पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : शिवसेना भाजपची मतं खाणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसीसाठी कोलकात्याहून
पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतशी रंगत वाढत जातेय. शिवसेनेच्या प्रवेशाने तर ही रंगत आणखीनच वाढली आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोरील आव्हान आणखीच तीव्र झालं.
आता या निवडणुकीत आणखी एक खेळाडू उतरलाय आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. तो खेळाडू म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष. पश्चिम बंगालमध्ये शिवसेना जास्तीत जास्त जागा लढणार आहे. तशी घोषणाच पक्षाकडून करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
पश्चिम बंगालमधील शिवसेनेची स्थिती आणि तेथील निवडणुकांमधील इतिहास पाहता, भाजपच्या मतपेटीला फोडण्यासाठीच शिवसेनेनं निवडणुकीत उतरण्याचा निर्णय तर घेतला नाही ना? असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो.
पश्चिम बंगालच्या राजकारणाचा अभ्यास करणारे जाणकार आणि भाजप नेते सुद्धा हेच मानतात की, इथे शिवसेनेला निवडणूक लढवण्यास सांगण्यामागे ममता बॅनर्जी यांचाच हात आहे.
मात्र, शिवसेनेचा दावा आहे की, बांगला भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या रक्षणासाठी ते निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या कोलाकातास्थित प्रदेश कार्यालयात सध्यातरी एकही नेता नाहीय.
शिवसेनेचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शांती दत्त हे निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चेसाठी मुंबईत आहेत.
बीबीसीशी फोनवरून बोलताना ते म्हणाले की, "नेतृत्त्वाशी चर्चा केल्यानंतर किमान 100 जागांवर निवडणूक लढण्याचं ठरवलं गेलंय. आम्ही निवडणुकीची तयारीही सुरू केलीय."

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचे पश्चिम बंगालमधील सरचिटणीस अशोक सरकार हे सध्या उत्तर पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही 2016 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. दोन्हीवेळा फारसा प्रचार न करताही आमच्या उमेदवारांना चार-साडेचार हजार मतं मिळाली होती. यावेळी आम्हाला अधिक यश मिळेल."
"बांगला भाषा, संस्कृती आणि अस्मित यांच्या रक्षणासाठी शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. आम्ही प. बंगालमध्ये चांगलं काम करू इच्छित आहोत आणि पक्षाचा आधार आणखी कणखर करू इच्छित आहोत. लोकशाहीत लहान लहान पक्षही राज्याच्या निवडणुका लढू शकतात, हेही आम्ही दाखवून देणार आहोत," असं अशोक सरकार म्हणतात.
शिवसेनेने 2016 साली विधानसभेत मालदासह उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, नदियाँ, मुर्शिदाबाद, मेदिनीपूर आणि अलीपूरदुआरसह अनेक जिल्ह्यात 22 जागा लढवल्या होत्या. गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, काही खास छाप पाडता आली नव्हती.
भाजपला किती फरक पडणार?
असे आरोप होत आहेत की भाजपची मतं खाण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली आहे.
यावर सरकार सांगतात, "हे आरोप निराधार आहेत. भाजप आमची मतं मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. केंद्रातील भाजप सरकार फॅसिस्ट आहे. ठराविक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे, सर्वसामान्य माणसांसाठी नाही. इंदिरा गांधी यांनी घोषणा करुन आणीबाणी लागू केली होती. मोदी सरकारच्या काळात अघोषित आणीबाणीसारखंच वातावरण आहे".
शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देताना ते म्हणाले," 50हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही शेतकऱ्यांचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचत नाहीये".

फोटो स्रोत, Getty Images
येत्या काही दिवसात भाजपचे 12 हजार समर्थक शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
बंगालमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आणि चिरंजीव आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत स्टार प्रचारक असतील. टीएमसी पक्षाशी कोणत्याही स्वरुपाची हातमिळवणी होणार नाही असं सरकार यांनी सांगितलं. बांग्ला भाषा, संस्कृती, हिंदू अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही मतं मागू असं त्यांनी सांगितलं.
टीएमसीशी हातमिळवणीचे आरोप
शिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये काहीही स्थान नाही असा दावा भाजपने केला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश मझुमदार सांगतात, "बंगालमध्ये शिवसेनेचं काहीही स्थान नाही. भाजपविरुद्ध टीएमसीच्या मदतीसाठी शिवसेना बंगालमध्ये मैदानात उतरली आहे. मात्र यामुळे भाजपच्या मतांमध्ये कोणताही फरक पडणार नाही", असं त्यांनी सांगितलं

फोटो स्रोत, ANI
टीएमसीचे ज्येष्ठ नेते तापस रे सांगतात, "शिवसेनेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याकडे भाजप पक्ष म्हणून कसं बघतं हा त्यांचा दृष्टिकोन आहे. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाहीत कोणताही पक्ष निवडणूक लढवू शकतो. आम्ही कोणाला रोखू शकत नाही".
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेना रिंगणात उतरण्याचा स्पष्ट अर्थ हाच की त्यांचा डोळा भाजपच्या मतपेटीवर आहे.
ओवैसी यांच्याप्रमाणे शिवसेनेची काय भूमिका?
राजकीय विश्लेषक समीरन पाल सांगतात, "शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणं ही ममता बॅनर्जी यांच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. एखादा पक्ष स्वत: जिंकून देण्याऐवजी दुसऱ्या पक्षाला जिंकून येण्यासाठी मदत करत असल्याचं चित्र पश्चिम बंगालमध्ये नवीन नाही. शिवसेनेला याआधी बंगालमध्ये कधीही विजय मिळालेला नाही. यावेळीही ती शक्यता धूसरच आहे. टीएमसीविरुद्ध ओवैसी यांची जी भूमिका आहे तशीच काहीशी भूमिका शिवसेनेची भाजपविरुद्ध असेल".
शिवसेनेला मिळणारं एक एक मत भाजपच्या व्होटबँकेला घर करणारं असेल असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
निर्माल्य बॅनर्जी राजकीय निरीक्षक आहेत. ते सांगतात, "शिवसेना पश्चिम बंगालमध्ये बांग्ला राष्ट्रवादाला चालना देऊ इच्छिते. टीएमसी आणि ममता बॅनर्जी यांचा मुद्दाही तोच आहे. शिवसेना याच माध्यमातून भाजपची मतं फोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
अल्पसंख्याक समाजाची मतं आपल्या बाजूने मिळवण्यासाठी ओवैसी यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहेय. त्याच धर्तीवर शिवसेनेलाही भाजपची मतं अशी पद्धतीने आपल्याकडे वळवायची आहेत".
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








