You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनू सूद सराईत गुन्हेगार- मुंबई महापालिका : #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. सोनू सूद सराईत गुन्हेगार- बीएमसी
मुंबईसह देशात कोरोनानं थैमान घातलेलं असताना राज्यातील परप्रांतीय कामगारांसाठी घरी जाण्याची सुरक्षित व्यवस्था करणारा अभिनेता सोनू सूद हा एक 'सराईत गुन्हेगार' असल्याचा आरोप मुंबई महापालिकेनं केला आहे.
जुहूमधल्या एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
त्यालाच उत्तर देताना पालिकेनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
यात पालिकेनं स्पष्ट केलंय की सोनू सूदनं कोणताही परवाना न घेता एका निवासी इमारतीत निवासी हॉटेल सुरू करून मुंबई महापालिका कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसंच त्या इमारतीत बेकायदेशीर बदल करत एमआरटीपी कायदाही मोडला आहे.
यासाठी पालिकेच्यावतीनं त्याला वारंवार नोटीसही बजावून कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच आहे असा आरोप करताना व्यावसायिक दराने नळ जोडणी घेणंही सोनूनं आवश्यक मानलं नाही, असं महापालिकेनं सांगितलं आहे.
तसंच एमसीझेडएमएकडनं मिळवलेल्या एनओसीतील अटीशर्तीही पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे अशा याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा न देता त्यानं केलेली याचिका मोठा 'आर्थिक दंड' आकारून फेटाळून लावावी अशी मागणी पालिकेनं आपल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
"जर तुम्ही स्वच्छ हातानं कोर्टात आला नसाल तर पुढे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील", या शब्दांत हायकोर्टानं सोनू सूदला इशारा दिला आहे.
सोनूने जुहू येथील 'शक्ती सागर' या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेच्या 'के पश्चिम' विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार गेल्यावर्षी 24 ऑक्टोबरला पालिकेच्या पथकाकडून तिथली पाहणीही करण्यात आली होती. त्यावेळी तिथं मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले असल्याचा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आला.
याप्रकरणी पालिकेने सोनू सूदला नोटीसही पाठवली होती. त्यावर आता एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी सोनू सूदवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार 4 जानेवारी रोजी महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात दिली आहे.
2. घराणेशाहीचं राजकारण हा लोकशाहीचा मोठा शत्रू-मोदी
घराणेशाहीचे राजकारण हा लोकशाहीचा सर्वांत मोठा शत्रू असून त्यामुळे नव्या स्वरूपातील हुकूमशाहीचा उदय झाला आणि देशावर अकार्यक्षमतेचा बोजा पडल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख न करता केली.
दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर चौफेर हल्ला चढवला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांच्यात कायद्याबद्दल आदर नाही आणि भीतीही नाही कारण आपल्या पूर्वसुरींना भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरण्यात आले नाही तसंच आपलंही कोणीही काहीही करू शकणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे", असंही मोदी म्हणाले.
"राजकारणामध्ये आडनावांच्या आधारावर जे निवडून येतात त्यांना भवितव्य नसते हे सत्य आहे, मात्र राजकारणातील या विकाराचे संपूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, असेही ते म्हणाले. अद्यापही असे लोक आहेत की ज्यांची वागणूक, कल्पना आणि उद्देश आपल्या कुटुंबाच्या राजकारणाचा बचाव करणे हेच आहे. धराणेशाहीच्या राजकारणामुळे 'आपण आणि आपले कुटुंब' हीच भावना वृद्धिंगत होते, 'देश प्रथम' ही भावना मागे पडते, असेही पंतप्रधान म्हणाले.
3. समितीकडून अदानी-अंबानींना सोयीस्कर अहवाल येईल- राजू शेट्टी
न्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. "कोर्टानं कायद्याचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. ते अदानी आणि अंबानींनी सोयीस्कर होईल असा अहवालच देतील. तो कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो. तसंच कदाचित सर्वोच्च न्यायालयाला म्हणायचे असेल," असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
कृषी कायद्यांची वास्तविकता जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत भारतीय किसान युनियनचे जितेंद्रसिंह मान, आंतरराष्ट्रीय धोरणांविषयीचे तज्ज्ञ डॉ. प्रमोद कुमार जोशी, कृषीतज्ज्ञ अशोक गुलाटी, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांचा समावेश आहे.
पुढील आदेशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, दोन महिन्यात समितीला अहवाल सादर करायचा आहे. समितीच्या अहवालानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
4. नथुराम गोडसे अभ्यासकेंद्र बंद
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या नावाने सुरू झालेलं अभ्यासकेंद्र बंद करण्यात आलं आहे. 'गोडसे ज्ञान शाला' असं या केंद्राला नाव देण्यात आलं आहे. हिंदू महासभेच्या पुढाकारानं ग्वाल्हेरच्या हिंदू महासभा भवनात हे केंद्र उभारलं गेलं होतं.
या ज्ञानशालेवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आलं. या अभ्यासकेंद्राविरोधात असंख्य तक्रारी दाखल झाल्या तसंच सोशल मीडियावर या निर्णयावर टीका होऊ लागली. या सगळ्याची दखल घेत अभ्यासकेंद्र बंद करण्यात आलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
यापूर्वीही मध्य प्रदेशातीलच भाजपच्या खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेचं समर्थन केलं होतं.
मध्य प्रदेशातील या कृतीचं भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला होता.
"नथुराम गोडसेंचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ज्यांनी खून केला, हत्या केली, अशा व्यक्तीचं या देशात महिमामंडन होऊ शकत नाही. अशाप्रकारे कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चूक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही," अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.
5. भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने पाठवला समोसा अंतराळात
ब्रिटनमधील चायवाला रेस्टॉरंट या भारतीय रेस्टॉरंटने अंतराळात समोसा पाठवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं आहे. समोसे पाठवण्यासाठी रेस्टॉरंटचे मालक नीरज यांनी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला.
पहिल्यांदा त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला. दुसऱ्यावेळी पुरेसं हेलियम नव्हतं. तिसरा प्रयत्न यशस्वी ठरला. सध्या या समोश्याचा व्हीडिओ व्हायरल होत असून, त्यात फुग्यासह समोसा अंतराळात जाताना दिसत आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)