भाजप विरुद्ध महाविकास आघाडी: पक्षांतर केलेल्या नेत्यांची स्वगृही परतण्याची हालचाल सुरू आहे का?

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात अनेकदा 'ऑपरेशन लोटस' ची चर्चा होतेय. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विधानानंतर भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर येऊन 'ऑपरेशन वॉच' सुरू होणार का? या प्रश्न समोर येऊ लागला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "आमच्याकडून तुमच्याकडचे आलेले आमदार कधी परत येऊन निवडणूक लढवतील कळणारही नाही" असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे इशारा दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची झालेली पीछेहाट आणि भाजपचा गड मानला जाणार्‍या नागपूरमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोमणे मारले.

यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपचे अनेक आमदार नाराज आहेत आणि ते संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं. याला भाजप नेत्यांनीही उत्तर दिलं. यावरून 'ऑपरेशन लोटस' विरूद्ध 'ऑपरेशन' वॉच असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे.

जयंत पाटील

फोटो स्रोत, JAYANT PATIL /FACEBOOK

फोटो कॅप्शन, जयंत पाटील

तर... आम्ही पूर्ण ताकद देऊ!

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत चालली आहे. राज्यातल्या नेतृत्वाबाबत फार चांगलं वातावरण नाही अशी चर्चा आहे. त्यात राज्यातली सत्ता हातून गेल्यामुळे अनेक पक्षांतर केलेल्या आमदारांचे भ्रमनिरास झाले. भाजपच्या एकहाती नेतृत्वखाली काम करणं आमदारांना जमत नसल्याचं राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येतय.

पक्षांतर केलेले अनेक नेते आमच्याशी बोलत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं. ते म्हणतात, "भाजपचे विधानसभेचे सदस्य त्यांच्या पक्षामध्ये नाराज आहेत. त्यांना पक्षाच्या व्यवस्थेची उबक आलेली आहे. बर्‍याचदा ते आमच्याशी मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे भविष्यात अनेक आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो". पण या आमदारांनी घरवापसी केली तर त्याला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद लावू अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत का?

अजित पवार म्हणाले, " जो कोणी आमदार राजीनामा देऊन पक्षप्रवेश करेल तेव्हा निवडणूक लागेल. निश्चितपणे त्याच्या विरोधात भाजप उमेदवार उभा करेल. अशावेळी इतर दोन पक्षही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करतील. 'त्या' उमेदवाराचा प्रचारही करतील." अजित पवार त्यांनी हे विधान करून आमदारांना घरवापसीची साद घातली आहे. याला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "राजकारणात आपली प्रासंगिकता दाखवण्यासाठी असं म्हणावं लागतं. आता अजितदादांवर ती प्रासंगिकता दाखवण्याची वेळ आलेली आहे. मी सुद्धा म्हणू शकतो राष्ट्रवादीचे 5 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. आमचे 105 आमदार स्थिर आहेत. ही संख्या भविष्यात वाढू शकते पण कमी होऊ शकत नाही."

तर... आम्ही रोज माफी मागू!

हे कुठल्या पध्दतीचे राजकारण करताय हे सांगताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला आमदार फोडण्यासाठी आव्हान दिलंय.

ते म्हणतात "तुम्ही या महिन्यात एक तारीख ठरवा, 26 जानेवारीपर्यंत आम्ही 20 आमदार फोडतो. जर तसं झालं तर 1 मार्चच्या अधिवेशनात आम्ही रोज माफी मागू आणि जर नाही जमलं तर तुम्ही राजीनामे द्या," पण ही चर्चा आता का सुरू झाली? राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी घवघवीत यश मिळालं.

देवेंद्र फडणविस आणि सुधीर मुनगंटीवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणविस आणि सुधीर मुनगंटीवार

गेले अनेक दिवस हे सरकार अस्थिर आहे हे सांगणारं भाजप 'बॅकफूटवर' गेलं. जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "आपल्याकडे पक्षांतराचा कायदा लागू आहे. जर भाजप आमदारांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला तर आमदाराला राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लागेल.

"त्यामुळे नेत्यांची ही वक्तव्य एक राजकीय रणनीतीपुरती आहेत. सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे जर ही आमदारांची मेगाभरती व्हायची असेल तर निवडणुकीआधी वर्षभरापासून सुरू होईल. सध्या दोन तीन आमदारांचे प्रवेश झाले तर आश्चर्य वाटायला नको पण मेगाभरती आता होईल असं वाटत नाही."

निवडणुकांवेळी आघाडीला पडलं होतं खिंडार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमय वातावरण होतं. शिवसेना भाजपच्या युतीची महाराष्ट्रात सत्ता येणार हे निश्चित झालं होतं. यावेळी विविध पक्षातून भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले. यातले सर्वाधिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे होते.

चित्रा वाघ

फोटो स्रोत, Twitter

अजित पवारांचे मेव्हणे पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह यांचाही समावेश होता. याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील, गणेश नाईक, संजीव नाईक, चित्रा वाघ, उदयनराजे भोसले, शिवेंद्र राजे भोसले, मधुकर पिचड , जयदत्त क्षीरसागर, सचिन अहिर असे अनेक नेते राष्ट्रवादीमधून बाहेर पडले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

फोटो स्रोत, SHARAD BADHE

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसमधून तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे असे अनेक नेते पक्षातून बाहेर पडले. सत्तेत भागीदार होण्यासाठी अनेकांनी भाजपची वाट धरली. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या गणितानंतर या नेत्यांची ओंजळ रिकामी राहीली

या आमदार आणि नेत्यांशी पक्षांतराबाबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही जणांशी आमचा संपर्क झाला पण त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)