शरद पवारांविरोधात षड्यंत्र होतं हा प्रफुल पटेलांचा दावा किती खरा?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"शरद पवार हे भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता अनेकवेळा निर्माण झाली होती. पण काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्याचं काम केलं. शरद पवारांविरुद्धची ही षड्यंत्रं मी जवळून पाहिली आहेत," असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त 'द हितवाद' या वृत्तपत्रासाठी प्रफुल पटेल यांनी एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसमुळेच देशाला शरद पवार यांच्यासारखा पंतप्रधान लाभू शकला नाही, असं म्हणत प्रफुल पटेल यांनी काँग्रेस पक्षातील 'दरबार गटा'तील नेत्यांवर टीका केली आहे. पण, खरंच प्रफुल पटेल म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसनं शरद पवारांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्याचं षड्यंत्रं रचलं होतं का?

हे समजून घेण्याआधी प्रफुल पटेल यांनी या लेखात काय लिहिलं आहे ते पाहूया.

प्रफुल पटेल यांनी काय लिहिलं?

"शरद पवार दिल्लीत गेले, त्यांनी केंद्रात राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेता अशी स्वतःची ओळख अत्यंत कमी वेळेत बनवली. पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचं नाव खात्रीशीरपणे पुढे येत होतं. पण दिल्लीतील 'दरबार पॉलिटिक्स'ने त्यांच्या कामात खोडा घातला. हे त्यांचं वैयक्तिक नुकसान तर होतंच, पण त्यासोबतच पक्षाचं आणि देशाचंही मोठं नुकसान झालं, "असं प्रफुल पटेल यांनी लिहिलं.

ते पुढे लिहितात, "1991 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असा काही नेत्यांचा सूर होता. पण त्यावेळीही दिल्लीतील 'दरबार गटा'तील सदस्य मध्ये आले. त्यांनी पवार यांना अध्यक्षपद देण्यास विरोध केला. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आलं.

"खरं सांगायचं तर, पी. व्ही. नरसिंह राव आजारी होते. त्या कारणामुळे त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. राजकारणातून निवृत्ती घेऊन हैदराबादला परतण्याचा त्यांचा विचार होता. पण केवळ पवार यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी पी. व्ही. नरसिंह राव यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तयार करण्यात आलं. निवडणुकीनंतर काँग्रेस बहुमताच्या जवळ होती. त्यामुळे सरकार बनवताना शरद पवार यांच्यासारख्या तरूण नेत्याला पंतप्रधानपद द्यावं, अशीही चर्चा होती. पण त्यावेळीही दरबार कटोरीने हे पद त्यांना मिळू दिलं नाही. सोनिया गांधी यांच्या नावाचा गैरवापर करत हे पद पी. व्ही. नरसिंह राव यांना देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार संरक्षण मंत्री बनले.

"शरद पवार यांच्याविरुद्धची अशा प्रकारची अनेक षड्यंत्रे मी जवळून पाहिली आहेत. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे शरद पवारांकडे वैरभावानेच पाहत असत. शरद पवार त्यांच्या अध्यक्षपद आणि पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी राहिले होते. म्हणून काँग्रेस पक्षात शरद पवार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी राव यांनी प्रयत्न केले."

प्रफुल्ल पटेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रफुल्ल पटेल

पटेल यांच्या मते, "1992 मुंबई दंगलीनंतर मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना पदावरून हटवून त्यांच्या ठिकाणी पुन्हा शरद पवार यांना पाठवण्यात आलं. शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवून आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा हा अतिशय चतुर डाव होता.

"1996 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसचे 145 खासदार निवडून आले. यावेळी पी. व्ही. नरसिंह राव यांना हटवावं आणि शरद पवार यांनी पंतप्रधान म्हणून नेतृत्व कराव, अशी मागणी एच. डी. दैवीगौडा, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि डाव्या पक्षांकडून केली जात होती. असं केल्यानंतरच आम्ही सरकारला पाठिंबा देऊ असं त्यांचं धोरण होतं. पण, नरसिंह राव यांनी हे मान्य केलं नाही. त्यांनी देवीगौडा यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरवलं."

याशिवाय काँग्रेसने शरद पवार यांचा अपमान केल्याची इतर काही उदाहरणंही प्रफुल पटेल यांनी आपल्या लेखात दिली आहेत.

पण, पटेल यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे जाणून घ्यायाच आम्ही प्रयत्न केला.

दूध पोळलं म्हणून ताक फुंकून पिण्याचा प्रकार

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार सुनील गाताडे यांनी दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलं आहे. त्यांनी 1991 ची परिस्थिती समजावून सांगितली.

