भीमा कोरेगाव : 1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस - प्रकाश आंबेडकर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन केलं. भीमा कोरेगामधल्या युद्धाचा आज 202 वा स्मृतिदिन आहे.

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईमध्ये जे शूरवीर शहीद झाले, त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो, असं अजित पवार यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले, "मधल्या काळात इथल्या घटनांना गालबोट लागलं. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं यातूम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज, महात्मा फुले यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या आदर्शांचा अवलंब करत आपण पुढे जात असतो. यंदा पोलीस विभागानं चांगला बंदोबस्त ठेवला.

"कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मी पुण्याचा पालकमंत्री आहे. मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इथं ज्या जागा आहेत त्या खासगी लोकांच्या जागा आहेत. पण, दरवर्षी 1 जानेवारीला लोक दर्शनासाठी येणार आहेत. त्यावेळेस सरकारनं पुढाकार घेऊन इथल्या काही जागा लोकांना सुविधा देण्याकरता नियोजन केलेलं आहे. स्थानिक जमिनींना योग्य प्रकारचा मोबदला राज्य सरकारकडून दिला जाईल," असं अजित पवार म्हणाले.

सरकारनं भीमा-कोरेगावच्या विकास आराखड्याबाबत चर्चा केली, तर त्याविषयी अधिक बोलता येईल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "1 जानेवारी हा या देशाला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जायची, तिच्या विरोधातला हा लढा होता. आणि तो लढा यशस्वी झाला असं दिसतं. या लढ्यापासून सुरू झालेली सामाजिक चळवळ अजून सुरू आहे. जोपर्यंत खऱ्य़ा अर्थानं लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या कार्यक्रमाचं महत्त्व कायम राहिलं.

"दोन्ही सरकार केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीची योजना नाहीये. ती असती तर कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर आलो असतो. या दोन्ही सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता दिसत नाहीये. त्यामुळे कोरोनानंतरच्या परिस्थितीत फार मोठा बदल होईल, असं वाटत नाही."

कोरोना संकट आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घरातून विजयस्तंभाला अभिवादन करा असं सरकारनं आवाहन केलं होतं. त्याला सगळे जण प्रतिसाद देतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)