धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सत्य पुढे येईपर्यंत नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. जोवर सत्य पुढे येत नाही, तोवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत

मुंबईत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले,

"धनंजय मुंडेंना आधीच लक्षात आलं की ब्लॅकमेल होऊ शकतं. म्हणून ते आधीच कोर्टात गेले होते. हे प्रकरण आता कोर्टात आहे. मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने यापूर्वी 3 व्यक्तींविरोधाक आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, असं पुढे आलं.

या प्रकरणाची चौकशी पोलीस विभाग करेल. आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. या चौकशीत महिला अधिकारी असावी. काल मी बोललो तेव्हा या सगळ्या गोष्टी माहीत नव्हतं. म्हणून गंभीर शब्द वापरला. यात खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. सत्य जाणून घेण्याची गरज आहे. नाही तर कुणावर आरोप करायचे आणि म्हणायचे की तुम्ही सत्तेपासून बाजूला व्हा.

भाजपच्या एका नेत्याने पोलीसांनी नीट चौकशी करावी ही मागणी केली आहे. त्यांनी लगेच राजीनामा द्या असं म्हटलं नाही.

गुन्हा दाखल करणं काम पोलिसांचं आहे. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाणं गरजेचं असतं. हे 2-3 उदाहरणं आली नसती तर परिस्थिती वेगळी होती.

पीडीत महिलेबद्दल तक्रारी आल्यानंतर प्रश्नाचं स्वरूप बदललं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)