भाजपला तामिळनाडूचं राजकारण का समजलेलं नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बद्री शेषाद्री
- Role, राजकीय विश्लेषक
रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढला किंवा नाही... काहीही होवो, प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा कायम असते.
रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढणार नसल्याचं म्हटलं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी पक्ष काढला असता आणि राज्य पिंजून काढत प्रचार केला असता तरी त्यांना तामिळनाडूची राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलता आली नसती.
भारतात राजकारणात येण्यासाठी जी पकड लागते ती रजनीकांत यांच्याकडे नाही. अभिनेते कमल हसन यांच्याकडेही ते कौशल्य नाही मात्र प्रसारमाध्यमांचं सदैव लक्ष लागून राहिलेल्या रजनीकांत यांच्याकडे ती हातोटी नाही.
रजनीकांत यांची एमजी रामचंद्रन आणि एनटी रामाराव यांच्याशी तुलना करणं योग्य नाही.
आधीपासून विस्तारत असलेल्या मजबूत विचारसरणीच्या पक्षाशी एमजी यांची नाळ जोडली गेली. त्यांनी पक्षासाठी काम केलं. ते आधी नेते झाले आणि मग त्यांनी राजकीय पक्ष काढला.
द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचा पाया हळूहळू एमजीआर यांच्या पक्षासाठी आधार ठरू लागला.
तेलुगू सुपरस्टार एनटीआर यांनी तेलुगू देसम पक्ष काढला तेव्हा आंध्र प्रदेशच्या राजकारणात सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता होती.
एनटीआर यांनी आरोप केला की, राजीव गांधी यांनी तेलुगू अस्मितेवर आक्रमण केलं आहे. तेलुगू अस्मितेची प्रतिमा मलिन केली आहे. ते याची परतफेड करू इच्छित आहेत असं ते म्हणाले. लोकांनी त्यांनी अहमहमिकेने पाठिंबा दिला.
सध्याची परिस्थिती वेगळी
मात्र तामिळनाडूमधली सध्याची परिस्थिती वेगळी आहे. रजनीकांत यांचं वय आणि प्रकृती त्यांना साथ देत नाहीये. त्यांनी समर्थकांनाही हा निर्णय स्वत: सांगितला नाही.
तामिळनाडूच्या राजकारणात विचारधारेवरून कालवाकालव होणं नेहमीचं आहे. मात्र स्वत:च्या भविष्यकालीन योजनेबाबत गोंधळ असणं अपेक्षित नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कदाचित असं असू शकतं की रजनीकांत यांच्या आसपास वावरणाऱ्या लोकांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न दाखवलं असेल जसं चित्रपटाच्या एखाद्या गाण्यात माणूस लक्षाधीश होतो.
त्यांनी केवळ स्वत: या गोष्टीवर विश्वास ठेवला असं नाही तर समर्थकांनाही ते स्वप्न दाखवलं होतं. आता प्रत्येकजण निराश आहे.
भाजपचा प्रवेश कधी?
पक्षाला आपल्या विचारधारेवर, आपल्या ताकदीवर, नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर विश्वास असायला हवा. अचानक उठून कोणी तरी अवतरणं आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणं एवढं सोपं नाही.
देशात असं कुठेही कधीही झालेलं नाही. चित्रपटविश्वातून आलेली माणसं त्यांच्याबरोबर माणसांचे जत्थे घेऊन येतात. मात्र भाजपला असं वाटतं की रजनीकांत केवळ गर्दी नव्हे मतंही आणतील.
म्हणूनच भाजप सातत्याने रजनीकांत यांना रिंगणात आणू पाहतंय.

फोटो स्रोत, Getty Images
रजनीकांत द्विधा मनस्थितीत आहेत. भाजपबरोबर गेलो तर आपलं भगवीकरण होईल अशी काळजी त्यांना भेडसावते आहे. अनेक माणसं रजनीकांत यांची भाषणं ऐकून त्यांना भाजपची बी टीम असं म्हणू लागले आहेत.
जरी रजनीकांत यांना भाजपमध्ये प्रवेश केला नसता तरी भाजपने रजनीकांत यांच्या पक्षाशी युती केली असती. मात्र आता हे स्वप्नही भंगलं आहे.
म्हणून आता रजनीकांत यांनी भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे एआयडीएमके कमल हसन यांच्याकडे समर्थन मागू शकतं.
भाजपची तामिळनाडूमधली स्थिती
भाजपसाठी हा धडा आहे. तामिळनाडूत भाजप हा लहानसा पक्ष आहे. यात चुकीचं काही नाही. अनेकजण असं म्हणतात की भाजपची स्थिती अशी आहे की त्यांची स्पर्धा प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा नोटाला मतं देणाऱ्या मतदारांशी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नोटापेक्षा कमी मतं पडू नयेत यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे.

फोटो स्रोत, Reuters
मात्र हे खरं नाही. भाजपची व्होटबँक सातत्याने वाढते आहे. माझं अनुमान असं की भाजप हा तामिळनाडूमधला तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे. मात्र अद्याप स्वबळावर निवडणूक लढवेल इतकी ताकद भाजपकडे नाही.
भाजपला तामिळनाडूत हातपाय रोवायचे असतील तर त्यांना कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल. मात्र या कामी रजनीकांत यांच्यासारखी माणसं उपयोगी पडणार नाहीत. मला असं वाटतं रजनीकांत या निवडणुकांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाहीत.
1996 मध्ये रजनीकांत यांच्याकडे भूमिका मांडण्यासाठी अनेक कारणं होती. आता ती कारणं उरलेली नाहीत. भाजपला हे पटत नाही. यातून हे स्पष्ट होतं की भाजपला तामिळनाडूचं राजकारण कळलेलं नाही.
भाजपने डीएमके विरोधी असल्याचं स्पष्ट केलं आहे. डीएमकेनेही भाजपविरोधी असल्याची प्रतिमा तयार केली आहे. अशा परिस्थितीत भाजपचं लक्ष्य हेच हवं की एआयडीएमकेच्या बरोबरीने युती करत डीएमकेला हरवणं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र भाजपचा असा इरादा असल्याचं जराही दिसून येत नाही. मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर विविध बाजूंनी दबाव आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडीचाही मुद्दा आहे.
अशा पद्धतीचा दबाव एआयडीएमके आणि भाजप या दोन्ही पक्षांना नुकसान करणारा ठरू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








