महाविकास आघाडी: काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस वाढतेय का?

महाविकास आघाडी सरकार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी न्यूज मराठी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त देशभरात काँग्रेस नेत्यांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनिया गांधी उपस्थित राहू शकल्या नाहीत. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्रातही वर्धापनदिनानिमित्त काही कार्यक्रम झाले. पण मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमानंतर वेगळीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या पदभार स्वीकारण्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील काँग्रेस नेत्यांची भाषणं अतिशय आक्रमक होती. भाषणादरम्यान नेत्यांनी भाजपला तर फैलावर घेतलंच. पण महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांनाही काँग्रेसने सज्जड इशारा दिल्याचं दिसून आलं. यावरून सरकारमधील सहभागी तीन पक्षांमध्येच कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे.

या कार्यक्रमातील नेत्यांची भाषणं ऐकलीत तर तुम्हाला नेमकी स्थिती समजू शकेल.

कोण काय म्हणाले?

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण - सरकार आपलं आहे. आम्ही पण सरकारमध्ये आहोत. आम्ही काय दिखावा करण्यासाठी सरकारमध्ये नाही. आम्ही नसतो तर सरकार बनलं नसतं. भाजपला रोखण्यासाठीच हे सरकार बनलं आहे. आमचे सिद्धांत, आमची विचारसरणी आम्ही बाजूला ठेवलेली नाही.

शिवसेनेसोबतची आघाडी ही महाराष्ट्र पातळीपर्यंतच मर्यादित आहे. शिवसेना ही UPA चा हिस्सा नाही, त्यामुळे त्यांनी UPA बाबत विधानं करणं उचित राहणार नाही. सोनिया गांधी सक्षम असल्यानेच सर्व पक्षांनी मिळून त्यांना नेतृत्व दिलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख - सरकारमध्ये आहोत म्हणून आम्ही काय कमजोर बनून राहणार नाही की कुणीही आमच्या नेत्यांकडे बोट दाखवेल. आमच्या नेत्यांबद्दल असे विचार असतील तर असं सरकार आम्ही आमच्या टाचेखाली ठेवतो. सरकारमध्ये राहून आमच्या नेत्यांबद्दल कुणी असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही.

मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष चरणजित सप्रा - आमचे मंत्री नेहमी आपल्या सोबतच उभे आहेत. आमच्यासाठी सरकार ही प्राथमिकता नसून आमचा पक्ष, आमचे नेते ही आमची प्राथमिकता आहे, हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी लक्षात ठेवावं. आमच्या नेत्यांच्या विरुद्ध कुणीही आवाज उठवला तर काँग्रेस पक्ष ते सहन करणार नाही.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील - काही लोकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. युपीएचा भाग नसलेल्या लोकांनी युपीएबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. युपीएसच्या सहकारी पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. युपीएच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसण्याचा तुमचा काहीच अधिकार नाही.

एका वर्षात काँग्रेस पक्षाने काय कमावलं आणि काय गमावलं?

दरम्यान, महाराष्ट्र सरकारमध्ये एका वर्षात काँग्रेस पक्षाने काय कमावलं आणि काय गमावलं, असा प्रश्न काँग्रेसच्याच एका नेत्याने सोनिया गांधी यांना पत्र लिहून विचारला आहे.

मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधु राय यांनी हे पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. या पक्षातील आशय गंभीर असाच आहे.

विश्वबंधु राय

फोटो स्रोत, viral photo

फोटो कॅप्शन, विश्वबंधु राय यांचं पत्र

पत्रानुसार, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात सरकार चालवण्याच्या भूमिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला वाळवीसारखा कमकुवत बनवत आहे. राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची मोठी संख्या असूनही स्थानिक पातळीवर ते संघटनेच्या उपयोगाचं ठरताना दिसत नाही. सामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांनाच मंत्र्यांचे विभाग माहीत नाहीत."