त्यांच्या मते, "शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या नेत्यांमध्ये विश्वासाचा अभाव असल्यानेच त्यांच्याऐवजी पी. व्ही. नरसिंहरावांची निवड करण्यात आली. शरद पवार यांनी अनेकवेळा काँग्रेस नेत्यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. 1978 साली त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग केला आणि मुख्यमंत्रिपद मिळवलं. अखेर राजीव गांधी यांच्या काळात शरद पवार 1987 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण तरीही त्यांच्यात आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये पारदर्शकता आणि स्पष्ट संवाद नव्हते. शरद पवार यांच्याकडे सतत संशयाने पाहिलं जाई."

गाताडे सांगतात, "1991 साली काँग्रेसमध्ये नरसिंह राव विरुद्ध शरद पवार असा सामना झाला. अखेर 10 जनपथने नरसिंह राव यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचं ठरवलं. काँग्रेससाठी दूध पोळलं म्हणून ताक फुंकून पिणं, असा हा प्रकार होता.

"शरद पवार यांचा इतिहास पाहता, त्यांच्यासारखा महत्त्वाकांक्षी नेता पुढे आपल्या अडचणीचा ठरू शकतो, असं मानणारा एक गट काँग्रेसमध्ये होता. राजीव गांधी यांची हत्या झालेली असताना अशा परिस्थितीत नरसिंह रावांना आपण 'सांभाळू' शकतो, अशी गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या नेत्यांची भूमिका होती. त्यामुळे शरद पवार यांना बाजूला करण्यात आलं. पुढे अध्यक्षीय निवडणुकीतही पवार यांना पराभूत करण्यासाठी 10 जनपथकडून प्रयत्न करण्यात आले."

शरद पवार. सोनिया गांधी

फोटो स्रोत, AFP

'प्रफुल पटेल भावनेच्या भरात बोलत आहेत'

'24, अकबर रोड : द शॉर्ट हिस्टरी ऑफ द पीपल बिहाईंड द फॉल अँड राईज ऑफ द काँग्रेस' नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात नव्वदच्या दशकात घडलेल्या राजकीय घडामोडी, तसंच पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपद मिळताना घडलेलं नाट्य यांच्याबाबत सविस्तरपणे विश्लेषण आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

बीबीसीने किडवाई यांच्याशीही प्रफुल पटेल यांच्या लेखाबाबत चर्चा केली. हा लेख तथ्याला धरून नाही. पटेल यांनी भावनेच्या भरात हा लेख लिहिलेला असू शकतो, अशी प्रतिक्रिया किडवाई यांनी दिली.

"शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक आहेत. वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं कौतुक करणं समजू शकतं, मात्र, पटेल यांनी भावनेच्या भरात अतिशयोक्ती केली का, असं म्हणावं लागेल," असं किडवाई म्हणाले.

रशीद किडवाई यांनी त्यावेळी 1991 लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडीही सविस्तरपणे सांगितल्या.

ते सांगतात, "त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात सक्रियही नव्हत्या. काँग्रेसमधील सात नेत्यांनी पंतप्रधानपदावर दावा केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी काही खासदार आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न केला होता. 50-60 खासदारांना भोजनासाठी म्हणून एकत्रित केलं. पण आवश्यक ती संख्या पवार यांना जमवता आली नाही. शिवाय इतर काँग्रेस नेत्यांनीही तसे प्रयत्न केलेच होते. अखेर, ज्येष्ठत्व आणि क्षमता पाहून पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपद मिळालं."

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/SharadPawar

काँग्रेस नेतृत्वाचा शरद पवारांबाबत संशय

पवार आणि पंतप्रधानपद हा मुद्दा समजून घेण्यासाठी आधी आपल्याला दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

"पवार यांनी जनसंघासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यामुळे त्यांनी काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास गमावला होता. पुढे राजीव गांधी यांनी पवारांना काँग्रेसमध्ये आणलं तरी गांधी कुटुंबीयांना पवार यांच्याबाबत संशय कायम होता. इथंच या वादाचं मूळ आहे," असं देसाई यांनी सांगितलं.

देसाई पुढे सांगतात, "पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्धच्या बंडाला राजीव गांधी यांचीच फूस असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी राजकीय कुरघोडी करण्यात आल्या. शिवाय, गांधी घराण्याला बाजूला सारून इतर काँग्रेस नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात पवार यांना यश आलं नाही, हेसुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे शरद पवार आवश्यक ते पाठबळ मिळवू शकले नाहीत, अखेर त्यांना पंतप्रधानपद मिळू शकलं नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)