धनंजय मुंडे प्रकरण : पंकजा मुंडेंच्या मौनाचा अर्थ काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलं. त्यांच्या स्वत:च्या पक्षातून, सहयोगी पक्षांतून आणि विरोधी पक्षातून त्यावर प्रतिक्रियाही आल्या. पण एका व्यक्तीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी काही टीकेच्या होत्या, काही संयमाच्या होत्या तर काही त्यांच्या बाजूच्या होत्या. पण या तीनही गटातल्या अनेकांनी या प्रकरणावर मौनही बाळगलं आहे आणि अद्याप काहीही भूमिका घेतली नाही आहे. त्यातल्या एका मौनाची चर्चा मात्र आहे. ते मौन पंकजा मुंडे यांचं आहे.
पंकजा मुंडे यांनी अद्याप या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या अशा भाजपाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
त्यात मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. पण या नेत्यांपेक्षा पंकजा मुंडे यांची भूमिका दोन मुद्द्यांवर अधिक महत्वाची आहे.
एक म्हणजे धनंजय हे त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक आहेत आणि एकाच मतदारसंघासाठी दोघेही लढतात. आणि दुसरीकडे धनंजय हे त्यांचे भाऊही आहेत आणि या संवेदनशील प्रकरणात कुटुंबीय म्हणून पंकजा काही भूमिका घेऊ शकतात का, हाही प्रश्न आहे.
याशिवाय राज्यातल्या एक महत्वाच्या महिला नेत्या म्हणूनही या प्रकरणावरील त्यांच्या भूमिककडे सगळ्यांचे लक्ष असेल.
गुरुवारी (14 जानेवारी) या प्रकरणाबाबत विविध राजकीय घडामोडी होत असतांना जेव्हा 'बीबीसी मराठी'नं याबद्दल पंकजा यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला होता. त्यांनी अद्याप अन्य माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली नाही आहे.
राजकीय विरोधकाच्या अडचणीचा फायदा?
राजकारणात आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्याचा खेळ सातत्यानं सुरु असतो. जर तो अथवा ती प्रतिस्पर्धी स्वत:हून अडचणीत आला अथवा आली, तर त्या अडचणीचं राजकीय संधीत रुपांतर करण्याची वेळ साधली गेल्याचंही नेहमीच पाहिलं जातं.
इथे धनंजय मुंडे यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले तपशील आणि आरोप समोर आले, पण त्यांचं राज्य सरकारमधलं स्थान पाहता त्याचे राजकीय परिणामही लगेच दिसू लागले.

फोटो स्रोत, DHANANJAY MUNDE/ FACEBOOK
त्यांच्या आमदारकी-मंत्रिपदाच्या राजीनाम्यापासून ते 'राष्ट्रवादी'च्या भूमिकेपर्यंत, सर्वांवरच मुख्य विरोधक असणारा भाजप तुटून पडला. पण पंकजांचं अद्याप मौन आहे.
सध्याच्या परळीच्या, बीडच्या आणि राज्याच्या राजकारणात पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे प्रथम प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्ध्याकडून प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारीसाठी सुरु झालेल्या त्यांच्यातल्या स्पर्धेनं आतापर्यंत अनेक प्रकारचे राजकीय आणि व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप पाहिले आहेत.
पंकजा गेल्या सरकारमध्ये मंत्री असताना विरोधक म्हणून 'राष्ट्रवादी'ने त्यांच्यावर आरोप केले. विधानपरिषदेत आणि बाहेरही या आरोपांचा चेहरा धनंजय होते. बीड आणि परळीतल्या स्थानिक सत्तास्थानांपासून ते विधानसभेपर्यंत 'डीएम' विरुद्ध 'पीएम' अशी कटू लढाई चालली.
2019 मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक या कटुतेचं नवं रेकॉर्ड होतं. त्यात धनंजय मुंडेकडून झालेल्या वक्तव्यांवरुन - जी वक्तव्यं त्यांनी आपण केल्याचं नाकारलं, भावनिक राजकीय नाट्य पहायला मिळालं.
परळीत पहिल्यांदा धनंजय यांच्याकडून पंकजा यांचा पराभव झाला. त्याचा राजकीय फटका पंकजांना पक्षांतर्गही बसला. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आता धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या एका आव्हानात्मक परिस्थितीत असताना विरोधी पक्ष 'भाजप'मध्ये असलेल्या पंकजा मुंडे, कोणती राजकीय भूमिका घेतील का? हा प्रश्न विचारला जातो आहे.
"पंकजा न बोलण्याचं कारण हे राजकीय आहे. कारण त्या जर बोलल्या तर त्याची प्रतिक्रिया ही बीडमधून येईल आणि ती त्यांच्या फायद्याची नसेल," मराठवाड्याचे असलेले राजकीय पत्रकार अभिजित ब्रम्हनाथकर म्हणतात.
