धनंजय मुंडे प्रकरणी महाविकास आघाडीच्या महिला नेत्या गप्प का?

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

राज्यात महिला अत्याचार, महिलांचे हक्क, महिला धोरण अशा विविध विषयांवर सातत्याने बोलणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला नेत्या मात्र बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांच्याबाबतीत नि:पक्षपाती भूमिका घेताना दिसल्या नाहीत अशी टीका केली जात आहे.

यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. धनंजय मुंडेप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोयीस्करित्या मौन धारण केले आहे का? एरवी महिलांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या महिला आघाड्या मुंडे प्रकरणात शांत का? महिलांवरील अत्याचार अशा विषयांचेही राजकारण केले जाते का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

'महिला नेत्या हरवल्या आहेत का?'

धनंजय मुंडेंच्या प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एकही महिला नेत्याने नि:पक्षपाती भूमिका मांडली नाही असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले. पण गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडीतील महिला नेत्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया किंवा आपली भूमिका मांडलेली नाही. हे अत्यंत खेदजनक असून महिला नेत्यांचे हे दुटप्पी धोरण आहे."

तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड

फोटो स्रोत, HT via Getty Images

फोटो कॅप्शन, तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, महिला व बाल कल्याण मंत्री आणि काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांसारख्या महिला नेत्या कायम महिलांच्या विविध मुद्यांवर बोलत असतात. "मग या महिला नेत्या आता हरवल्या आहेत का?" असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला.

"आपल्या पक्षातील नेत्यांवर आरोप झाले की महिला सक्षमीकरण, महिला अत्याचार असे विषय सोयीस्कररीत्या विसरायचे आणि केवळ विरोधी पक्षातील नेता असल्यास आंदोलन करायचे हे चुकीचे आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेवरही काही नेत्यांनी आरोप केले आहेत. तसंच भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसेचे नेते मनीष धुरी यांनी महिलेविरोधात तक्रारही केली आहे.

"संबंधित महिलेवरही आरोप केले आहेत. त्याच्या चौकशीचीही मागणी आम्ही करत आहोत. पण अशा प्रकरणात महिला नेत्यांनी आपल्या पक्षाचा संबंध असला तरी पुढाकार घेऊन मत मांडले पाहिजे असे आम्हाला वाटते." असेही तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

भाजपच्या महिला मोर्चाने मात्र विरोधी पक्ष या नात्याने धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी अशी मागणी केली आहे.

चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

फोटो स्रोत, CHITRA WAGH SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले, "पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. कितीही मोठा नेता असला तरी दोषींना पाठीशी घालू नये. संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले पाहिजे."

"अशा घटनांमध्ये पीडित आणि तिच्या कुटुंबावर दबाव येऊ शकतो. पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते. आरोप नष्ट होऊ शकतात. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायऊतार व्हावे," अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

भाजपच्या महिला मोर्चाकडून 18 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील महिला नेत्या गप्प का?

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. पण या तिन्ही पक्षातील एकही महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात ठोस भूमिका किंवा मागणी किंवा निवेदन दिलेले नाही.

नीलम गोऱ्हे

फोटो स्रोत, @neelamgorhe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण, रुपाली चाकणकर, महिला व बाल कल्याणमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, प्रियंका चतुर्वेदी अशा अनेक नेत्या महिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत असतात.

पण या प्रकरणात नेत्यांनी सोयीस्कर मौन धारण केले की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. याप्रकरणी आम्ही तिन्ही पक्षांच्या महिला नेत्यांशी संपर्क साधला, पाहूयात त्या काय म्हणाल्या,

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आता बोलण्यात काहीच अर्थच नाही. हे सगळं भयंकर आहे. त्यांनी लग्न केलंय. विवाहबाह्य संबंधातूनही दोन मुलं आहे. त्यानंतर इतर महिलेकडून ब्लॅकमेलिंग सुरू झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतींचे वाटते. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलायचे नाही असे मी ठरवले होते."

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Dhananjay Munde/facebook

फोटो कॅप्शन, धनंजय मुंडे

"कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे असो किंवा कुणीही असो कुणालाही अभय देण्याचा प्रयत्न नाही. या प्रकरणाची मला आधीच कल्पना होती. मुंबईत हनीट्रॅपची प्रकरणं सर्रास चालतात."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना म्हटलं, "आरोप झाल्यानंतर या प्रकरणात अनेक ट्विस्ट आल्या आहेत. विषय संवेदनशील आहे. भारतातले कुटुंबम्हणजे कपल नसतं. त्यामुळे कुटुंबाचाही विचार केला पाहिजे. आपण पोलिसांवर विश्वास ठेऊया. त्यांच्या चौकशीअंती आपण बोलू."

तर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून संबंधित विषय अत्यंत गुंतागुंतीचा असल्याची प्रतिक्रिया दिली.

विधानपरिषदेच्य़ा उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "घटना उघड झाल्यानंतर प्रथमदर्शनी जी माहिती समोर आली ती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कळवलेली आहे. या प्रकरणात सरकार योग्य ते पाऊल उचलेल असे आश्वासन मला देण्यात आले आहे. आम्ही याप्रकरणी माहिती घेत आहोत असे मला सांगण्यात आले"

राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत असल्याने मित्र पक्षाच्या नेत्यावर टीका करता येणार नाही असे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना वाटते का?

यासंदर्भात बोलताना नीलम गोऱ्हे सांगतात, "इतर प्रकरणांमध्ये तक्रारदार महिला किंवा पीडित महिलेला मदतीची गरज असते. तक्रार करण्यात किंवा सरकारी वकील मिळवून देण्यात आम्ही मदत करतो. पण हे प्रकरण वेगळे आहे. यात राजकारणसुद्धा असल्याने त्यात अधिक दखल घेता येत नाही."

यशोमती ठाकूर

फोटो स्रोत, Twitter/Yashomati Thakur

फोटो कॅप्शन, यशोमती ठाकूर

शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही आपण प्रतिक्रिया न देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले, "हे प्रकरण अचानक समोर आलं आणि अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे प्रकरण आहे. तसंच प्रकरण न्य़ायप्रविष्ट देखील आहे. धनंजय मुंडेंनी 2019 मध्ये न्यायालयात दाद मागितली होती. संबंधित महिलेविरोधातही तक्रारी आल्या त्यामुळे प्रकरणाचे चित्र बदलले आहे."

काँग्रेसच्या महिला नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त

राज्यात भाजपनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. पण अनेक महिने उलटले तरी राज्यात महिला आयोगासाठी अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही. तसंच समितीही स्थापन झालेली नाही.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Twitter / @NCPSpeaks

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडी

यासंदर्भात बोलताना विद्या चव्हाण असं सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आम्ही महिला आयोगाचे हे पद भरण्यासाठी मागणी केली आहे. यासंदर्भात एक यादीही पाठवली आहे. पण सरकारकडून निर्णय झालेला नाही."

महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न मार्गी लागत असतात. पीडित महिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महिला आयोग एक सक्षम व्यासपीठ ठरू शकते. पण ठाकरे सरकारमध्ये अद्याप महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे.

"महिला आयोगाला लवकरात लवकर अध्यक्ष मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. महिला आयोगाला अध्यक्ष आणि समितीची स्थापना करा असंही माझ्या पत्रात मी म्हटलं आहे." अशी माहिती शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)