You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सायन नेहवाला कोरोनाची लागण; थायलंड स्पर्धेतून माघार
भारताची ऑलिम्पिक पदकप्राप्त बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी सोशल मीडियात दिसू लागली. काही तासानंतर सायनाने यासंदर्भात ट्वीट करून नेमकं काय झालं ते स्पष्ट केलं आहे.
"मला माझ्या कोव्हिड चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. काल (सोमवारी) कोव्हिडची तिसरी चाचणी घेण्यात आली होती. मॅचआधी सराव करत असताना आयोजकांनी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मला बँकॉकमधल्या हॉस्पिटलमध्ये रवाना होण्यास सांगितलं. नियमांनुसार चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर पाच तासात अहवाल मिळणं अपेक्षित आहे", असं सायनाने म्हटलं आहे.
आयोजकांच्या मते सायनाला कोरोना संसर्ग झाला आहे, मात्र तसा अहवाल सायनाला मिळालेलाच नाही अशी विचित्र परिस्थिती आहे.
फुलराणी या नावाने प्रसिद्ध सायना सध्या थायलंडमध्ये असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच ती तिथे रवाना झाली होती.
पुरुष खेळाडू एच. एस. प्रणॉयलासुद्धा कोरोना संसर्ग झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी थायलंड ओपन स्पर्धेतून माघार घेतल्याचं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं म्हटलं आहे.
सायना आणि प्रणॉ़य यांना कोरोना झाला आहे असंही संघटनेने स्पष्ट केलं आहे. बॅडमिंटनपटू कश्यप हा सायनाचा नवरा आहे. सायना कोरोनाग्रस्त झाल्याने कश्यपनेही स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सायना आणि प्रणॉय यांना दहा दिवसांच्या क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. तिथे त्यांना नेण्यात आलं आहे, असं संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कश्यप हॉटेल रुममध्ये क्वारंटीन आहे, असं संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितलं.
दरम्यान कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही अन्य भारतीय खेळाडूंची पुन्हा कोरोना टेस्ट आज पुन्हा घेण्यात येईल.
भारताचे साईप्रणीत, किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा, समीर वर्मा, शुभंकर डे, अजय जयराम, सिरील वर्मा, चिराग सेन, मिथुन मंजूनाथ, कार्तिकेय गुलशन कुमार, राहुल यादव तसंच पी. व्ही. सिंधू, साई उतेजिता राव, रुथविका शिवानी गड्डे, तन्वी लाड, अनिरुद्ध मयेकर, सात्विकसाईराज रणीकरेड्डी, मनू अत्री, एम. आर. अर्जुन, चिराग शेट्टी, सुमीत रेड्डी, ध्रुव कपिला, अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी हे स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
सोमवारी सायनाने कोरोना चाचणीचा व्हीडिओ शेअर केला होता. सायनाच्या कोरोनाच्या दोन चाचण्यांचा निकाल निगेटिव्ह आला होता. मात्र तिसऱ्या चाचणीत तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सायनाला स्पर्धेतून माघार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये क्वारंटीन होण्यास सांगण्यात आलं आहे.
2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. 2021 म्हणजे यंदा ही स्पर्धा होणार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने थायलंड ओपन ही भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची स्पर्धा आहे.
सायनाने 2012 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं. यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही सायनाचा दमदार खेळ पाहायला मिळेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र कोरोना नंतरच्या पहिल्याच स्पर्धेत कोरोना संसर्गावरून संदिग्धता पाहायला मिळत आहे.
सायनाने थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर ट्वीटच्या माध्यमातून काही मुद्दे मांडले होते. दिवसातून एकच तास सरावासाठी देण्यात आला आहे. जिमसाठीची वेळही तीच आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी ही महत्त्वाची स्पर्धा आहे.
फिजिओ आणि ट्रेनर आम्हाला भेटू शकत नाही. आमचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही असं का? अशा परिस्थतीत स्पर्धेसाठी फिट कसं राहायचं? असा सवाल सायनाने विचारला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)