेळ बनू शकतो.

सुरुवातीच्या काळात तिच्याकडे संगणक नव्हता आणि खेळाचं प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा डावपेच रचण्यासाठी तिला पुस्तकांवर अवलंबून राहावं लागायचं. बुद्धिबळातली आधुनिक सॉफ्टवेअर्स आणि संसाधनांपासून सुरुवातीला ती वंचित राहिली.

2012 साली जागतिक युवा विश्वविजेतेपद मिळवल्यावरच वैशालीला स्पॉन्सरद्वारा एक लॅपटॉप मिळाला, ज्यामुळे तिचा खेळ आणखी बळकट बनला.

वैशाली आणि तिच्या भावानं स्पॉन्सर्सचं लक्ष वेधून घेतलं. आपले पालकच खरे आधारस्तंभ असल्याचं वैशाली सांगते.

वैशालीचे वडील काम करायचे आणि सरावासाठीच्या आर्थिक गरजा पुरवण्याकडे लक्ष द्यायचे, तर आई वेगवेगळ्या स्पर्धांना तिच्यासोबत जायची.

जगातल्या सर्वांत युवा ग्रँडमास्टर्सपैकी एक घरातच असल्यानं फार मदत झाल्याचं वैशाली सांगते. दोघं बहीणभावंडं एकत्र सराव करत नाहीत, पण अनेकदा डावपेचांवर बराच वेळ चर्चा करतात.

प्रज्ञानंदचा सल्ला तिला वेगवेगळ्या स्पर्धांच्या तयारीसाठी मदत करतो.

आत्मविश्वासानं भरलेले डावपेच

वैशालीच्या कारकीर्दीला कलाटणी देणाऱ्या क्षणांपैकी एक जून 2020 मध्ये आला, जेव्हा तिनं FIDE chess.com तर्फे आयोजित विमेन्स स्पीड चेस चॅम्पियनशिपमध्ये माजी विश्वविजेती अँटोनेटा स्टेफानोव्हाला सनसनाटी विजय मिळवला.

वैशाली सांगते की सातत्यानं मिळणाऱ्या यश आणि प्रशंसेनं तिची आणखी चांगलं खेळण्याची जिद्द आणखी वाढवली आहे.

वैशालीला आता वूमन इंटरनॅशनल मास्टर किताब मिळवायचा आहे आणि त्यानंतर ग्रँडमास्टरही व्हायचं आहे.

वैशालीनं स्वतः खेळात मोठं यश मिळवलं असलं, तरी ती सांगते अनेक महिला खेळाडूंना ते शक्य होत नाही, कारण त्यांना कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर भेदभावाचा सामना करावा लागतो.

महिलांच्या यशाला पुरुषांच्या तोडीचं मानलं जात नाही आणि दोघांना मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतली तफावत हे त्याचंच द्योतक आहे, असं ती सांगते.

(हा लेख ई-मेलच्या माध्यमातून आर वैशाली यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)