निधी राजदान : फिशिंग म्हणजे काय आणि ऑनलाईन फसवणुकीपासून कसा बचाव करायचा?

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या माजी पत्रकार निधी राजदान या शुक्रवारी (22 जानेवारी 2021) सोशल मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत सर्वत्र चर्चेत राहिल्या. याला कारण निधी राजदान यांचं एक ट्वीट होतं.

निधी राजदान यांनी ट्वीट करून सांगितलं की, त्यांच्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडलाय. अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांना ऑफर या फसवणुकीतून देण्यात आली.

या फसवणुकीला बळी पडल्यानं निधी राजदान यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीतील नोकरीही सोडली होती.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मी एका अत्यंत गंभीर फिशिंग हल्ल्याची बळी ठरलीय."

'फिशिंग हल्ला' म्हणजे काय?

फिशिंग ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे. यातून लोकांना बँकेची माहिती किंवा पासवर्ड्स यांसारखी खासगी माहिती शेअर करण्यास सांगितलं जातं.

अशी फसवणूक करणारे लोक स्वत:ला प्रतिष्ठित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात आणि समोरील व्यक्तीला तसा विश्वासही ठेवायला भाग पाडतात. त्यानंतर खासगी माहिती काढून फसवणूक करतात.

हे हल्लेखोर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवतात, तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क करतात किंवा सरळ फोनही करतात.

फिशिंगला बळी पडलेल्या लोकांना वाटतं की, ते मेसेज किंवा फोन त्यांच्याच बँक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून आलेत.

बँक खात्याच्या अॅक्टिव्हेशनसाठी किंवा सिक्युरिटी चेकसाठी काही माहिती मागितली जाते. माहिती न दिल्यास तुमचं खातं बंद होण्याची भीती दाखवली जाते. अशा गोष्टीतून काही फसवणूक होऊ शकते, हे माहित नसलेले लोक खासगी माहिती शेअरही करतात.

यातून पीडित व्यक्तीला एका बनावट वेबसाईटवर नेलं जातं. ती वेबसाईट पूर्णपणे खरी वाटते. तिथे जाऊन खासगी माहिती मागितली जाते.

खासगी माहिती तिथे दिल्यानंतर सायबर गुन्हेगार त्या माहितीचा वापर करतात आणि फसवणूक करतात. त्या फेक वेबसाईट्समध्ये मालवेअर इंस्टॉल केला जातो. त्यातूनच तुमची माहिती चोरली जाते.

लोकांची फसवणूक करून त्यांचे पासवर्ड आणि तत्सम खासगी माहिती मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगारांसाठी हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो.

ऑनलाईन फसवणूक कशी रोखायची?

मात्र, या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काही मार्ग आहेत.

अनोळखी ठिकाण, लोकांकडून येणारे कॉल, ईमेल आणि मेसेजपासून नेहमीच सावध राहा. विशेषत: तुम्हाला नावानं संबोधित न करणाऱ्या व्यक्तीपासून अधिक सावध राहा.

मोठ्या कंपन्या कधीच तुमच्याकडे तुमची माहिती ईमेल किंवा फोनद्वारे मागत नाहीत.

लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या कॉल, मेसेज आणि ईमेलपासून सावध राहा.

मात्र, एखादा ईमेल करणारा किंवा फोन करणारा संबंधित कंपनीचा आहे, याची पूर्ण खात्री नसेल, तर थेट संबंधित कंपनीला फोन करून तपासा. यासाठी संबंधित कंपनीच्या बिल, बँक स्टेटमेंट किंवा अन्य कागदपत्रावर असलेल्या फोन नंबरचाच वापर करा.

ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)