डॉ. जयंत नारळीकर यांची 94 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि प्रतिनिधींच्या बैठकीत डॉ. नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.

आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरलं आहे.

डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले.

भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांचा अल्पपरिचय

19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म झाला.

डॉ. नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई सुमती या संस्कृत अभ्यासक होत्या. नारळीकरांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीतच झाले. त्यांचे उच्चशिक्षण ब्रिटनस्थित केंब्रिज विद्यापीठात झाले.

1972 साली डॉ. नारळीकर भारतात परतले आणि TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागात प्रमुखपदी विराजमान झाले. पुढे 1988 साली त्यांची आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली.

'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी'साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केलं.

संशोधनासोबतच विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू ठेवलं. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या.

'यक्षांची देणगी' या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.

आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली.

'चार नगरांतले माझे विश्व' ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर' हे चरित्र लिहिले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)