शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करतील का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा शपथविधी पार पडण्याअगोदर काही तास शरद पवारांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक खमंग चर्चा सुरु झाली. पवार त्यांची 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' मुख्य कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का?
सध्याच्या राजकीय परिस्थितीत, जेव्हा देशभर कॉंग्रेसचा आणि महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा दारूण पराभव झाला आहे, काहींना ही चर्चा प्रस्तुत वाटते आहे तर काहींना अप्रस्तुत.
पण 'पवार कॉंग्रेसमध्ये परत जातील का' ही गेली अनेक वर्षं, खरं र १९९९ मध्ये त्यांनी 'राष्ट्र्वादी' स्थापन केल्यापासूनच, चर्चेत असलेली शक्यता आहे. त्याची कारणं इतिहासातही आहेत, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही आहेत.
गर्तेतल्या कॉंग्रेसला कोण बाहेर काढणार?
वर्तमानातल्या परिस्थितीकडे जर पाहिलं तर या विलिनीकरणाच्या चर्चेमागे कॉंग्रेसची असलेली दयनीय राजकीय अवस्था अधिक कारणीभूत आहे. कॉंग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले ५५ खासदारही त्यांच्याकडे नाहीत. ते ५२ वर अडकले आहेत. त्यासाठी 'राष्ट्रवादी'च्या विलिनीकरणासाठी कॉंग्रेस आग्रही असल्याचं बोललं जातं आहे. पवारांनी अशा चर्चांमागे तथ्य नसल्याचं म्हटलं आहे आणि दोन्हीकडचे कोणीही नेते त्यावर बोलायला तयार नाहीत. पण प्रश्न एका विरोधीपक्षनेतेपदाचा नसून नेतृत्वाच्याच अभावाचा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
२०१४ पेक्षाही २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था राज्यात अधिक बिकट झाली आहे. राष्ट्रवादीकडे तरी ५ खासदार आहेत, पण कॉंग्रेसकडे केवळ १ खासदार आहे. राज्यात आणि देशात कॉंग्रेसची स्थिती दारूण आहे. स्वत: राहुल अमेठीमधून हरले आहेत.
देशातल्या कित्येक राज्यांमध्ये कॉंग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. इकडे महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हरले आहेत. मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा हरले आहेत. सुशीलकुमार शिंदे पुन्हा हरले आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये अनेक गट आहेत आणि कोणीही एकमेकांचं नेतृत्व मानायला तयार नाही. दुसरीकडे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक मोठे नेते भाजपाच्या आश्रयाला गेले आहेत. कित्येक जण आता विधासभेपूर्वी रांगा लावून उभे आहेत.
देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे विरोधक असणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता. निवडणुकीपूर्वी सगळे एकत्र येऊ शकले नाहीत, पण नंतर ती मोट जुळवण्याबद्दल पवार प्रचारादरम्यान बोलत राहिले.
महाराष्ट्रातही गेल्या चार वर्षांमध्ये विरोधकांना जर कोणता एकमेव चेहरा राज्यात असेल तर तो फक्त शरद पवारांचा होता. त्याचा परिणाम मोदी प्रचारादरम्यान केवळ पवारांवर टीका करताना पहायला मिळाले. त्यानंतरही राज्यात दोन्ही पक्षांना सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलं. त्यामुळेच विधानसभेची निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. तेव्हा त्या लढाईसाठी गेल्या २० वर्षांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आता ठेवण्याची गरज उरली आहे का, हा प्रश्न ते एकमेकांना विचारताहेत.
"मला वाटतं की वेगवेगळं अस्तित्व का ठेवायचं हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा नाही आहे. कॉंग्रेसपासून जे जे लांब गेले वा जनता दलासारख्या पक्षातून जे जे बाहेर पडले, त्या सगळ्यांनाच परत एकत्र येण्याविषयी विचार करावा लागेल. त्यांना एकत्र यावंच लागेल," ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे म्हणतात.
सोनियांचं 'विदेशी'पण संपलं
दुसरा प्रश्न जो सातत्यानं विचारला गेला तो हा की, ज्या मुद्द्यामुळे शरद पवार १९९९ मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर गेले तो मुद्दा आता उरलाय का? सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा पवार यांनी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासह पुढे आणला होता.

फोटो स्रोत, Getty Images
कॉंग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली. पवारांनी 'राष्ट्रवादी'ची स्थापना केली. पण त्यानंतर जेव्हा 'यूपीए' सरकारच्या काळात पवार मंत्रिमंडळात सहभागी झाले तेव्हा 'यूपीए'मध्ये सोनिया गांधींचे विश्वासू बनले. राज्यात तर या दोन्ही पक्षांनी एकत्रपणे तीन वेळा सरकार स्थापन केलं. विदेशी असण्याचा मुद्दा कुठेही आला नाही.
आघाड्यांच्या 'पंतप्रधान'पदाचं स्वप्न
आणखी एक मुद्दा होता तो म्हणजे पवारांच्या पंतप्रधानपदाचा. आघाड्यांच्या राजकारणात सर्वसंमतीचा चेहरा म्हणून त्यांचं नाव कायम घेण्यात आलं.