विश्वबंधु राय पुढे लिहितात, "सरकारचं एक वर्ष पूर्ण झालं तरी राज्यातील अनेक समित्या आणि महामंडळांची पदं रिक्त आहेत. आपले सहकारी पक्ष जाणीवपूर्वक रणनिती बनवून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत आहेत. ते आपल्या पक्षालाच पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हे थांबवण्यात आपण अपयशी ठरत आहोत."

"2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांवर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आपली सर्व आश्वासनं तशीच खितपत पडून आहेत. आपली व्होट बँक सहकारी पक्ष तसंच विरोधी पक्षाकडून पळवली जात आहे. पक्षांतरं रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळावा, याचा इशारा देणंही आवश्यक आहे," असं विश्वबंधु राय यांनी पत्रात लिहिलं आहे.

राय यांचे हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरस होऊ लागलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतं.

कुरबुरींचा घटनाक्रम

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पहिल्यांदाच अशा तक्रारी केल्या आहेत, असं नाही.

राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या नेत्यांनी आधीही एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली होती. शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य थोडं कमी आहे, असं म्हटल्याचं निमित्त त्यावेळी होतं.

शरद पवार सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल पटेल यांनी लिहिलेल्या लेखात काँग्रेसवर सडकून टीका केली होती.

"शरद पवार हे भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता अनेकवेळा निर्माण झाली होती. पण काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्याचं काम केलं. शरद पवारांविरुद्धची ही षड्यंत्रं मी जवळून पाहिली आहेत," असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिहिलं होतं. यावर काँग्रेसने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

याच्या काही दिवसांनंतर शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर काँग्रेस, डावे आणि इतर पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यादरम्यान, शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. सोनिया गांधी यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर शरद पवार यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचं सांगून विषयावर पडदा टाकला.

'कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची आठवण'

सोनिया गांधीं यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दलित आणि आदिवासी समाजासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) आठवणही ठाकरे यांना करून दिली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं म्हटलं होतं. त्यावरूनही मोठी खळबळ माजली होती.

महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची विधानं विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केली जातात. पण तसं काही होणार नाही, असं सरकारमधील मंत्री सातत्याने सांगताना दिसतात.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. या आघाडीसमोर भाजप उमेदवारांचा टिकाव लागला नाही. सहापैकी फक्त एका ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला.

या पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुका आघाडी करूनच लढवणार असल्याचं महाविकास आघाडीतील मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं. पण या घोषणेला पहिला छेद काँग्रेसनेच दिला.

भाई जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, भाई जगताप

आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं पहिलं वक्तव्य होतं, "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार."

हा सगळा घटनाक्रम सुरु असतानाच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा सामनामध्ये 'ओसाड गावची पाटिलकी' या शीर्षकासह एक अग्रलेख छापून आला. विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राहुल गांधी यांची चेष्टा होत असून कांग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे दिलं पाहिजे, असा या लेखाचा आशय होता.

यानंतर दोन दिवसांनी संजय राऊत यांनी काँग्रेस मोठा पक्ष या शीर्षकाखाली आणखी एक अग्रलेख लिहून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही UPA अधिक मजबूत होण्याची गरज आहे, वगैरे मत मांडलं.

'दुखावण्याचा हेतू नाही'

संजय राऊत यांचे हेच अग्रलेख काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याची चर्चा जाणकारांमध्ये आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात याचंच प्रतिबिंब दिसून आलं. यामध्ये काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिवेसेने युपीएबाबत कोणतीही वक्तव्ये करू नयेत, असा इशारा दिला आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसमधील धुसफूस आणि इतर दोन सहकारी पक्षांवरील असंतोष वाढतोय का, हा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Sopa images

याप्रकरणी शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांच्याशी बीबीसीने चर्चा केली.

