ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे 3 महत्त्वाचे अर्थ

फोटो स्रोत, facebook
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रातल्या १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल येत आहेत आणि महाराष्ट्राचं नवं राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजकीय पक्षांच्या चिन्हांवर जरी या निवडणुका लढवल्या जात नसल्या तरीही पक्षांच्या विचारांचेच गट या निवडणुकांमध्ये असतात. त्यामुळेच या निवडणुका राज्यातल्या 'महाविकास आघाडी' सरकारची महत्त्वाची परीक्षा मानली जाते आहे.
या निवडणुकांचा एकंदरित कल पाहता या परीक्षेत ही आघाडी जी राजकीय समीकरणं ठरवून सत्तेत आली होती, ती समीकरणं गावपातळीपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
पक्ष म्हणून भाजपच्या संख्येला अडथळा निर्माण करतांनाच, 'महाविकास आघाडी'तल्या तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवून, मतांची विभागणी करून स्वत:चा फायदा करून घेतलेला पाहायला मिळतो आहे.
महाराष्ट्रातल्या एकूण 14,234 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातल्या 12,711 पंचायतींसाठी 16 जानेवारीला मतदान झालं होतं, तर नक्षलग्रस्त भागातल्या 162 ग्रामपंचायतींसाठी 20जानेवारीला मतदान होतं आहे.

उरलेल्या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. पण ज्यांचे निकाल आज आले त्यांनी महाराष्ट्राचं सद्य राजकीय चित्र उभं केलं आहे.
महिन्याभरापूर्वी जेव्हा विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या त्रिकूटानं बांधलेल्या मतांच्या गणितामुळे त्यांना फायदा झाला आणि भाजपाचा तोटा.
पण तेव्हा निवडक मतदारांमधली ती निवडणूक होती असं म्हटलं गेलं. ही निवडणूक मात्र गावागांमध्ये पोहोचलेली होती, त्यामुळे ती अधिक महत्त्वाची ठरली.
प्रत्येक पक्षानं आपल्या विजयाचे दावे केलेले आहेत. भाजपानं सगळे निकाल पूर्ण होतील तोपर्यंत आम्ही सहा हजार ग्रामपंचायती जिंकलेल्या असतील असा दावा केलेला आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'भाजपच या निवडणुकीतला सर्वांत मोठा पक्ष आहे' असं म्हटलं आहे.
दुसरीकडे 'महाविकास आघाडी'च्या नेत्यांनीही त्यांच्या विजयाचे दावे केले आहेत. त्यातल्या बहुतांश नेत्यांनी आपापल्या जिल्हा आणि तालुक्यांचे गड राखलेले आहेत. पण या निकालाचा मग राजकीय अर्थ काय शोधता येईल?
1. भाजपाला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत धक्का
या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जरी गेल्या नाहीत तरीही प्रत्येक पक्षांकडून त्यांच्या विजयाचे दावे होणार. पण तरीही राज्यातल्या बदललेल्या समीकरणांचा फटका भाजपाला बसलेला दिसतो आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापूरात भाजपाच्या वाट्याला आलेलं अपशय जरी सर्वत्र चर्चिलं जात असलं तरीही राज्याच्या अन्य भागांतही भाजपाला मागे हटावं लागलं आहे.
विशेषत: नागपूर आणि विदर्भात. तिथं काँग्रेसला यश मिळतांना पहायला मिळालं आहे. चंद्रकांत पाटलांसोबतच फडणवीस, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांच्या भागांमध्येही भाजपाची पिछेहाट झालेली पहायला मिळते आहे. बीडमध्येही धनंजय मुंडे प्रकरणाचं सावट या निवडणुकीवर असतांनाही 'राष्ट्रवादी काँग्रेस'नं भाजपावर कुरघोडी केली आहे.
"मागच्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत भाजपाची यंदा पिछेहाट झाली आहे हे दिसतंच आहे," राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी त्यांचं निरिक्षण नोंदवलं.