तिस-या आघाडीची चर्चाही कायम झाली आणि पवारांच्या पंतप्रधानपदाची शक्यताही कायम वर्तवण्यात आली. पण आता सलग दुसरं बहुमतातलं सरकार आलं आहे. त्यामुळे आघाड्यांवर अवलंबून 'राष्ट्रवादी'च्या राजकारणाची गरज उरली आहे का? हाही प्रश्न आहेच.
१९८६ ची पुनरावृत्ती?
इतिहासात पाहिलं तर असं दिसतं की कॉंग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय शरद पवारांना नवा नाही. १९७८ साली शरद पवारांनी कॉंग्रेसमध्ये बंड करून 'पुलोद'चं सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं.
त्यानंतर १९८६ पर्यंत ते इंदिरा कॉंग्रेसच्या बाहेरच होते. इंदिरांनंतर आलेल्या राजीव गांधींनी पुन्हा एकदा शरद पवारांना कॉंग्रेसमध्ये बोलावलं. १९८६ मध्ये शरद पवार पुन्हा कॉंग्रेसवासी झाले.
'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मचरित्रात पवारांनी त्या प्रवेशावेळचं आपलं भाषणही दिलंय. ७ डिसेंबर १९८६ औरंगाबाद इथलं हे भाषण आहे.
"राजीव गांधी यांच्या कॉंग्रेसच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ असलेल्या सर्वांना एकत्र आणण्याच्या आणि या ऐतिहासिक संघटनेला प्रेरणा देऊन पुन्हा चैतन्य देण्याच्या उपक्रमात, त्या उत्साहवर्धक कार्यात आपण सहभागी होत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
आज देशाची कसोटी पाहिली जात आहे. म्हणून व्यक्तिगत विचार बाजूला सारून हा राष्ट्रीय प्रयत्न यशस्वी करण्यात सर्वतोपरी पाठिंबा आणि सहकार्य द्यायला हवं," असं पवार या भाषणात म्हणाले होते.
आज त्याच राजीव गांधींचा मुलगा जेव्हा कॉंग्रेसचं नेतृत्व करतो आहे, तेव्हा शरद पवारांसमोर पुन्हा कॉंग्रेसप्रवेशाचा प्रश्न आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा राजीव यांचं बहुमतातलं सरकार होतं. आता राहुल यांची क्षीण झालेली कॉंग्रेस आहे.
'राष्ट्रवादी'नं घडवलेल्या पिढीचं काय?
दुसऱ्या बाजूला शरद पवारांसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या प्रत्येकाच्या भविष्याचाही प्रश्न आहे. 'राष्ट्रवादी'नं गेल्या २० वर्षांमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची एक मोठी पिढी तयार केली. त्या पिढीचं राजकारण बहुतांशानं स्थानिक कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात तयार झालं आहे.
शहर आणि जिल्हा स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्था इथं त्यांची ताकद तयार झाली आहे. आता जर राष्ट्रवादी ही कॉंग्रेसमध्ये विलीन झाली तर या सर्वांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.
"म्हणूनच हे असे विलिनीकरणाचे निर्णय केवळ दोन नेत्यांच्या भेटीनं होत नसतात. शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत अदांज घ्यावा लागतो. ही अनेक महिने चालणारी प्रक्रिया असते," प्रताप आसबे म्हणतात.
वारसदार कोण?
सोबतच शरद पवारांची राजकीय परंपरा कोण सांभाळणार हा प्रश्न कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणानं एक तर कायमचा सुटेल किंवा अनुत्तरित राहिल. सुप्रिया सुळे की अजित पवार हा प्रश्न कायम पवारांना विचारला गेला. आता कुटुंबातली पुढची पिढीही राजकारणात येते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पार्थ पवारांच्या लोकसभेतल्या उमेदवारीवरून आणि शरद पवारांच्या माढ्यातून निवडणूक लढवण्याबाबत बदललेल्या निर्णयानंतर पवार कुटुंबातल्या नव्या पिढीबद्दल चर्चा झाली होती. त्यांच्याही कॉंग्रेसमधल्या भविष्याबद्दल कयास लावले जातील. त्यामुळे 'राष्ट्रवादी'चं जर विलिनीकरण होणार असेल तर त्या निर्णयाला नव्या पिढीचा कंगोराही असेल.
गरजेचा धनी कोण?
एकंदरित, राष्ट्रवादीचं कॉंग्रेसमध्ये विलीन होणं ही कोणाची गरज अधिक हे पाहायला हवं. कॉंग्रेस वाचवण्यासाठी राहुल गांधींना या कॉंग्रेस परंपरेतल्या सर्वांत जुन्या नेत्याची गरज पडते आहे, की भूतकाळातले आक्षेप सरल्यानं भविष्य निर्धोक करण्यासाठी शरद पवारांना, हे पाहावं लागेल.चर्चा खूप काळापासून असली तरी उत्तरं लगेच मिळतील याची मात्र खात्री नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