"आणि त्यांचं मौन हे कौटुंबिक कारणातूनही आहे. कारण जे आरोप आहेत त्यांचं स्वरूप हे व्यक्तिगत आणि चारित्र्याशी संबंधित आहे. ते राजकीय नाही. भाजप आंदोलन करतं आहे ते प्रदेश स्तरावर. पक्ष म्हणून म्हणून ते करताहेत. जर पंकजा त्यात आल्या तर ते व्यक्तिगत होईल. ते त्यांना नको आहे. आणि माझ्या मते मौन हीसुद्धा एक राजकीय भूमिकाच असते," ब्रम्हनाथकर पुढे म्हणतात.
कौटुंबिक भावना राजकारणापेक्षा महत्वाची ठरते का?
ज्या प्रकारचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाले आहेत ते संवेदनशील आहेत. त्याच्या राजकीय परिणामांचा भाग वेगळा केला तर ते कुटुंबासाठीही आव्हानात्मक आहेत.
व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावरचे तपशील जाहीर होऊन त्यावरुन आरोप होणं हे कुटुंबाच्या स्तरावरही अडचणीचं आहे. त्यामुळे पंकजा यांच्या भूमिका न घेण्यामागे वा व्यक्त न होण्यामागे अशा कौटुंबिक भावनेचा विचार आहे का?
एकमेकांच्या वैयक्तिक अडचणीच्या काळात पाठिंबा दर्शवणं, हे पंकजा आणि धनंजय मुंडे सातत्यानं करत आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर वा धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांच्या निधनानंतर दोघेही एकमेकांना भावनिक आधार देण्यासाठी पुढे आले होते.

फोटो स्रोत, TWITTER/DHANANJAY_MUNDE
नुकतीच पंकजांना कोरोनासदृश लक्षणं जाणवल्यावर आणि त्यांनी तसं समाजमाध्यमांवर सांगितल्यानंतर कोविडमुक्त होऊन बरे झालेल्या धनंजय मुंडे यांनी पंकजांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा समाजमाध्यमांवरून दिल्या होत्या.
पूर्वी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र सरकारमध्ये असताना त्यांच्यावरही अशा प्रकारचे आरोप झाले होते आणि राजकीय विरोधक त्याचा उल्लेख करत होते. त्याची जाणीव असल्याने आताच्या राजकीय वादात बहिण-भाऊ एकमेकांविरुद्ध प्रतिक्रिया देत नसावेत असाही कयास आहे.
"मला वाटतं की या विषयावर काहीही न बोलण्यामागचं कारण कौटुंबिक असावं. आणि महिलांच्या अशा आरोपांबाबत न बोलणं हे राजकीय प्रगल्भतेचं लक्षण आहे. म्हणजे अशा आरोपांमागून स्वत:ची राजकीय पोळी भाजून न घेणं. शिवाय चारित्र्यावर जेव्हा आरोप होतो तेव्हा शांत बसणं हे उचित आहे. एक नोंद घेण्यासारखं ते म्हणजे, गेल्या काही महिन्यात पंकजा आणि धनंजय हे दोघं भावंडं म्हणून परत बोलायला लागले आहेत. तेव्हा अशा वेळेस या मुद्यावर काही न बोलणं हेच योग्य, असं पंकजांनी ठवलेलं असावं," असं पंकजांचं राजकारण जवळून पाहणा-या राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताच 'भाजप'च्या महिला आघाडीनंही यावर तात्काळ भूमिका घेत कारवाईची मागणी केली.
शिवाय पंकजा मुंडे या राज्यातल्या एक महत्वाच्या प्रभाव असलेल्या महिला नेत्याही आहेत. त्यामुळे एका तक्रारदार महिलेने असे आरोप केल्यावर नेत्या म्हणून त्यांची प्रतिक्रिया काय हा प्रश्नही विचारला जाणं स्वाभाविक आहे.
अर्थात आता प्रकरणालाही वेगळं वळण मिळालं आहे. तक्रारदार महिलेवर विविध पक्षातल्या नेत्यांनी ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय यांची बाजू तूर्तास सावरली गेल्याचं म्हटलं जातं आहे.
हे आरोप 'गंभीर' स्वरुपाचे आहेत असं म्हटलेल्या शरद पवार यांनी आज या तक्रारदारावर होणा-या आरोपांचीही शहानिशा व्हायला हवी असं म्हटलं आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'नं सध्या धनंजय मुंडे यांना राजीनाम्यापासून अभय दिलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