"त्यांना त्यांचं यश राखता आलं नाही. याचं मुख्य कारण मला दिसतं ते म्हणजे संरपंचपदाची थेट न झालेली निवडणूक. गेल्या वेळेस थेट निवडणुकीचा भाजपाला फायदा झाला होता. पण यंदा तसं नव्हतं. पण आता नंतरच्या स्थानिक समीकरणांमध्ये काही प्रयत्न करुन आपला संरपंच बसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो," असं देशपांडे म्हणाले.
पण अभय देशपांडे असंही म्हणाले की या निवडणुकीनं भाजपचं 'पॅन महाराष्ट्र' स्वरुप पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि पक्षाचा झालेला विस्तारही अधोरेखित झाला.
"चंद्रपूरपासून ते उत्तर महाराष्ट्र असो की कोकण, भाजप जवळपास सगळ्या पंचायतींपर्यंत पोहोचली आहे. बाकीचे तीन पक्ष आपापल्या भागांमध्येच भक्कम असतांना त्यांच्या तुलनेत भाजपचा विस्तार झालेला दिसतो आहे," देशपांडे म्हणाले.
2. 'महाविकास आघाडी'ला एकत्र असण्याचा फायदा
दुसरीकडे बदललेल्या समीकरणांचा 'महाविकास आघाडी'तल्या पक्षांना फायदा झालेला पहायला मिळतो आहे. महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांचे गड राखलेले आहेत असं चित्रं आहे. काँग्रेसला एकीकडे विदर्भात यश मिळतांना दिसतं आहे, पण दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडसारख्या ठिकाणी अनपेक्षित निकालही त्यांना पहावा लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'राष्ट्रवादी काँग्रेसनं'ही त्यांचे गड राखले आहेत. पण या सगळ्यांत शिवसेनेला मात्र फायदा होतांना पाहायला मिळाला. सर्वांत मोठा पक्ष आणि अधिक ग्रामपंचायती असणारा पक्ष बनण्यासाठी त्यांची भाजपासोबत स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या नारायण राणेंनी मात्र तळकोकणात सेनेला पराभव दाखवला आहे.
पण आकडे एकत्र केले की जसं राज्याच्या विधिमंडळात या तीनही पक्षांनी बहुमत बनवलं आहे तसं या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 'महाविकास आघाडी'चे एकत्र आकडे मोठे आहे. पण याचा अर्थ 'महाविकास आघाडी' गाव स्तरापर्यंत पोहोचली असा होतो का? "असं म्हणता येणार नाही कारण इथं पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नाही आहे आणि स्थानिक पातळीवरची समीकरणं वेगळी असतात. काही ठिकाणी तर आघाडीतले काही पक्ष भाजपाच्या गटासोबतही गेले आहेत. त्यामुळे सगळीच आघाडीची मतं एकत्र आली असं म्हणता येणार नाही. पण एकूण चित्र बघता आघाडीला फायदा झाला असं म्हणता येईल," असं अभय देशपांडे म्हणाले.
असंच मत 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांचं आहे. "एकंदरित या निकालांकडे पाहता 'महाविकास आघाडी'ला फायदा झाला झाला असंच म्हणावं लागेल. ते केवळ तीनही पक्ष एकत्र आल्यानं झालं. पण संघटनात्मक ताकद असल्याचा फायदा भाजपलाही दिसतो आहे. तेच सेना आणि 'राष्ट्रवादी'च्या बाबतीत म्हणता येईल. पण काँग्रेसची संघटनात्मक ताकद विस्कळीत असल्यानं पक्ष म्हणून ते बाकी तिघांच्या मागे असतील असं मला वाटतं आहे," असं संदीप प्रधान म्हणाले.
3.'एकत्र राहिलो तर...' चा फायदा हा महानगरपालिकांमध्येही?
'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत आल्यावर पडलेला प्रश्न असा होता की सत्तेचं हे वाटप इतर निवडणुकांमध्ये आणि स्थानिक पातळीवर कसं होणार? ते झालं तर निवडणुका जिंकता येतील का, स्थानिक कार्यकर्ते ते मान्य करतील का? पण अगोदर झालेल्या विधानपरिषद आणि आता ग्रामपंचायत निवडणुकांमधून हे समोर आलं आहे की एकत्र येऊन स्थानिक पातळीवर समीकरणं जुळवली की 'महाविकास आघाडी'तल्या पक्षांना फायदा होतो.

फोटो स्रोत, Twitter
आता झालेल्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरची नेत्यांची ताकद अधिक कामी आली, पण महानगरपालिकांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जातील. त्यामुळे जागावाटप करुन लढायच्या किंवा वेगळ्या लढून मतांची गणितं जुळवायची हे 'महाविकास आघाडी'ला ठरवावं लागेल, पण एकत्र येऊन रणनीति ठरवल्याशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट झालं आहे.
"जिथं शक्य आहे तिथं ते एकत्र येतील. जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती वगैरे ठरवून लढतील. पण एकत्र आल्यानं फायदा होतो हे आता त्यांना समजलं आहे," असं अभय देशपांडे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