"जे काही संपादकांनी लिहिलं, ती त्यांची स्वतःची वैयक्तिक भूमिका असते. काँग्रेस पक्ष जुना आहे आणि मोठा आहे, त्यांनी विरोधकाची भूमिका सक्षमपणे बजावावी, असाच त्याचा मतितार्थ होता. सगळीकडे मोदी-एके-मोदी असाच कारभार चालू आहे. शरद पवार जुने-जाणते नेते असल्याने त्यांचं मार्गदर्शन घ्यावं UPA मध्ये सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस असल्याने त्यांनी आपली ताकद ओळखून काम केलं पाहिजे, त्यांनी मोदींसमोर सक्षमपणे आव्हान उभं करावं, असं आमचं मत आहे," असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

"यामध्ये काँग्रेसला दुखावण्याचा काहीच हेतू नाही, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. सरकारमधील सगळे मंत्री आणि नेते एकोप्याने काम करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सगळे एकत्र आले आहेत. हे सरकार पाच वर्षे चालेल," असा विश्वास मनिषा कायंदे यांनी व्यक्त केला.

'काँग्रेस दुर्लक्षित बाळ'

सध्याच्या विधानसभेत शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 तर काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्या हिशोबाने महाविकास आघाडीत काँग्रेस हा तिसरा पक्ष म्हणून सहभागी झाला.

सत्तेचं वाटप करतानाही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 16 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदं मिळतील असं ठरलं होतं.

महाविकास आघाडी सरकार

फोटो स्रोत, Twitter

पण महाविकास आघाडी सरकारचा चेहरामोहरा सेना-राष्ट्रवादीचाच आहे, आमच्या पक्षाला निधीच्या बाबतीत दुय्यम स्थान दिलं जातं, अशी तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांकडून केली जाते.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील गाताडे यांनी हा विषय समजावून सांगताना रडणाऱ्या बाळाचं उदाहरण दिलं.

त्यांच्या मते, "सध्याच्या सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था ही रडणाऱ्या दुर्लक्षित बाळासारखी झाली आहे. सरकारमध्ये आपल्याला दुय्यम स्थान आहे. आपली काही मागणी असेल तर रडल्याशिवाय ती पूर्ण होत नाही, अशी भावना काँग्रेस नेत्यांची झाली आहे."

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशीही या विषयावर बीबीसीने आधी चर्चा केली होती. चोरमारे यांच्या मते, "शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या पक्षाच्या खात्यांकडे लक्ष देतात. काँग्रेसला दाबण्याचे प्रयत्न अप्रत्यक्षरीत्या दोन्ही पक्षांकडून केले जातात. त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ असू शकते. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो."

सरकारमध्ये अंतर्विरोध?

महायुतीत निवडणूक लढवूनही शिवसेनेने निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची मागणी करत भाजपला कोंडीत पकडलं. पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सेनेने सत्ता हस्तगत केली.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, अशी टीका केली होती. त्यानंतरही सरकार पडण्यासंदर्भात बोलताना तिन्ही पक्षांचे पाय एकमेकांच्या पायात अडकून सरकार पडेल, अंतर्विरोधाने हे सरकार पडेल,' अशी वक्तव्यं फडणवीस हमखास आणि वारंवार करताना दिसतात. इतर भाजप नेतेही वारंवार हे सरकार पडण्यासंदर्भात विधानंतर करत असतात.

आता काँग्रेसच्या नाराजी नाट्यामुळे तिन्ही पक्षांमधला अंतर्विरोध समोर येत आहे का? सरकार पडण्याच्या दिशेने तर तिन्ही पक्षांची वाटचाल सुरू नाही ना?

याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "एकमेकांमध्ये मतभेद आहेत. पण ते पक्षीय राजकारणाच्या पातळीवर आहेत. काँग्रेस नेत्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांना सत्तेची गरज आहे. त्यामुळेच ते महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाले होते. अशीच गरज राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात किती जरी अंतर्गत वाद झाले तरी त्याचा परिणाम सरकारवर सध्यातरी होईल, असं वाटत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)